माझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे

गावची अविस्मरणीय माणसे

आम्ही गावी गेलो की आमची विचारपूस करणे किंवा मुंबईहून काही निरोप आला आहे का?, नवीन खबरबात काय हे जाणून घेण्यासाठी गावातली मंडळी हळूहळू आमच्या घराकडे येत असत. आमची अंघोळ, चहा वगैरे होईपर्यंत एकएक जण येण्यास सुरुवात व्हायची. शक्यतो बबन (मोरे) कोतवाल पहिला आमच्या घरात यायचा. कारण त्याची गावात फेरी चालू असायची. विचारपूस करायचा, चहा वगैरे घेवून गप्प मारायचा. बबन कोतवाल मला आठवतो तो गावात दवंडी देताना, तो नेहमी खालच्या बाजूने वरच्या आळीत आणि मग पुन्हा खाली असा जात असे आणि जाताना मोठ्याने ओरडून सांगत असे, “उद्या मोडा आहे, हो”. शनिवारी वाड्याला आठवड्याचा बाजार भरायचा. तेव्हा त्या दिवशी आणि आणखी काही मोजक्या दिवशी गावात ‘मोडा’ जाहीर केला जायचा. म्हणजे त्या दिवशी गावात कोणीही काहीही कामधंदा करू नये असा त्याचा अर्थ असायचा. रंगाने गोरापान, उंची कमी, डोळे किंचित घारे, नेहमी अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि धोतर, डोक्यावर टोपी, पायात चामड्याच्या वहाणा असा हा कोतवाल धोतराचा सोग हातात पकडून लांबलांब पावले टाकत खणखणीत आवाजात दवंडी देत आमच्या घरासमोरून जायचा. मग वरून परत आला कि घरी यायचा, पाणी प्यायचा, चहा घ्यायचा. माझ्या आजीचे आणि त्याचे चांगले जमायचे. तसे आजीचे सर्वांशी चांगलीच प्रेमाने वागत असे. कोणी घरात आला कि त्याला चहा मिळायचाच.

कोतवाल गेल्यावर थोड्याच वेळात श्रीपत मोरे पाटलांची फेरी व्हायची. उंचीने लहान, कपडे साधेच, गळ्यात माळ, थोडा मोठा आणि घोगरा आवाज, हसऱ्या आणि प्रेमळ चेहऱ्याचे आम्हाला भेटायला मुद्दाम यायचे. त्यांना पहिले की बरे वाटायचे, एक वडीलधारे, हसरे आणि सज्जन व्यक्तिमत्व घरात आले असे वाटायचे. ते बसायचे, मग विचारपूस व्हायची, चहापाणी व्हायचा.

माझ्या वडिलांच्या वयाचे त्यांचे मित्र बहुतेक गावातच होते. शाळेपासून एकत्र असलेले. उच्चशिक्षित असे कोणी नव्हते, पण त्या काळची १०वी पास केलेले दोघे तिघे असतील. बाकीचे ७-८ वी असतील, नक्की नाही माहीत. त्यातले वडिलांच्या जवळचे म्हणजे नथू मोरे. चांगलेच उंच. बोलायला आणि वागायला हुशार. त्यांनी गावातच राहून थोडे राजकारण, थोडे समाजकारण केले. काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे सफेद सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा वेष. अक्षर पण सुंदर होते त्यांचे. त्यांना शेतात काम करणे कितपत जमले असते याची शंका वाटते. त्यामुळे दूध सोसायटीचा कारभार सांभाळणे, किराणा दुकान चालवणे असे त्यांचे इतर उद्योग असत. त्यांच्या दुकानात गेलो कि भरपूर खाऊ मिळायचा. बहुतेक गणपत रामभाऊ सावंत यांच्या घरात काही दिवस त्यांचे दुकान होते.

गावाला गेलो की आजी सकाळच्या नाष्टयाला चहा बरोबर खाण्यासाठी दुकानातून बटर आणायला सांगायची, जसे कि आम्ही मुंबईला रोज सकाळी बटर खात असे वाटायचे कि काय तिला? आणि चहा बटर हा कार्यक्रम गावालाच व्हायचा. मुंबईला क्वचितच. गावाकडची बटर जरा वेगळीच असायची. आकाराने मोठी आणि जरा कडक. तर, ती बटर आणायला मी जायचो तो बाळू मामाच्या दुकानात. बाळू मामा म्हणजे बाळू तांबोळी, त्याचे नाव खरे तर अजून वेगळे आहे, मला माहित नाही. तो आमच्या खालच्या गावातला, येणवे बुद्रुक गावाचा. पण आमच्या गावी येवून दुकान थाटले, ते आजतागायत. त्याच्या दुकानाच्या जागा बदललेल्या पाहिल्यात मी. दर एक दोन वर्षाने नवीन जागेत दुकान दिसायचे. मला आठवते ते वरच्या आळीत पाटलांच्या पुढच्या घरात, बहुतेक लक्ष्मण सावंत यांच्या घरात बाळू मामाचे दुकान होते. बाळू मामाच्या दुकानात गेलो कि, माझी चंगळ असायची. बटर तर मिळायची पण त्याबरोबर गोळ्या बिस्किटे पण द्यायचा. पण माझ्याकडून कधीच पैसे घ्यायचा नाही. मला आवडेल ते द्यायचा. हिशोब काय असेल तो माझ्या वडीलांबरोबर. त्याच्या दुकानात गावाकडच्या ज्या वेगवेगळ्या गोळ्या, बिस्किटे, लहान चिकीचे तुकडे इत्यादी खाऊचे प्रकार मिळायचे ते मुंबईला मिळत नसायचे. त्याच्या दुकानात शिरले कि एक विशिष्ट वास यायचा. गूळ, तंबाखू, तपकीर, तेल ह्या सर्व पदार्थांचा मिळून एक नवीनच वेगळा वास तयार झालेला असायचा. बाळू मामा माझे खूपच लाड करायचा हे ऐकून नवीन पिढीला जरा आश्चर्यच वाटेल. तोच प्रकार असायचा नथू मोरे यांच्या दुकानात. मी त्यांना नथू अप्पा म्हणायचो. नंतर यशवंत शेळके – आमचा येशामामा यांनी मारुती मंदिराच्या शेजारच्या खोलीत दुकान टाकले, ती खोली आता पुढच्या बाजूने बुजवली आहे. पुढे खालच्या बाजूला शंकर कोंडाजी सावंत म्हणजे शंकरदादा यांचे पण दुकान होते. तिथे पण माझे लाड चालायचे. वहिनी पण माझे लाड करायची. हि सर्व दुकाने आणि त्यांचे अनुभव आजही स्मृतीपटलावर कायम आहेत. म्हणून आजही बाळू मामाच्या दुकानात आवर्जून जातो. गेल्या वेळेस यात्रेला गेलो तेव्हा बाळू मामा बांगड्यांचे दुकान टाकलेला दिसला पण दुकान मात्र बंद होते. मी अधिक चौकशी केली नाही.

गावाला संध्याकाळच्या वेळेस मी जेवणाची वाट पाहता असताना, कंदिलाच्या प्रकाशात बाहेर ओट्यावर किंवा पायरीवर वर बसलो की थोड्या वेळात आवाज यायचा घुंगरांचा आणि त्या पाठोपाठ काठी जमिनीवर आपटल्याचा. घाबरू नका मी भुताटकीची गोष्ट सांगत नाहीय. हा आवाज असायचा आमच्या गावात राहणाऱ्या सखा आंधळ्याच्या चालण्याचा. हा म्हातारा सखाराम पूर्ण आंधळा होता. (मला वाटते त्याचे आडनाव सावंतच असावे. त्याच्या विषयी माहिती फार कमी आहे, पण आठवणी मात्र आहेत). हा आमच्या गावचा नव्हता. कुठल्यातरी दुसऱ्या गावाचा, काहीतरी कारणामुळे आमच्या गावी येवून स्थायिक झाला. आणि आमच्याच गावातील एक झाला. गावाने शेवटपर्यंत त्याचा सांभाळ केला. आमच्या पूर्वजांच्या जुन्या घरात बहुतेक तो राहायचा. एकटाच राहायचा. त्याच्या जेवणाची व्यवस्था गावाने ठरवून केलेली होती. रोज कोणाच्या घरी जेवायचे हे ठरलेले असायचे. आमच्या घरी जेवण असले कि रात्री दिवेलागणीला यायचा. मी तेव्हा बाहेरच बसलेलो असायचो. हे त्याला कळायचे, मग तो हाक मारायचा. आजी पुढे येऊन त्याला ओ द्यायची. मग तो अंधारात सवयीने पाऊले टाकीत पायऱ्या चढून वर यायचा. आतल्या घरात पायऱ्या चढून आला कि अंदाज घेत खाली चाचपडत पोत्यावर बसायचा. हातातील काठी बाजूला आडवी ठेवायाचा. अन जेवून घ्यायचा. आमच्या घरात सर्वांनाच पोटभर जेवण मिळायचे. आजी असताना कोणीही काहीहि न घेता जाणे अशक्य असायचे. (आजीचे हे संस्कार आमच्या रक्तात आजही भिनलेले आहेत, त्या विषयी नंतर कधी). ह्या सखा आंधळ्याचे आम्हाला खूपच नवल वाटायचे. आम्ही गावात आलो हे त्याला माहिती नसायचे. पण देवळात अथवा गल्लीतून मी चाललो असली कि तो न पाहताही माझा आवाज ओळखून मला हाक मारायचा, “चारू, कधी आलास ?”, असे शुद्ध बोलायचा. माझ्या सगळ्या बहिणींची नावे त्याला पाठ. पण आम्हा कोणालाच त्याने पाहिलेलं नसायचे तरीही. दृष्टी नसताना सुद्धा अख्या गावात रात्रीचा तो एकटाच फिरायचा. सर्वांच्या घरी व्यवस्थित जायचा. देवळात दिवाबत्ती पण करायचा. रात्री विठ्ठल मंदिरात भजन किर्तनाला हजर असायचा. सदानकदा देवाचे नाव तोंडी. एकदा मात्र एक विचित्र कथा ऐकली त्याची. ह्या सर्व गोष्टी मला मित्रांकडून कळलेल्या. एकदा काहीतरी कारणावरून गावातील कोणीतरी व्यक्ती त्याला जीवे लागेल असे बोलली. झाले, त्याला ते बोलणे सहन झाले नाही. त्याचा रात्री तो गावातून गायब झाला. दुसऱ्या दिवसापासून अख्या पंचक्रोशीत त्याचा शोध घेतला, कुठेच सापडला नाही. सर्वांनाच पश्चाताप झाला, वाईट वाटले आणि तो सापडण्याची आशा सोडून दिली. अन दोन तीन महिन्यांनी एके दिवशी सखाची स्वारी गावात हजर. इतके दिवस कुठे गेला, कोणाकडे राहिला ह्याचा त्याने काही थांगपत्ता लागू दिला नाही. मग मात्र गावाने त्याला शेवटपर्यंत संभाळले. मला हे ऐकून नवल वाटते की, त्याला दिसत नसूनही तो गावाच्या बाहेर गेला कसा?

दगडू मोरे, रामू मोरे, दत्तू शिंदे, पांडू मोरे असे वडिलांचे अन्य मित्र. सगळीच नावे आठवत नाहीत. यातील काही जण मुंबईला फोर्ट भागात राहून तेथेच मिळेल तो कामधंदा करीत. अतिशय कष्ट करून त्यांनी आपले संसार उभे केले आहेत. पावसाळ्यात गावी जाऊन शेती करणे आणि दिवाळी नंतर पुन्हा मुंबईला येऊन कामधंदा शोधणे असा त्यांचा कार्यक्रम असे. त्यानंतरची पिढी मुबंईत आली त्यांनी एखाद्या ऑफिसमध्ये मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली. कोणी ड्रायविंग शिकून टेम्पो, टॅक्सी चालक झाले. त्यातील आज कित्येकजण गाडी, टेम्पोचे मालक झालेले आहेत. मुंबईत स्वतःची घरे घेतली आहेत. मुलांना उच्च शिक्षण देत आहेत. गावकऱ्यांनी खूपच प्रगती केली आहे. भावकीतील गेनभाऊ सावंत आणि शेजारचे विठ्ठल मोरे हे आंब्याच्या मोसमात मध्य मुंबईतील माधवबाग ते गिरगाव या भागात हापूस आंबे विकण्याचा व्यवसाय करत असत. एखादी खोली भाड्याने घेवून तिथे आंब्याच्या आढी लावत, घरोघरी जावून आंबे विकत. त्या काळी हा व्यवसाय मराठी माणसाचाच होता. उत्तर भारतीय नावाला सुद्धा नव्हते. पावसाळ्याच्या तोंडावर परत गावात येवून शेती करत असत. अशा तऱ्हेने जो तो आपली प्रगती करून घेत होता. मुंबईला आले कि आमच्या घरी सर्वजण येत असत.

तसेही अजूनही खूपच व्यक्ती आहेत सांगण्यासारख्या. पण आता जेवढे आठवले तेवढे सांगितले आहे. बाकीच्या व्यक्तींचे उल्लेख प्रसंगानुरूप येतीलच.

असे हे माझे गाव. खरे तर माझे वास्तव्य म्हणजे एका वर्षातील ३० ते ४० दिवसच असायचे. तरीही मी एवढ्या साऱ्या गोष्टींचा साक्षिदार राहिलो आहे, हे माझे भाग्यच.

अहो, थांबा जरा. मी निरोप नाही घेत आहे. अजून गावच्या गोष्टी संपल्या नाहीत. अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?

तर चला जाऊ या गावच्या यात्रेला. पुढच्या भागात ….

(वरील लेखात काही वयस्कर व्यक्तींचे उल्लेख एकेरी झालेत ते त्यांच्या प्रेमापोटीच. त्यातील कित्येक आता या जगात नाहीत. वाचकांमध्ये आमचे ग्रामस्थ ही असतील त्यांनी ह्या लेखात सुधारणा सुचवाव्यात).

छायाचित्र : राजेश रामदास सावंत, कुडे खुर्द ग्रामस्थ, वास्तव्य – मुंबई

छायाचित्र आणि लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant

One Comment

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!