Harihar Fort Photo Entrance

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.

काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कराव्या लागणाऱ्या चढाईनं, या पायऱ्या नुसत्या डोळ्यांच पारणं फेडीत नाही तर अक्षरश: मोहून टाकतात. या सोपानांची किंवा पायऱ्यांची महती एवढी थोर की इस.१८१८ सालात मराठाशाही बुडविण्यासाठी आलेल्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी याच्या नुसत्या पायऱ्या बघूनच आश्चर्यचकीत झाला व उद्गारका ” या किल्ल्याच्या पायऱ्यांच वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे २०० फुट सरळ व तिव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात.” गड किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफांनी उद्ध्वस्त करुन क्रांतिकारकांचे मनोध्येर्य खच्ची करणाऱ्या इंग्रजाने हरिहर किल्ल्याचे यथार्थ केलेले वर्णन किल्ल्याच्या महतीत अधिक भर घालते. अर्थात कॅप्टन ब्रिग्ज याने या सुंदर पायऱ्यांच्या मार्गला मात्र हात लावला नाही हे वेगळ सांगायला नको.

हर्षवाडी व निरगुडपाडा ही हरिहर किंवा हर्षगडाखाली परस्पर विरुद्ध दिशेला वसलेली पायथ्याकडील गावे. नाशिक-त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरुन कचोर्ले येथून हर्षवाडी गाठता येते. हर्षवाडीतून तास- दीड तासात आश्रमाजवळ व तेथून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ मळलेल्या वाटेने पोहोचता येते. निरगुडपाडा येथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पैकी कसारा-खोडाळे-निरगुडपाडा, दुसरा इगतपुरी-घोटी-निरगुडपाडा व तिसरा नाशिक-त्र्यंबकेश्वर-निरगुडपाडा. निरगुडपाड्यातून साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. नंतरचा चढ चांगलाच दमछाक करणारा आहे. तो चढून एका तासात आपण पठारावर येतो. इथून पठारावरून किल्ल्यावर जाणारी व किल्ला उजवीकडे ठेवून अर्ध्या तासात आश्रमाजवळ जाणारी अशा दोन वाटा लागतात. आश्रमाजवळून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोहोचता येते. आपल्याला जो सोयीचा मार्ग वाटेल तो मार्ग निवडावा.

निरगुडपाड्यावरून किंवा हर्षवाडीकडून जाताना आश्रम लागतो. वाटेत दगडी घडीव वस्तू लागते ती काय आहे त्याचा बोध होत नाही. त्याच्या मागे असलेल्या डोंगर उतारावरील पायथ्याकडील जागी एका उंचीवर आश्रम उभारलेला आहे. आश्रमाच्या ओट्यावर शिवलिंग असून त्यामागे भगवान शिव गणरायाला मांडीवर घेऊन बसलेली नजीकच्या काळातील पीओपी ची मूर्ती आहे. त्या पुढे त्रिशूळ रोवून ठेवलेला आहे. त्याखाली चौकोनाकृती पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या घाटावरील दगडी भिंतीवर डावीकडील बाजूस गणेश प्रतिमा तर उजव्या बाजूस दगडी मकारात पुष्पाकार शिक्का सदृश्य उठावदार शिलालेख आहे. त्या खाली समोरा समोर तोंड करून चोचीत वेल धरलेले दोन मोर कोरलेले आहेत. आठ ओळीतील शिलालेख देवनागरी संस्कृत लिपीतील असून तो असा…

श्री

।।श्री गणेशाय नमः।।

धात्रवर्णा

मि शुक्रेधवल शरतिथौशंकरात्म:सु

तः श्रीमन्नारायणख्येगजगिरिरसक्यु क्तसत्शालिवाहोशकेदाण्यूपनामा

हरिहरविलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी ण्यातलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे

              मंगलाय

या शिलालेखाची साधारणपणे शब्द फोड करता येईल ती अशी…

धात्रवर्णामि= धोतऱ्याच्या फुलांच्या रंगासारखा शुभ्र किंवा चमकदार, शुक्रेधवल= शुक्रधवल ( पांढरेशुभ्र ), शरतिथो= शर म्हणजे बाण, तिथो= तिथि म्हणजे पवित्र दिवस ( कदाचित हा शब्द क्षयतिथि असावा=  सूर्योदयानंतर प्रारंभ होणारी तिथी ), शंकरात्म:सुत:=  शंकराचा पुत्र, श्रीमन्नारायण= श्रीमन् नारायण, गजगिरिरसक्यु= गज=८ गिरि=७ रस=६ क्=१, सत्शालिवाहोशके= सत्= चांगले, शालिवाहन शके (शक संवत्सर- वर्षगणना ), दाण्यूपनामा= दाण्यू या शब्दातून दानी व दाणी असे दोन वेगवेगळे अर्थ  प्रेरित होतात. दानी= दानशूर मनुष्य किंवा धान्यावरील कर वा महसूल गोळा करणारा अधिकारी, दाणीपनामा= दाणी हे उपनाव असलेला, हरिहरविलसत्= हरिहर, विलसत्= तळपणे, चमकणे, शोभून दिसणे, देवताकंसुतीर्थंप्रादद्दी= देवतांच्या कृपेने, तीर्थंप्रादद्दीण्यात= पुण्यमय झालेली भूमी व परिसर, लोकश्रमनीरहरुतेश्रेयसे= ( लोक+श्रम+नीर+हरुते ) लोकांचे श्रम पाण्याने, हृ ( हर् ) – हरण करणे, दूर करणे, नष्ट करणे, श्रेयसे= यशासाठी, मंगलाय= कल्याणासाठी

वरील शब्द फोडीच्या क्रमानुसार वाक्यरचना न धरता शिलालेखातून खालील अर्थ निघतो ….

श्री. श्री गणेशाला वंदन असो. धातृ नाम संवत्सरात ज्येष्ठ महिना असताना शुद्ध पक्ष पंचमी तिथीला दाणी उपनावाने विख्यात असलेल्या शंकराचा मुलगा श्रीमन् नारायण,  यांनी शालिवाहन शके १६७८ (चवथी ओळ- गज = ८, गिरि = ७, रस = ६, क् = १ याप्रमाणे ८७६१ ही संख्या येते मात्र शक मांडताना वामतो गती पध्दतीनुसार-१६७८) हरिहर पर्वतावर विलास करणाऱ्या देवतांच्या नावाने दीनजनांचा त्रास कमी करण्यास आणि आर्त लोकांचे श्रमहरण करून पुण्यप्राप्तीसाठी या तिर्थाची निर्मिती केली.

हा शिलालेख शके १६७८ म्हणजे सन १७५६ काळातील असून तेंव्हा नानासाहेब हे पेशवे पदावर होते. नारायण शंकर दाणी म्हणजेच नारोशंकर हे पेशव्यांचे बिनीचे म्हणजे आघाडीचे किंवा पहिल्या फळीतील सरदार होते.

नारोशंकर हे नांव आलेच आहे तर त्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेवू.

नारोशंकर यांचे वडिल शंकरपंत विजापूर दरबारी दिवाण होते. वडिलांच्या मृत्यु पश्चात त्यांची तीनही मुले आबाजी, लक्ष्मण व नारायण सासवडला परत आलेत. कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली म्हणून पत्नीला सासुरवाडीला ठेवून नशीब आजमाविण्यासाठी नारोशंकर स्वतः मात्र वानला येथे नोकरीला गेलेत. तेथे एका मोठया सावकाराचा उमदा घोडा खूप आजारी पडला. नारोशंकर विजापूरला असताना काही वैद्यकीय ज्ञान मिळविले होते. त्या अनुभवावर सावकाराच्या घोड्यावर उपचार करताच तो बरा झाला. सावकाराचा शब्द होता की जो कोणी घोड्याला आजारातून बरा करील त्याला दोन हजार रुपये इनाम देईन. त्याप्रमाणे नारोशंकराला ते इनाम तर मिळालेच पण त्या सावकाराने नारोशंकराला दरमहा दीडशे रुपयाची नोकरीही दिली. काही वर्षानंतर त्यांनी सावकाराची नोकरी सोडली व ते सासवडला परत आलेत.

सन १७२० पर्यंत ते उदाजी पवारांच्या हाताखाली शिलेदार होते. या काळात सन १७२८ मध्ये मराठ्यांच्या माळव्यात हालचाल सुरू केल्यात यात त्यांचा सहभाग होता. थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी  सन १७२९ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम सुरू केली त्यात नारोशंकर सहभागी होते.  त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. सन १७३० नंतर त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकर यांच्या पदरी असल्याबद्दलचा सापडतो. त्यांच्या सैन्यात राहून नारोशंकराने काही लहान मोठ्या लढायात भाग घेऊन पराक्रम गाजवला. मल्हाररावांनी नारोशंकराची हुशारी व कर्तबगारी ओळखून त्यांना वरच्या हुद्याच्या जागाही दिल्यात. पुढे मल्हाररावांच्या शिफारशीवरून थोरल्या बाजीरावाने नारोशंकराला इंदूरचा सुभेदार नेमले.

बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने थोरल्या बाजीरावाने मदत केली म्हणून मराठ्यांना बुंदेलखंडाचा एक भाग देऊन टाकला. त्या भागातील नवास या भांडखोर जमातीने बंडाळी माजवून चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देणं बंद केले. त्यांच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी मल्हारराव किसन व ज्योतिबा शिंदे यांना रवाना केले. परंतु या कामी त्यांना अपयश आले. तेंव्हा होळकरांच्या सल्ल्याने पेशव्यांनी ही कामगिरी नारोशंकरावर सोपविली. नारोशंकरांनी आपल्या सैन्याच्या मदतीने नवास जमातीचे बंड मोडून काढले व चौथाई सुरळीत केली. त्यानंतर पेशव्यांनी नारोशंकराला ओरिसा प्रांतातील राजावर स्वारीस पाठविले. नारोशंकरांनी त्या स्वारीत अकरा लाख रुपये महसुलाचा भाग मिळविला.

पेशवे खुष झाले. त्यांनी त्यांना झाशीचे सुभेदार नेमले व राजे ही पदवी दिली.

सन १७४२ साली पेशव्यांनी नारोशंकराची रवानगी ओर्छा राज्यावर केली. झाशी जवळील ओर्छा हे छोटे राज्य. तेथील मुसलमान राजाने पेशव्यांविरुद्ध पुंडाई केली होती.

नारोशंकर ओर्छावर चालून गेले. त्यांनी त्या राजाला कैद करून शृंखला बांधून झाशीच्या किल्ल्यात ठेवले व ओर्छा राज्यावरुन गाढवांचा नांगर फिरविला. सर्व ओर्छा राज्यावर पेशव्यांचा अंमल झाला. नंतर राजाशी नारोशंकरांनी तह केला. झाशीचा किल्ला मराठ्यांना मिळाला. त्या किल्ल्याखाली नारोशंकरांनी गाव वसविले. ते गाव म्हणजेच आजचे झाशी शहर. सन १७४२ ते १७५६ पर्यंत नारोशंकराचा अंमल झाशीवर होता. झाशी शहरात अजूनही नारोशंकर तळ या नावाचा एक भाग आहे. झाशीच्या सुभेदारीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी झाशीचे वैभव वाढविले. इतकेच नव्हे तर पेशव्यांकडून जी जी कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात येई ती ते चोख रितीने बजावत असत. महसूलाच्या रकमा वसूल करण्यात त्यांची कामगिरी विशेष असे. यामुळे पेशवे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना मोत्याचा चौकडा दिला. हा चौकडा नारोशंकर नेहमी वापरीत. त्यामुळे त्यांना गमतीने मोतीवाले नारोशंकर असे म्हटले जाई.

सन १७४७ मध्ये त्यांनी नाशिक पंचवटी परिसरातील गोदावरी तटावर रामेश्वर मंदिर बांधले.व पोर्तुगीजांकडून एक भली मोठी घंटा घेऊन ती मंदिरावर बांधली आजही तिला नारोशंकरी घंटा असे म्हणतात. सन १७५७ नंतर त्यांची रवानगी गुजरात प्रांतात झाली. तेथे त्यांनी गुजरातसह सावनूर लढ्यातही पराक्रम गाजवले. तेथून ते दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीने उत्तरेला गेलेत.

अहमदशा अब्दाली याने इ. स. १७५६ मध्ये भारतावर चौथ्यांदा स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी पेशव्यांनी राघोबादादास पाठविले. मात्र राघोबादादा उत्तरेत पोचण्यापूर्वीच अहमदशा निघून गेला होता. सन १७६० मध्ये अब्दाली पाचव्यांदा भारतावर स्वारी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊस आज्ञा केली व मुलगा विश्वासराव यास बरोबर दिले. अब्दाली पूर्ण तयारीनिशी आला होता. याही मोहीमेत नारोशंकर सामील होते कारण उत्तरेकडे ते बराच काळ असल्याने त्यांना या प्रदेशाची माहिती होती. चौथ्या स्वारीत अहमदशाने दिल्लीवर कबजा मिळविला होता. अब्दालीच्या देखत दिल्लीला पेशव्यांनी वेढा दिला आणि दिल्ली घेतली. सदाशिवभाऊंना धीर आला  आता मराठ्यांची हिंम्मतही वाढली होती. या प्रित्यर्थ दरबार भरविला गेला. या दरबारात पेशव्यांनी नारोशंकरास ‘राजेबहाद्दूर’ ही पदवी दिली. शिवाय पाच हजार सैन्य व पेशव्यांचा ५/६ लाखांचा खजिनाही दिला यासाठी की त्याने दिल्ली शहर सांभाळावे. तसेच  शिंद्यांनीही पाच सहा लाख असा एकूण चाळीस लाखांचा खजिना त्यांच्या हवाली केला.

१४ जानेवारी १७६१, सकाळी १० वाजता युध्दाला तोंड फुटले. दुपारी विश्वासरावाला गोळी लागून ते घोड्यावरुन खाली पडले. त्यामुळे सदाशिवरावभाऊ गोंधळून गेले. त्यांचे देहभान सुटले व ते गर्दीत बघताबघता दिसेनासे झालेत. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड यांनी युद्धातून पाय काढला. नारोशंकर वगैरे दिल्लीच्या किल्लयात होते. होळकरांनी नारोशंकरास दिल्लीतून निघून जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील मंडळी गुरुवारपर्यंत धीर धरून होती. संध्याकाळी होळकर यांचे दिवाण गंगोबा तात्या पळत आले व वर्तमान सांगितले व सल्ला दिला की “ज्यास जो मार्ग भगवंत देईल, त्या मार्गे निघोन जावे.” त्यामुळे खजिना काढण्यास अनुकुल सापडले नाही. सैन्य इतके भेदरले की दिल्लीतील सैन्याची पळापळ सुरू झाली.

होळकर, नारोशंकर, पवार हे पानिपतहून पळून आले. त्यांचे सरंजाम पेशव्यांनी जप्त केले. पळून जाण्याऐवजी नारोशंकर दिल्लीस दडून बसला असते तर खजिना वाचला असता. पळणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देता आले असते व अब्दालीच्या सैन्याला अटकाव करता आला असता पण नारोशंकराने होळकरांच्या सांगण्यावरून पळ काढला व पेशव्यांची गैरमर्जी ओढवून घेतली.

पानिपतानंतर लवकरच पुत्र व भाऊंच्या वियोगाने नानासाहेबांनी प्राण सोडला व राघोबादादाने सन१७६१ मध्ये पेशवाईचा कारभार आपल्या हाती घेतला. सन १७६२ मध्ये नारोशंकरांना प्रतिनिधीचे काम देण्यात आले. पुढे ते महादजी शिंदे यांच्या पदरी दिवाणगिरी करीत. पण ती रघुनाथरावांच्यामुळे गेल्याने प्रतिनिधी भवानराव यांचेकडे कारभारी म्हणून नोकरीस असताना इ.स.१७७५ च्या २३ जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना रघुनाथराव (मालेगाव शाखा) व त्रिंबकराव (नाशिक शाखा) अशी दोन मुले होती.

श्री चित्रावशास्त्रीलिखित मध्ययुगीन चारित्राकोशात असा उल्लेख आढळतो की दिल्लीस असताना एका शिकारीच्या प्रसंगी त्याने बादशहाचे प्राण वाचवले. यावर बादशहाने संतुष्ट होऊन त्यांना राजेबहादूर हा किताब व मालेगाव हा गाव जहागीर देऊन इतर गावे सरंजामादाखल दिलीत.

भीमसेन कुलकर्णी संपादित पेशव्यांच्या बखरीत असाही उल्लेख मिळतो की सन १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने बऱ्याच जहागिऱ्या वाटल्या. त्या वेळी नारोशंकरांनी मालेगावची जहागिरी मागितली. भाऊंनी ती दिली. या जहागिरीत मालेगावातील एकुण आठ गाव व निंबायती परगणा यांचा समावेश होता. अशा रितीने नारोशंकराचा मालेगांव शहराशी प्रथम संबंध आला.

नारोशंकर हे उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर होते. पानिपत युद्धानंतर त्यांनी मालेगावला किल्ला बांधण्यासाठी घेतला. तत्पुर्वी मालेगाव हे एक खेडे होते. तेथे किल्लाही अस्तित्वात नव्हता. गिरणा व मोसम अथवा मोक्षगंगा या नद्यांच्या संगमापासून उत्तरेला सुमारे एक मैल अंतरावर हा मालेगांवचा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्याला लागूनच मालेगांव शहर वसले आहे. हा किल्ला खानदेशकी किल्ली म्हणूनही प्रसिद्ध होता. किल्ला पुर्ण होण्यास दहा वर्षे लागली. नारोशंकराने मालेगावला येऊन किल्ला बांधला असला तरी स्वत: येथे कधीही वास्तव्यास नव्हते.

थोडेसे म्हणता म्हणता बरेचसे झाले.आता वळूयात हरिहर किल्ल्याच्या माहितीकडे (Harihar Fort) ……

आश्रम पाहून पुन्हा हर्षगडाचा डोंगर चढून गेल्यावर काही वेळात आपण किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडा समोर येतो. इथून किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ होतो. अंदाजे ६०-७० अंशाच्या कोनात गगनाला भिडणाऱ्या पायऱ्या पाहून छाती दडपतेच. आता या पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्न मनात उभा रहातो. पण प्रत्यक्षात मनाचा हिय्या करून एक एका पायरीशी आपण सलगी करतो तेंव्हा त्या पायऱ्यांच्या दोन्ही टोकाशी हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या कोरल्याचे लक्षात येते. आणि जीव भांड्यात पडतो. जसजशा आपण पायऱ्या वर चढत जातो तसतसा आपला आत्मविश्वासही वाढत जातो.

अखेर ९०-९५ सोपानाची वाट चढताना स्वर्ग सुखाचा आनंद घेत घेत आपण महाद्वाराजवळ पोहोचतो आणि सुटलो बुवा एकदाचे करीत प्रवेशद्वारातून आत प्रवेशतो. हा दरवाजा छोटेखानी पण देखण्या स्वरूपाचा आहे. इथ वर येई पर्यंत मागे वळून पहाण्याचे घाडस होत नाही. मात्र येथून खाली नजर फेकताच एवढ्या चिंचोळ्या, अरूंद व खड्या जिन्याच्या खोल दरीतून वर आल्याबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची व पुढे निघायचे तत्पूर्वी गडाच्या प्रवेशव्दारा शेजारी उजव्याहाती कातळात  स्थानापन्न असलेल्या शेंदूरचर्चित गणेशाचे व मारुतीरायाचे दर्शन घेण्यास विसरायचे नाही. त्या शेजारी अस्पष्ट असे काही कोरून ठेवलेले आहे.

उजव्या हाती गडाचा काताळ, डाव्या हाती पाताळ दरी आणि वरच्या बाजूस कपाळमोक्ष करणारा काताळ अश्या अद्भुत मार्गाने आपला पुढचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी या मार्गाचा उल्लेख “रॉक कट् गॅलरी” (Rock Cut Gallery of Harihar Fort) असा केला याची आदराने जाणीव ठेवून अंग चोरत पुढे गेल्यानंतर काताळात कोरलेले आणखी दोन दरवाजे लागतात. हे पार केल्यावर परत पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. याच्या दोन्ही बाजूस आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत. तो पार केला की आपण अंतिम प्रवेशद्वारापाशी येतो. हा संपूर्ण १३० पायऱ्यांचा अद्भुत प्रवास कधी गुहेतून तर कधी नाळेतून झालेला असल्यामुळे कायम स्मरणात राहतो.

गडाचा शेवटचा दरवाजा लहान असून तो पार केला की आपण गडमाथ्यावर येतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या अंगास एक गुहा आहे. घसरण असल्यामुळे तिथ पर्यंत उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे आहे. ही गुहा पाहून वर यायचे व पुढे निघायचे. वाटेत काही घराची जोती व गडाच्या सदरेचे अवशेष दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याच्या टाक्या व पश्चिमेस भिंत बांधून पाणी अडविलेला एक प्रशस्त तलाव लागतो. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेले हनुमानाचे देऊळ व बाजूच्या उघड्या खडकावर एक शिवलिंग व नंदी आहे. उजव्या हाताला साधारण ५० फुट उंचीची एक टेकडी दिसते. शेवटचा काताळ टप्पा चढून ही टेकडी सर केली की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर अनेक देव-देवतांनी दाटी करून आपली जागा पटकावली आहे. कुणा एका दुर्गवी राने इथं एक भगवा ध्वज ही लावलेला आहे. आसमंताच्या निळाईवर माथ्यावरून उत्तरेला वाघेरा, दक्षिणेला वैतरणा तलाव व त्या मागे कवनाई, त्रिंगलवाडी तर पूर्वेला कापड्या, ब्रम्हा त्यामागे त्र्यंबकगड इत्यादी किल्ले पहाता येतात.

इथवरचा भाग बघून झाला की टेकडी उतरुन आल्यावाटेने परत फिरून गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे चालू  लागायचे. वाटेत एका सरळ ओळीत कातळात कोरलेल्या पाच पाण्याच्या टाक्या लागतात. टाक्यापाहून पुढं गेलं की घुमटाकार माथा वर कळस असलेली व अंदाजे तीस बाय बारा फूट अशी आयताकार दगडी कोठी लागते. संपुर्ण गडावर ही एकच वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे. उंचीला चार बाय अडीज असे खिडकी सारखे दिसणारे कोठीचे प्रवेशव्दार उंचावर आहे त्यामुळे आत उडी मारूनच प्रवेश करावा लागतो. या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या  डावीकडे खालच्या भागावर काहीतरी कोरलेले आहे. कोठीला दोन खण असून आत सदैव काळोखच असतो. त्यामुळे कोठीच्या एका भागात दिवा लावण्यासाठी धातूच्या पत्र्याची पणती रुतवून बसविली आहे. गडावर मुक्काम करायचा झाल्यास या एकमेव कोठीचाच आश्रय घ्यावा लागतो. गडावरील इतर वास्तूंपेक्षा दूर असल्यामुळे ही कोठी म्हणजे नक्कीच दारूकोठार असणार.

कोठी पाहून गडाच्या पूर्वेकडील टोकावर जात असताना वाटेत दोन पाण्याच्या टाक्या लागतात. त्या पुढे खळगा असून तो फक्त पावसाळ्यातच भरलेला असतो. पूर्वेकडील भागाला किंवा संपूर्ण हर्षगडाला सातशे आठशे फुटाच्या काताळाची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे गडावर जवळ-जवळ तटबंदी अशी नाहीच किंवा बांधली गेल्याच्या खुणा दिसत नाहीत. इथवर तीन-साडेतीन तासाच्या भटकंतीने आपले गडदर्शन पूर्ण होते. गड पाहून परत उतरताना मात्र विशेष काळजी घेऊन काळजीपूर्वक उतरावे लागते.

आता पाहूया या गडाचा इतिहास…… (Harihar Fort)

या गडाला हर्षगड असे नाव का पडले याची मनोरंनात्मक दंतकथा सागितली जाते ती अशी. मुगल सैन्याचा गडाला वेढा पडला. गडावर कमी शिबंदी असून सुध्दा ती गडावरुन दगडधोंडे फेकून मोगलांना वर चढू देत नव्हती. दोन महिने गड झुंजला. गडावरची धान्यसामुग्री संपत चालली होती. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न किल्लेदाराला पडला. तेव्हा त्याच्या म्हाताऱ्या आईला एक कल्पना सुचली. तिने आपल्या मुलाला म्हणजे किल्लेदाराला हजार दीड हजार पत्रावळ्या आणि मोठा टोप भर भात व वरण करायला सांगितले. दोन अडीज महिन्याचा वेढा बाहेरून कुमक, रसद मिळण्याची शक्यता मावळलेली. त्यातून गडावरील शिधा संपत आलेला. अश्यावेळी या म्हातारीला काय खा खा सुटलीय. परंतु मातृ हट्टपायी किल्लेदाराला आईचे बोलणे मान्य करावे लागले. गडावर पत्रावळ्या बनविल्या गेल्यात. भात डाळ शिजविले गेले. नंतर किल्लेदाराच्या आईने गडकऱ्यांच्या मदतीने तो भात वरणात कालवून पत्रावळीला फासला आणि वाजंत्री लावून नाचत गाणी गात आरडाओरडा करत त्या खरकट्या पत्रावळ्या गडावरुन खाली भिरकावल्या. गडावर वाजणारी वाध्ये, चाललेला जल्लोष व आतषबाजी पाहून अगोदरच दोन अडीज महिन्याच्या वेढ्याने  कातावलेल्या मुगल सैन्याच्या सरदाराला आश्चर्य वाटले.  वर लेकाचे खुशाल गाणी काय गाताहेत, नाच काय करताहेत, जेवणावळी काय उठताहेत, आनंदोत्सव काय साजरा करताहेत. या अर्थी गडावर शिधा साहित्य भरपूर आहे आणि इथे आपण अन्न-पाण्याशिवाय गडाखाली तळ ठोकून वेढा घालून बसलोय. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर आपण मात्र नक्कीच उपासमारीने मारून जावू. असा विचार करून मुगलांनी वेढा उठविला आणि चालते झाले. हे पाहून किल्लेदाराला प्रचंड हर्ष झाला. तेव्हा पासून या गडाचे नाव पडले हर्षगड.

हरिहर (Harihar Fort) उर्फ हर्षगड हा कुणी बांधला हे नक्की सांगता येण कठीण पण त्याची बांधणी पहाता तो प्राचिन काळात बांधला गेला असावा. याबाबत दुमत नाही. सुरवातीच्या काळात हा गड अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात असल्याचे पुरावे सापरतात. पुढे शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी इ.स.१६३६ साली त्र्यंबकगड घेताना हा ही किल्ला जिंकून घेतला. पुढे त्याचा ताबा मुघलांकडे गेला. इस. १६७० मध्ये स्वराज्याचे पंतप्रधान मारोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. शिवरायांच्या मृत्यू नंतर संभाजी राजांच्या धामधुमीच्या काळात हा किल्ला दि. ८ जाने. १६८९ रोजी मुघल सरदार महाबतखान याने हा किल्ला जिंकला. त्यावर मात म्हणून ताराराणीच्या काळात मराठ्यांनी हा गड पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला. शेवटी सन १८१८ मधे इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा ही गड मराठ्यांकडून जिंकून घेतला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांकडून भारताने स्वतंत्र मिळविले आणि सर्वच किल्ल्यांसह हरिहर उर्फ हर्षगडही (Harihar Fort) स्वतंत्र झाला.

लेखन, संकलन: संजय तळेकर (संजया उवाच्), मुंबई. भ्रमणध्वनी क्र. : 98202 38177

सूचना: ह्या लेखाचे संपूर्ण अधिकार लेखक संजय तळेकर, मुंबई यांच्याकडे असून त्याची नोंदणी केलेली आहे, ह्या लेखातील कुठलाही मजकुर अथवा छायाचित्रे यांचा वापर लेखकाच्या समंती शिवाय करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल. 

आधार व आभार…..

  • दुर्गांच्या देशा: भगवान चिल्ले
  • वारसा अतिताचा: पंकज समेळ
  • सरदार नारोशंकर राजेबहाद्दर: डी. एस्कु. लकर्णी
  • डॉ. रूपा गणेश मेस्त्री (Ph. D. संस्कृत) 

First Published on facebook on 04/04/2020 at : https://www.facebook.com/sanjay.talekar.92

  

हरिहर गडाची छायाचित्रे


आमचे गडकिल्ल्यांविषयीचे अन्य लेख:

१) त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर 

२) Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

३) Raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Acknowledgements: Article written by Mr. Sanjay Talekar more...

Similar Posts

2 Comments

  1. फार सुरेख आणि तपशीलवार माहिती मिळाली. धन्यवाद

    1. धन्यवाद, आमचे गडकिल्ल्यांविषयीचे इतर लेखही वाचून अभिप्राय द्या.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply