Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

Indian Flag taken to Wanar Lingi Pinnacle - वानरलिंगीवर तिरंगा नेला

Jivdhan Fort जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग कार्यक्रम – JIVDHAN FORT

भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ह्या उद्देशाने पुण्याच्या ‘राही ट्रेकर्स’ तर्फे जीवधनच्या वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग पद्धतीने चढाई करण्याचा साहसी कार्यक्रम जाहीर झाला, हे कळाल्यावर मी लगेचच नाव नोंदणी करून माझी जागा राखीव केली.

२५ जानेवारी २०२१च्या रात्री पुण्याहून सुटलेल्या खाजगी बसने एकेकाला सोबत घेवून साधारण रात्री ११ वाजता नाशिक फाटा सोडला. तेथून पुढे पुणे-नाशिक महामार्गाने चाकण, खेड, मंचर, नारायणगाव मार्गे जुन्नरहून जीवधनच्या पायथ्याशी पूर्वेला वसलेल्या घाटघर गावात रात्री (पहाटे) साधारण अडीचच्या सुमारास पोहोचलो. अगोदर ठरविल्याप्रमाणे सचिन पानसरे यांच्या घरी सर्वजण थांबलो. साधारण तासभर थांबून जीवधनकडे निघण्याच्या बेताने सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. पहाटे चार वाजता सर्वजण ताजेतावने होवून आम्ही तयार झालो, तोवर सचिन पानसरे यांच्या पत्नीने आमच्यासाठी गरमागरम चहा आणि कांदेपोहे तयार करून दिले. पहाटेच्या थंडीमध्ये वाफाळलेला चहा आणि ताजे कांदेपोहे खाण्याची मजा काही वेगळीच होती. अंगात थोडीफार उष्णता निर्माण झाली.

नाश्ता झाल्यावर आम्ही बसने निघालो. गाडीरस्ता चांगल्या असल्याने घाटघर गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर जीवधनच्या पायथ्यापर्यंत गाडीने जाता आले. बसमधून उतरल्यावर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात गोल करून सर्वजण उभे राहिले. ग्रुपलीडरने आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे. काय करू नये, काय काळजी घ्यावी याविषयी सूचना दिल्या. ट्रेकचा पुढील टप्पा हा जंगलातून असल्यामुळे किल्याकडे जाताना आणि किल्ला चढताना सर्वांनी एकामागे एक चालावे अशी सूचना दिली. नाणेघाट, जीवधन, घाटघर हा भाग सरकारने संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केल्याकारणाने सर्वांना काळजी घेण्यास सांगितले. त्याचा अनुभव बसमधून गावातून इथे येतानाच आला होता. मी बसमध्ये पुढच्याच सीटवर बसल्याकारणाने, बसच्या पुढ्यातच साधारण तीन फूट उंचीचे सांबर उड्या मारत गेलेले बसच्या प्रकाशात मला दिसून आले.

अजून पहाटेचा अंधारच होता. बॅटरी आणि मोबाईलच्या प्रकाशात आम्ही किल्ल्याकडे निघालो. जंगलातून जाणारा रस्ता संपल्यावर कल्याण दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर दगडात छानपैकी खोदलेल्या पायऱ्या लागतात. तेथे भिंतीवर हुक लावलेले आहेत, त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांना वर चढणे सोईचे होते. कल्याण दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. कल्याण दरवाज्यातून आता गेल्यावर थोडे ढासळलेले भंडारगृह दिसते. तेथील जवळच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. थोडे पुढे गेलयावर जीवाई देवीचे मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे खालच्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कल्याण दरवाज्याजवळील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्याच्या डाव्या बाजूला जरा खाली सपाटीला आले कि वानरलिंगी सुळका दिसतो. वानरलिंगी सुळक्याची उंची साधारण ३८५ फूट (११७ मीटर) आहे आणि जीवधनच्या भिंतीपासून वानरलिंगीचे अंतर सुमारे ३३० फूट (१०० मीटर आहे). वानरलिंगीचा सुळका (वानरलिंगीला खडा पारशी ह्या नावानेही ओळखले जाते) आणि त्याचे किल्यापासूनचे अंतर पाहून आपल्याला काय साहस करायचे आहे हे समजल्यावर अजून उत्साह निर्माण झाला.

‘राही ट्रेकर्स’चे काही प्रशिक्षित सदस्य एक दिवस अगोदरच तिथे गेले होते. त्यांच्या टेक्निकल टीमने आदल्या दिवशी दुपारीच वानरलिंगीवर चढाई करून जीवधन ते वानरलिंगीचा रूट सेटअप करून ठेवला होता. जीवधन ते वानरलिंगी व्हॅलीक्रॉसिंग करण्यासाठी पूर्णपणे तांत्रिक साहित्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणून आम्ही साईटवर पोहोचल्यावर गटप्रमुखाने आम्हाला प्रथम आपण आजच्या प्रजासत्ताक दिनी कोणते साहस करण्यासाठी जमलो आहोत ते स्पष्ट केले आणि सुरक्षा आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या. ते ऐकल्यावर समोरचा अधांतरी दिसणारा वानरलिंगीचा सुळका आम्हाला खुणवायला लागला. त्यानंतर आम्हाला कॅरेबीनर (Carabiner), हार्नेस (Harness), नायलॉन दोऱ्या इत्यादी गिर्यारोहणाच्या साहित्याची ओळख करून दिली.

वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग Jivdhan Fort- Vanarlingi Valley Crossing

कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी स्वतंत्र भारताच्या ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रगीत गायन केले आणि शिवगर्जना दिली. सर्वांना हार्नेस (Harness) आणि कॅरेबीनर (Carabiner), हेल्मेट, हातमोजे घालायला दिले. अनुभवी सदस्यांनी इतरांना मदत केली. सकाळी ९.३० ला आम्ही कार्यक्रमास सुरुवात केली. पहिल्यांदा जाणाऱ्या सदस्याने तिरंगा फडकवीत व्हॅलीक्रॉसिंग केले आणि वानरलिंगीवर जावून सुळक्यावर तिरंगा फडकविला.

व्हॅलीक्रॉसिंग करीता माझा तिसरा क्रमांक होता. थोडेसे धडधडतच मी जीवधनच्या कड्यावरून व्हॅलीक्रॉसिंग सुरु केले. अन क्षणातच माझ्या मनात पूर्ण आत्मविश्वास निर्माण झाला कि, ‘अरे, हे तर खूप सोपे आहे’. मग मी माझे दोन्ही हात सोडून घरंगळत रोपवरून पुढे जाऊ लागले. वानरलिंगीच्या दिशेने पुढे सरकताना हवेत अधांतरी तरंगत असल्यासारखे वाटू लागले. वानरलिंगी सुळक्याचा पायथा केवळ ३८५ फूट होता. पण खालच्या बाजूला कोकणातील गावे सुमारे २००० फुटापेक्षा खोल दिसत होती. नुकतेच धुके निवळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे दूरवरच्या डोंगरावर धुक्याची चादर दिसत होती. हे सर्व दृश्य नजरेत साठवून ठेवेपर्यंत मी पोचले सुद्धा वानरलिंगीवर. मला वानरलिंगी व्हॅलीक्रॉसिंग करण्यास १ मिनिटापेक्षा कमी वेळ लागला. एवढ्या काही सेकंदातच मी सुमारे १०० मीटर (३३० फूट) अंतर पार केले होते. एक मस्त आणि थरारक अनुभव होता तो. वानरलिंगीचा सुळका रॅपलिंग करताना किंवा आरोहण (चढाई) करताना मार्गात सुळक्यावरील मधमाशांच्या पोळ्याकडे लक्ष ठेवूनच मार्ग आखावे लागतात.

एक थरारक अनुभव अजूनही माझी वाट पहात होता. वानरलिंगी पोहोचल्यावर कॅरेबीनर काढून दुसरा सेफ्टी रोप लावून थोडावेळ एका बाजूला बसविले. थोड्या वेळाने दुसरे कॅरेबीनर आणि रोप लावून वानरलिंगीचा सुळका रॅपलिंग करून खाली उतरावे लागले. ‘राही ट्रेकर्स’चे तीन प्रशिक्षित सदस्य वानरलिंगीवर होते ते ही सर्व व्यवस्था समर्थपणे पार पाडत होते. वानरलिंगीचा सुळका सुमारे ३५० फूट (११० मीटर) रॅपलिंग करून खाली आल्यावर जीवधन आणि वानरलिंगीला जोडणाऱ्या घळीतून आम्ही पुन्हा जीवधनवर आलो. अशा तऱ्हेने सर्व सदस्यांनी जीवधन ते वानरलिंगी व्हॅलीक्रॉसिंग पूर्ण केले. त्यांनतर आम्ही जीवधन किल्यावर एक फेरफटका मारून किल्याची माहिती घेतली.

दुपारनंतर आम्ही जीवधन किल्ल्यावरून पुन्हा घाटघरकडे निघालो. आणि रात्री १०च्या सुमारास पुण्यात परत पोहोचलो.

राही ट्रेकर्सचे संस्थापक सदस्य अभिजित विश्वकर्मा आणि टीम लीडर निखिल कोकाटे आणि अन्य सदस्य ह्यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन नियोजनपूर्वक केले होते. आणि कुठल्याही सहभागी सदस्याला काही अडचण भासू दिली नाही आणि आम्हाला एक साहसी अनुभव मिळाला ह्याबद्दल त्यांचे आभार.

हा जीवधन ते वानरलिंगी व्हॅलीक्रॉसिंगचा कार्यक्रमाचा थरार कायम लक्षात राहणार हे नक्की.

शब्दांकन: नितु हार्दिक सावंत

संकलक – चारुदत्त सावंत , संपर्क: ८९९९७७५४३९


आता आपण जीवधन किल्ला ( Jivdhan Fort ) आणि त्याचा सोबती नाणेघाट (Nane Ghat) यांचा इतिहास आणि भूगोल पाहूया.

भारताच्या पश्चिम घाटातील (Western Ghats of India) सह्याद्रीच्या रांगेत महाराष्ट्रातील पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या काठावर आणि नगर जिल्ह्याच्या हद्दी पासून जवळ जीवधन किल्ला वसलेला आहे. जीवधन किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ११४५ मीटर (३७५४ फूट) आहे. तसेच हा किल्ला पायथ्यापासून १००० फुट उंचावलेला आहे. जीवधनच्या उत्तरेला सुमारे २ किमी अंतरावर सातवाहनांच्या काळापासून प्रसिद्ध असलेला नाणेघाटाचा अंगठा उंचावलेला दिसतो. महाराष्ट्रातील ‘जीवधन, नाणेघाट, चावंड, हडसर आणि शिवनेरी’ ह्या गिर्यारोहकांच्या पाच आवडीच्या गिरीभ्रमंती मार्गात जीवधन आहे.

जीवधनच्या जवळचा नाणेघाट हा एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. सुमारे २००० वर्षांपूर्वी घाटावरील सुप्रसिद्ध बाजारपेठ जुन्नरला कोकणातील सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण या दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांदरम्यानच्या व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडण्याकरीता हा घाटमार्ग तयार करण्यात आला. इसवीसन पूर्व पहिल्या शतकात मौर्य राजानंतर सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या मार्गाची वरची बाजू जुन्नरच्या दिशेला, तर खालची बाजू कोकणात ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावाजवळ आहे. हे वैशाखरे गाव सध्याच्या कल्याण ते अहमदनगर राज्यमार्गावर माळशेज घाटाच्या अलीकडे आहे. नाणेघाटाचा मार्ग तसा उंचीला कमी आणि चढण्यासाठी सोपा असा निवडलेला आहे. पण नाणेघाटातील सर्वोच्च शिखर नानाचा अंगठा, याची उंची समुद्रसपाटीपासून २७२४ फूट आहे. नाणेघाटात जुन्नर बाजूस जकातीसाठी रांजण आहे. हा टोल संस्कृतीचा सर्वात जुना पुरावा आढळतो. भग्न अवस्थेतील मोठा रांजण तेथे आजही पहावयास मिळतो.

नाणेघाटाच्या पठाराच्या दक्षिणेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जीवधन किल्ला आहे. हा जीवधन किल्ला नाणेघाटाच्या या प्राचीन व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला असावा.

किल्ल्याचा दिशादर्शक नकाशा

किल्ल्याचा दिशादर्शक नकाशाhttp://www.geocities.ws/drchengalva/maps/Naneghat.pdf 
(contributed by Sachin Joshi). Summit: 19.27417 N, 73.68944 E, elevation: 3749 feet (1143 meters)

‘दुर्गत्रिकुट: महिपतगड, सुमारगड नि रसाळगड’

जुन्या पिढीतील गिर्यारोहक स्व. तु. वि. जाधव (मुंबई) ह्यांचा जुना लेख येथे वाचा


जीवधन किल्ल्यावर जाण्याच्या वाटा:

पहिली वाट: कल्याण-अहमदनगर राज्य महामार्गाने नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या दक्षिणेस (उजव्या बाजूला) जाणारी वाट व वानरलिंगीचा सुळका नजरेसमोर ठेऊन चालावे. वाटेत दोन ओढे ओलांडल्यावर उभी कातळभिंत लागते. तिच्या उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८ साली इंग्रजांनी ही वाट चिणून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे.

दुसरी वाट: जुन्नर – घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.

किल्ल्यावर राहण्याची सोयः नाही.

किल्ल्यावर जेवणाची – पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.

किल्ल्यावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर – घाटघर मार्गे – अंदाजे २ तास.

छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या अहमदनगरच्या निजामशाहीला जीवदान देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १६६३ साली निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा (दहावा-अकरावा) वंशज ‘मुर्तिजा निजाम’ याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर सुखरूप नेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. तात्कालिक राजकीय परिस्थितीचा फायदा उठवून स्वराज्याच्या दिशेने शहाजीराजांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. शहाजीराजांनी ३ वर्षे मोगलांशी लढा देऊन निजामशाही वाचविन्याचा प्रयत्न केला.

जीवधनचा पश्चिम दरवाजा (कल्याण दरवाजा) कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. ह्या पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला ‘कोठी’ म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. जवळच पाण्याची टाकी आहेत. कल्याण दरवाज्याजवळील दगडातील कुंडातील पाणी पिण्या योग्य आहे. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामध्ये कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख काही वर्षांपूर्वी या कोठारांमध्ये पहावयास मिळायची.

गडाचा आकार आयताकृती आहे. जीवधनच्या उत्तरेस कळसुबाई, रतनगड, आजोबा, नाप्ता आणि त्यांच्या पलीकडे लांब अलंग, मलंग, कुंलग, दक्षिणेस भीमाशंकर आणि त्याच्या अलीकडील ढाकोबा, दुर्ग, मच्छिन्द्रगड, गोरखगड, उत्तर पूर्वेस हरिश्चंद्रगड, उत्तर पश्चिमेस माहुली नजरेस पडतात. तर दक्षिण पश्चिमेस सिद्धगडाच्या मागे, माथेरान, चंदेरी, हाजी मलंगची शिखरे देखील पाहावयास मिळतात. तसेच जुन्नरच्या दिशेने सभोवती निमगिरी, हडसर, चावंड आणि शिवनेरी इत्यादी गडकिल्ले, डोंगर पाहावयास मिळतात. पश्चिमेला खालच्या बाजूस धसईचे छोटेसे धरण, तर पूर्वेस चावंड किल्ल्याजवळील कुकडेश्वराचे मंदिर असा भलामोठा रमणीय भूप्रदेश आपल्या नजरेसमोर उभा राहतो.

View for Sahyadri Range from Jivdhan Fort

जीवधनच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू‘ हि मोठी खार आढळते. पावसाळ्यात नाणेघाट ते जीवधन दरम्यानच्या सपाटीला पश्चिमेच्या कड्यावर उलटा धबधबा (Reverse Waterfall) हमखास पाहावयास मिळतो.


जीवधन किल्ल्याची ब्रिटिशकालीन गॅझेट मधील माहिती:

संदर्भ: https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona%20District/places_j.html#.

Jivdhan, [Deccan Papers, No. 60; Mr. J. McLeod Campbell, C. S.]about 3000 feet above sea-level and about 970 feet above the plain, is a dismantled fortress commanding the Nana pass sixty-five miles north-west of Poona and sixteen miles west of Junnar. The fort, which is about 1000 yards long by 500 broad and nearly two miles round, stands within the village limits of Ghatghar on a steep and rugged hill which rises about a thousand feet above the crest of the Nana pass. Jivdhan is a square stack of a hill rough on all sides surrounded by steep precipices and presenting an abyss on the Konkan side so sheer that a stone dropped would fall almost 2000 feet into the Konkan at the foot of the Sahyadris. [Hamilton s Description of Hindustan, II. 48,] In general effect Jivdhan is much like Shivner. It differs in three points. The east scarp of Jivdhan is highest near the middle of the hill face while in Shivner the middle part is the lowest; the north point of Jivdhan is much squarer and blunter than the north point of Shivner; and the upper hill in Jivdhan is higher than the upper hill in Shivner. The road from Junnar to the foot of Jivdhan is fit for laden cattle. The ascent, which is about a mile long, is very steep and difficult and consists mostly either of loose masonry or steep sheets of rock not difficult for bare feet but troublesome for boots. For about 300 feet of the ascent a profile of rock has the remains of a stair of steep high and narrow steps with nothing below and very little on either side. The hundred feet in the middle of the stair were blown away when the fort was dismantled about 1820. Of the blown away section the middle part is not difficult to climb on all fours or to come down barefoot face foremost. But about a third at the lower and another third at the upper ends are extremely-steep. Except the hillmen few natives can go up the steepest parts and few Europeans can climb them without a rope and bare feet. The climber’s only helps are small foot-holds which the people have cut in the rock and finger-holds in the bottoms of some of the 1820 blasts. The main gate was on the west towards the Nana pass with what apparently was a fine ascent, a long steep stair partly built and partly rock-cut climbing a narrow gorge completely commanded by the fort. The ascent led to a landing place, a square well about thirty feet deep, and, out of the well, the ascent passed by a tunnelled rock-cut stair to the gate. The stair was blown away and the tunnel filled in 1820 and the gate is now useless. The top has five cisterns which form the main water-supply, and some apparently Buddhist caves with a substantial Muhammadan building in front, plain and with solid masonry arches. Each compartment of the Muhammadan building has a saucer-shaped roof of good well-fitting masonry. The chief Buddhist cave (36′ X 21′ X15′) has a smaller cave on either side and a veranda in front. The caves were used as granaries and when the fort was captured in 1818 they were found stored with grain. The grain was burnt and its ashes remain ankle deep. Jivdhan commands a splendid view west to the Salsette hills, Tungar, and Kaman in Bassein, and, on a clear November day, to the sea.

History

In 1489 Jivdhan was taken by Ahmad I. the founder of the Ahmadnagar Nizam Shahi family (1490-1636), and in 1637 it was one of the five Poona forts which Shahaji gave to the Moghals. [Elliot and Dowson, VII. 60; Grant Duff’s Marathas, 53.] In the 1818 Maratha war a brigade under Major Eldridge reached Jivdhan on the 3rd of May 1818. The commandant who had been summoned to surrender two days before, declined to give up the fort saying he would fight for eight days. An advanced reconnoitring party under Captain Nutt of the Engineers, were frequently fired on from the guns and matchlocks in the fort but without loss. A spot was chosen for the mortars and a battery for two brass twelve-pounders till eighteen-pounders could be got ready to play on the masonry about the gate. The mortars opened at about twelve o’clock and after an hour’s firing of about twenty shells a man was sent down to say that the garrison would open the gate. This was immediately taken possession of by a party of the Bombay European Begiment. The garrison was disarmed and dismissed. [Maratha and Pendhari War Papers, 294. An officer in Major Eldridge’s force describes Jivdhan (Bombay Courier, 16th May 1818) as absolutely impregnable as it had bombproofs for the garrison to retire to. The last flight of steps which led to the fort consisted of 240 rock-cut steps each 14 foot high and as steep and hard to climb as a ladder. Midway down the hill on the north-west a level ran out for 100 yards and the mountain then became as steep as before. From the edge of the small level rose a natural pillar of rock about 300 feet high nodding over the abyss below. On the south-west the hillside was so steep that a stone dropped from the hand would reach the Konkan about 2000 feet below.]

संदर्भ:

  1. http://trekshitiz.com/marathi/Jivdhan-Trek-J-Alpha.html
  2. https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona%20District/places_j.html#.
  3. https://mr.wikipedia.org/wiki/
  4. Trek the Sahyadris : Book by Harish Kapadia
  5. http://www.geocities.ws/drchengalva/maps/Naneghat.pdf (contributed by Sachin Joshi). Summit: 19.27417 N, 73.68944 E, elevation: 3749 feet (1143 meters)

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: