संबंध – एक संगीतमय करूण कथा – १
मला हिंदी चित्रपट संगीताची खूप आवड आहे, व त्यामुळे या विषयी बराच अभ्यास व वाचन केलेले आहे. माझ्या अत्यंत आवडीचे संगीतकार आहेत स्व. ओ. पी. नय्यर, कॉलेजमध्ये असताना त्यांच्या गाण्याची माहिती झाली, व ओपीची नवीन नवीन गाणी शोधण्याचे वेड लागले.
अशातच 1969 सालचा ‘संबंध’ ह्या चित्रपटातील गाण्यांचा शोध लागला आणि त्या गाण्यांनी माझ्यावर फारच भुरळ घातली. आता इंटरनेटवर सहज उपलब्ध असल्या कारणाने ह्या चित्रपटातील सर्व गाणी माहीत झाली.
त्यापैकी ‘जो दिया था तुमने एक दिन, मुझे फिर वो प्यार दे दो’ हे गाणे प्रथमदर्शनी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटले असावे असे वाटते, परंतु त्या गाण्याचे बोल व चित्रण पाहता, हे गाणे एका अभागी मुलाने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले हे कळाल्यावर मात्र ह्या गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
आतापर्यत बऱ्याच चित्रपटामध्ये विषयानुसार आई, बहीण, भाऊ, पती, मुले, मुली, आजी, आजोबा इत्यादी नात्यांवर आधारित भरपूर गाणी चित्रित आहेत, मात्र वडील आणि मुलगा या नात्यावर आधारित हे एकच गाणे मला माहित आहे, किंबहुना त्या काळातील हे एकमेव चित्रपट गीत असावे, आणि आताही असे दुसरे गाणे मला दिसत नाहीय (अलीकडील ‘दमलेल्या बापाची कहाणी’ हा अपवाद). त्यामुळे हे गाणे मला खूपच भावते. माझ्या दृष्टीने हे गाणे रसिकांनी पहावे व ऐकावे म्हणून मी ह्या गाण्याविषयी लिहिण्याचे ठरविले. ह्या गाण्याची पार्श्वभूमी काय असावी आणि एखादा संदर्भ सुटू नये म्हणून हा चित्रपट युट्युबवर पहिला. ह्या चित्रपटातील सर्व गाणी जरी मला माहीत होती, अगदी तोंडपाठ होती तरी देखील चित्रपट सलग पाहताना प्रत्येक गाण्याचा नवीन संदर्भ सापडत गेला आणि प्रत्येक गाणे हे किती वैशिष्टयपूर्ण आहे हे कळून आले. ह्या चित्रपटात एकूण 8 गाणी आहेत, त्यात 2 गाणी दोन वेळा दाखवली आहेत (एक गाणे वाद्यवृंदा शिवाय आहे). 2 तास 30 मिनिटे म्हणजे 150 मिनिटाच्या या चित्रपटातील सुमारे 50 मिनिटांचा वेळ हा गाण्यांतच वापरला गेला आहे, ह्या वरून ह्या चित्रपटातील गाण्यांचे महत्व कळून येते. तसेच 2 गाणी पूर्ण नसून फक्त एकेका कडव्याचे पद्य आहे. त्याचप्रमाणे नायकाची आई मरते ह्या प्रसंगी 1 ते 2 मिनिटांचा संवाद सोडला तर सलग 15 मिनिटात 3 गाणी एकत्र बांधलेली आहेत, जी कथेला पुढे नेतात.
हा चित्रपट सलग पहाताना ह्यातील गाणी ही चित्रपटातीत किती महत्वाची भूमिका बजावतात हे कळते. नंतर विचार करताना लक्षात आले की, जर ह्या गाण्यांचे चित्रण सलग पाहिले तर ह्या चित्रपटाची कथा संपूर्ण चित्रपट न पाहता देखील आपोआप कळून येते व ती तितकीच मनावर परिणाम करते.
हा दृष्टिकोन मनात ठेवून केवळ ह्या चित्रपटातील गाण्यांद्वारे हा चित्रपट आपणासमोर सादर करण्याचा अभिनव प्रयोग मी आता करीत आहे.
थोडेसे चित्रपटाविषयी: स्वर्गीय शशीधर मुखर्जी (जॉय मुखर्जी यांचे वडील) यांनी त्यांच्या फिल्मालया प्रॉडक्शन तर्फे त्यांचा हा शेवटचा चित्रपट मार्च 1969 मध्ये सादर केला. अजय विश्वास यांनी त्याचे निर्देशन केले होते. देव मुखर्जी, अंजना मुमताज, प्रदीपकुमार, सुलोचना, अचला सचदेव आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या. देव मुखर्जीचा हा पहिला चित्रपट.
चित्रपटाची गाणी कवी प्रदिप यांनी लिहिली होती आणि संगीत ओ. पी. नय्यर यांनी दिले होते. ओपी यांच्या कारकिर्दीतील हा एक वेगळा टप्पा होता, नेहमीच स्वतःच्या खास शैलीत सुमधुर चालीतील रोमँटिक गाणी देण्याऱ्या ओपीसाठी हा वेगळाच अनुभव होता, 6 महिने काम करून ओपीने गाण्यांना चाली लावल्या. समोर कवी प्रदीप सारखा कसलेला गीतकार होता आणि गाण्यांचा भाव खूप अर्थपुर्ण आणि गंभीर असल्याकारणाने ओपीसाठी हे चांगलेच आव्हान होते, ते त्यांनी गाण्यांना अतिशय चांगल्या चाली लावून ते आव्हान ओपीने लीलया पेलल्याचे दिसून येते. ओपी हा शशिधर मुखर्जींचा आवडता संगीतकार होता. ह्या चित्रपटासाठी शशिधर मुखर्जी यांनी ओपीला त्या काळात 1 लाख 80 हजार मोबदला दिला होता. हा तेव्हा सर्वात जास्त मोबदला होता. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात एकही युगुल प्रणय गीत अथवा रोमँटिक गाणे नाहीय. आशा भोसले, महेंद्र कपूर, हेमंतकुमार आणि मुकेश यांनी गाणी गायलेली आहेत. महेंद्र कपूर यांना खूप छान गाणी गायला मिळाली आणि त्यांनी ती खूप छान गायलेली आहेत. त्यावेळी ओपीचे रफीबरोबर भांडण असल्यामुळे ओपीचा लाडका गायक रफीचे एकही गाणे यात नाहीय. शिवाय कवी प्रदीप यांना आपल्या गाण्यांना चाल लावून आपल्या आवाजात गाणी गायची आवड होती, परंतु ओपी सारख्या कडक माणसापुढे त्यांचे काही चालले नसावे. (कारण अन्यथा ‘चल अकेला, चल अकेला’ हे मुकेशचे गाणे कवी प्रदीप यांनी नक्कीच गायले असते असे मला वाटते).
परंतु हा चित्रपट काही खास चालला नाही, उत्कृष्ठ संगीत असून सुद्धा गाणीही फार गाजली नाहीत.
गाण्यांतून कथा सादर करीत असताना कथेतील कच्चे दुवे अथवा पात्रांच्या वागण्यातील विरोधाभास इत्यादींवर भाष्य करणे यात टाळले आहे, कारण तो या लेखाचा विषय नाही.
भाग क्रमांक १ समाप्त
छायाचित्रे व लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

जो दिया था तुम ने एक दिन, अंधेरे मे जो बैठे है, हि दोन गाणी माझ्या आवडीची, छान समीक्षणात्मक लेख