माझ्या गावचा 'शिंगी' चा डोंगर

माझे गाव: भाग १ : नानाच्या गावाला जावूया (My Village)

माझे गाव: भाग १ : नानाच्या गावाला जावूया (My Village)

गावाचा प्रवास – Travel to My Village

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादया स्थानाचे अप्रूप असते, तसे मला माझ्या मूळ गावाचे अप्रूप आहे. प्रत्येकाकडे अशी एक लहानपणीची जुनी आठवण बांधून ठेवलेली सापडेल. लहानपणी एखाद्या स्थानाचा ठसा बालमनावावर पडला तर तो आयुष्यात न पुसणारा ठसा बनतो. तसेच मला माझ्या गावाच्या आठवणीविषयी वाटते.

तसा माझा जन्म मुबंईचा. परंतु माझ्या गावाचे (My Village) वेड मला लहानपणापासूनच लागले. इतक्या लहान वयातील गोष्टी किंवा प्रसंग माझ्या लक्षात राहणे शक्यच नाहीय, परंतु त्यावेळेस काढलेल्या काही कृष्णधवल छायाचियात्रांतून आणि काही ऐकीव गोष्टींमधून तसे स्पष्ट होते. मी बहुतेक अडीच ते ३ वर्षांचा असेन तेव्हा मला गावी राहण्याचा योग आला. परंतु अंदाज लावता येतो की, मला गावाचे वेड लागण्यामागे माझी आजी सत्यभामा, माझे चुलते म्हणजे माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, आम्ही त्यांना नाना म्हणायचो, माझी चुलत आत्या ताराआत्या, जी माझ्यापेक्षा  वयाने ५-१०च वर्षानेच मोठी असावी, तिचे आईवडील म्हणजेच माझे चुलत आजी-आजोबा म्हणजे तिचे आईवडील हे तिच्या लहानपणीच देवाघरी गेले असल्यामुळे ती आमच्याच घरी लहानाची मोठी झाली. तेव्हापासून ताराआत्या माझे आणि नंतर माझ्या भावंडांचे खूपच लाड करायची, ती नुकतीच देवाघरी गेली परंतु तिचे प्रेम मात्र शेवटपर्यत कायम होते. स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त लाड ताराआत्याने आम्हा भावंडांचे केले आहे. त्यावेळेस गावी गेल्यावर आजी, नाना आणि ताराआत्या हे सर्व जण जिथे जातील तिथे ते मला नेत असे, गोठ्यात जाऊन गुरांना वैरण घालणे व पाण्यावर नेणे, बैलगाडीतून फिरणे, शेतावर जाणे, संध्याकाळी देवळात किर्तनाला जाणे आणि सर्वांकडून लाड करून घेणे असे ते दिवस होते. बैलांचे वेड सुद्धा मला तेव्हाच लागले. निरनिराळ्या प्रकारची, रंगाची बैल पाहणे हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय.

शिंगीचा डोंगर (Hill in My Village)

आणि या सर्वांहून भारी गोष्ट म्हणजे आमच्या गावाचा शिंगी’चा डोंगर. भव्य उंचीचा, त्रिकोणी डोक्याचा, खूपच छोटा माथा, मोठ्या पोटाचा, दोन-तीन टप्प्यात उंचावलेला असा तो भव्य डोंगर लहानपणापासून मनात स्थान पटकावून आहे. त्या लहान वयापासून अजूनही मला डोंगराचे वेड आहे. प्रवासात येता जाता दिसणारा डोंगर पूर्णपणे बघणे, त्याचे नाव काय? त्याच्या पायथ्याशी जवळचे गाव कुठले? डोंगराकडे जाण्याची वाट कुठून जाते? डोंगराच्या पलीकडे काय आहे? अशी विचार करण्याची सवय मला तेव्हापासून आहे. (आज माहितीचा विस्फोट झाल्या असल्याकारणाने हि माहिती स्मार्टफोनमध्ये लगेच पाहून घेतो) मला आजही त्याकारणाने एसटी बस, ट्रेन मध्ये खिडकीची जागा हवी असते. अगदी रात्रीचा प्रवास असला तरी देखील मी अंधारातले डोंगर बघत असतो. म्हणून असेल कदाचित, पण खिडकीची जागा मिळाल्यावर काचा बंद करून झोपा काढण्याऱ्या सज्जन महाभागांचा मला खूप राग येतो आणि मग मी त्यांना ऐकू न जाईल अशा बेताने मनातल्या मनात त्यांना व मला शोभतील सज्जन शिव्या देऊन स्वत:चे समाधान करतो.

(My Village) माझे गाव ‘कुडे खुर्द’, खेड तालुक्याच्या पश्चिमेस दूरवर शिंगी डोंगराच्या पायथ्याचे एक छोटे खेडेगाव. गाव तिन्ही बाजूने छोट्या टेकडयांनी वेढलेले, पूर्वीकडच्या टेकडीच्या उतारावर वसलेले. आणि उत्तरेच्या दिशेने एका टेकडीच्या माथ्यावर सपाटीला असे दिसते. मी सांगत आहे ती गोष्ट खूप पूर्वीची म्हणजे तेव्हा आमच्याकडे लाल मातीचे रस्ते होते ते फक्त दूधगाडी आणि निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या जिप गावात येण्यासाठी, आणि वीज वगैरे खूप नंतर आलेली, तेव्हा खेड्यातली खरी मजा मी मनोसोक्त घेतली आहे.

गावचा प्रवास ( Travel to My Village)

पुढे थोडा मोठे होऊन शाळेत जायला लागल्यापासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच आम्ही भावंडे गावी जात असू. परीक्षा संपण्याच्या दुसऱ्या दिवसाची एसटीची राखीव तिकिटे काढलेली असायची. त्या अगोदर आम्ही कोणत्या दिवशी गावी येणार आहोत हे वडिलांनी पत्राद्वारे कळवलेले असायचे. तेव्हा मग नाना आदल्या दिवशी दुपारी बैलगाडी घेवून रात्रीच्या मुक्कामाला वाडा गावी येवून थांबायचा. त्याकाळी (My Village) आमच्या गावाला जाण्याची एसटी मुंबई ते वाडा अशी जायची. वाडा गाव चास कमान धरणाखाली गेले असल्याने आता आम्ही दुसऱ्या मार्गाने गावी जातो. वाड्यापासून पश्चिमेला आमचे गाव ६ किमी अंतरावर आहे. वाडा हे श्री क्षेत्र भीमाशंकर पासून उगम पावणाऱ्या भीमा नदीच्या काठावरती वसलेले होते. गावातूनच पश्चिमेला दोन रस्ते नदी पात्रात उतरून आमच्या गावाच्या दिशेला निघत. नदीकाठची उंची चांगलीच होती. त्याकाळी फक्त पावसाळयातच भीमा नदी दुथडी भरून वाहत असे म्हणून पावसाळ्यातील चार महिने आमच्या गावी जाण्यासाठी वाहनाची काहीच सोय नसायची. दिवाळी नंतर केव्हातरी गावची एसटी चालू झाल्याचा निरोप यायचा. तसे पहाता एसटीची सोय देखील अलीकडचीच, त्यापूर्वी आमच्या गावातील लोक घाटमाथ्यावरून चालत येऊन घाटमार्गाने भिवपुरी गावात खाली उतरून कर्जतच्या पुढील रेल्वे स्टेशन भिवपुरी रोड येथपर्यंत चालत येत असत. मुंबईहून रात्री ११ वाजता सुटणारी एसटी बस घाटकोपर, ठाणे, मुंब्रा, पनवेल, खोपोली, जुना खंडाळा घाटातून, लोणावळा, तळेगांव दाभाडे, चाकण, खेड, चास अशी गावे घेत पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान वाड्याला पोहोचत असे. रात्री १ च्या दरम्यान जुना खंडाळा घाटातून अवघड वळणे घेतघेत मंद गतीने गाडी घाट वर चढत असे तेव्हा खूप भीती वाटे. अवघड वळणे आणि मोठे चढ शिंग्रोबा मंदिराच्या पुढे सुरु होत असत. त्या चढावरून जाताना कधी कधी गाडीचा गियर पडत नसे, मग गाडी उलटी मागे येत असे, बसचालक ब्रेकवर पाय ठेवून वेग वाढविणे, गियर बदलणे अशा गोष्टी करत असे, सर्व पुरुष मंडळींना खाली उरतवून गाडीला धक्का देऊन कशीबशी गाडी वर चढवली जाई. आणि हे सर्व खिडकीतून पाहता असताना खूपच भीती वाटत असे. घाटात सर्वसाधारण वातावरण थंडच असते, पण अशा प्रसंगी बसमुळे आणि आजुबाजुंच्या गाड्यांमुळे तापमान वाढलेले असे, गाड्यांच्या गरम वाफा आणि ब्रेक किंवा क्लचला वापरलेल्या तेलाचा एक वास सर्वत्र जाणवत असे. पण वर येतानाच शिंग्रोबाला पैसे वगैरे अर्पण करून प्रसन्न केले असल्यामुळे काही वाईट घटना होत नसे.

बैलगाडीचा प्रवास (Travel to My Village in Bullock Cart)

एकदा घाट चढून झाला कि, मग बस सुसाट पळत असे. मध्यरात्र असल्याकारणाने मधल्या कुठल्याच गावात कोणीही प्रवासी उतरणारे नसत, थोडे प्रवासी खेडला उतरत. अशा तर्हेने पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान आम्ही वाड्याला पोहोचत असू. गाडी उभी राहिली कि लगेच नाना दरवाज्यात आम्हाला घेण्यास हजर असे. पहिला नाना आम्हाला जवळ घ्यायचा, त्याला आम्हाला पाहून आनंद व्हायाचा, पण बोलणे काहीच नाही व्हायचे, कारण आमचा नाना मुका होता, आणि म्हणून त्याला बहिरेपणा सुद्धा आला होता. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधण्याची कला आम्हाला शिकावी लागली. मुका असला तरी नाना बोलघेवडा होता. नुसतीच बडबड करीत काही न काही सांगत असायचा, अख्ख्या पंचक्रोशीत त्याची ओळख. शिवाय त्याला लिहिणे वाचणे येत होते. त्याद्वारे तो कधी कधी संवाद साधायचा. नाना जन्मापासून तसा नव्हता, लहानपणी काही अपघात होऊन तसे झाले होते. मग आमच्या पिशव्या, बोजी उतरवून घेऊन मग बसस्टँडच्या पुढे तांदळाची गिरण होती, त्या पटांगणात बैलगाडी सोडलेली असे तिकडे नाना आम्हाला घेवून जायचा. तिथे बैल बसलेली असायची, आम्हाला बघून ती लगेच उठून उभी राहायची व अंगाला आळोखे पिळोखे देवून लगेच सज्ज व्हायची. पण अजून खूप वेळ असायचा निघण्यासाठी, अजून अंधारच असायचा. बैलांमध्ये काही फरक पडला आहेत का, एखाडा बैल नवीन आहे का हे सर्व मी प्रथम पाहात असे. नानाच्या मदतीने बैलांना सावधपणे हात लावून पाहायचो. मग गाडीत समान लावून झाले कि आम्ही निघायचो, चहा घ्यायला. स्टँड पासून जरा पुढे गावाच्या कडेला एक हॉटेल होते. बसच्या वेळेप्रमाणे हॉटेल मालक अगोदरच तयार असायचा. तिथे पहिले गरम पाणी घेऊन चूळ भरावी लागायची, तोंड धुवून घ्यायचे, मग मिळायची ती राखुंडी. आम्हाला राखुंडीची सवय नसायची आम्ही ती नाकारायचो. मग गरमागरम वाफाळलेला चहा. आम्ही दोन तीन कप चहा घ्यायचो. ते कप आणि बशी खूपच छोटे आणि वजनदार असायची. आणि चहा? तो पक्का गुळमाट मिळायचा, खूप गोड असायचा. कधी कधी गरमागरम ताजी भजी पन मिळायची. तोपर्यंत उजाडायचे, मग आम्ही जायचो ते स्टँड जवळ असलेले रामू मोरे यांच्या घरी, हे रामू मोरे आणि आम्ही मुंबईला एकाच चाळीत फक्त एकच खोली सोडून शेजारी राहात होतो. तिथे त्यांची आई असायची, तिथे मग पुन्हा चहा वगैरे व्ह्यायाचा, ते व्यावसायिक असल्यामुळे श्रीमंत होते, त्यांचे घर दुमजली होते, त्यांच्या घरात खूप छान आरास केलेली असायची, खोल्यांमधील भिंतींना हॉटेल प्रमाणे काचा लावलेल्या होत्या आणि त्यावर छान छान चित्रे रंगवून घेतलेली होती. कपाटाच्या काचेवर पण छान चित्र आणि नक्षी होती. आणि मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्या चित्रांच्या वरच्या बाजूला असलेल्या पट्टीवर निरनिराळ्या प्रकारची आणि रंगाच्या बैलांची छान छान चित्रे तिथे रंगवलेली असायची.

गावाचा रस्ता (Road to My Village)

मग आम्ही निघायचो आमच्या गावी जाण्यासाठी. मी बैलांचा कासरा धरून नाना बरोबर पुढेच बसे. नाना शिकवीत असे गाडी कशी चालवायची. आमच्या बैलांच्या गळ्यात छान रंगीत मण्यांच्या माळा असायच्या, घुंगरू आणि छोट्या घंटा असायच्या, त्यांच्या नादाने आमचा प्रवास छान व्हायचा. बैलगाडी नदीपात्रात उतरली की नदीपात्रातील एखाद्या डबक्यावर बैलांना पाणी पाजले जायचे. वर सपाटीवर आलो की एक दीड किलोमीटरवर पुन्हा दुसरे नदी पात्र लागायचे, तिथून वर आलो मग सुरु व्हायचा तो चढ आणि डोंगराळ भाग. तेथून जवळपास दोन टेकड्या चढून वर आलो कि, मग आमचे गाव दिसायचे. वाडा आणि आमच्या गावातील उंचीचा फरक सुमारे १७५ ते २०० फूट असावा. त्यामुळे रस्ता खडतर होता. येणवे गावाच्या पुढे ओढ्यातून वर आलो कि खराब रस्ता सुरु व्हायचा. मातीचा-मुरुमाचा रस्ता, शिवाय रस्त्यात मोठमोठे दगड, चढ पूर्ण झाला कि रस्ताच दिसेनासा व्हायचा, कारण तेथे मुरुमाचा आणि मोठ्या खडकाचा एक टप्पा होता. माती अजिबात नव्हती, जरा पुढे मातीचा रस्ता आणि दुसरा चढ झुडुपांच्या पलीकडून सुरु व्हायचा त्या अंदाजानेच गाडी पुढे न्यायाची किंवा चालायचे. तिथून पुढे चढावर एक वळण आणि प्रचंड मोठा चढ. ह्या चढावर बैलांचा कसा लागायचा. पायाखाली छोटे मोठे दगड किंवा खडी. तो चढ अंगावरच यायचा, ३० ते ३५ अंशाहून अधिक कोनातील तो चढाचा एक टप्पा होता. तेथे बैलांना खूप मेहनत घ्यावी लागायाची. शिवाय खाली दोन तीन आडवे दगड होते, त्यावरून कधी कधी गाडीचे चाक घसरायचे आणि गाडी २ ते ३ इंच दणक्यात खाली आपटायची.

पण तो सगळा त्रास आणि शिणवटा नाहीसा व्हायचा तो चढ पूर्ण झाल्यावर एक छोटे वळण आणि लगेच सपाटी सुरु व्हायची आणि प्रथम दर्शन व्हायचे ते आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराच्या कळसाचे, मंदिराच्या पार्श्वभूमीवर गावातील छोटोमोठी कौलारू घरे दिसल्यावर अंगात एक चैतन्य यायचे, आता फक्त १० ते १५ मिनिटं. मग आम्ही आमच्या घरात आजी जवळ कधी जातोय असे व्हायचे आणि ते १ ते १.५ किमीचे अंतर संपता संपत नसे.

आणि एकदाची गाडी मंदिराला वळसा घालून उजवीकडे वळली कि मग गावात प्रवेश (My Village), समोरच आमच्या पूर्वजांच्या सामायिक घराची मागची बाजू आणि ग्रामपंचायतीचे कार्यालय आणि डेअरी. पुन्हा एक मुरुमाचा चढ आणि एक वळण आणि गाडी आमच्या दारात उभी राहायची.

माझे गाव: भाग १ : नानाच्या गावाला जावूया (My Village) – छायाचित्रे व लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत, संपर्क: ८९९९७७५४३९

भाग १ समाप्त.

माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लीक करा

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021-2022 Charudatta Sawant

8 comments

    1. मस्त मज्जा आली. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. चाळवाचाळव लिहून झाल्यानंतर माझ्या डोक्यात हाच विषय होता. आता थोडं थांबून लिहीन.
      तुमची लेखनशैली चित्रदर्शी आहे. घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहाते. लिहीत राहा.

    2. गावाकडचे वर्णन खूप छान. वाचताना आपण गावाला गेल्याचा अनुभव मिळतो.

  1. खुप छान लेख तेव्हडाच सुंदर आपला गाव आहे

  2. मी गावाला 2 ते 3 वेळाच गेले आहे, पण गावचे हे वर्णन वाचून आधी गाव कसं होतं संपूर्ण डोळ्या समोर उभं राहिलं, असं वाटत होतं आम्ही पण मुंबई ते कुडा असा प्रवासच करत आहोत.👌

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply