Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा
Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा
इर्शाळगडाचे छायाचित्र सौजन्य: Photo downloaded from : https://en.wikipedia.org/wiki/Irshalgad, Irshalgad_plateau_and_pinnacle: Photo By Bhanu1313 – Own work, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=42361219,
Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा
धनंजय मदन व त्याच्या निसर्गमित्रच्या शिलेदारांना इर्शाळगडावर श्रमदान करताना ISHRAHALGAD CAVE – इर्शाळगडावर एक अज्ञात गुहा सापडली. त्यावर स्वस्थ न बसता धनंजयने मुंबईच्या काही मित्रांना घेऊन पुन्हा एकदा त्या गुहेचा मागोवा घेतला.
आपल्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर व सह्याद्रीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जसे चाणाक्ष हेरखाते नेमले तसेच गडकिल्ल्यांची निर्मिती केली. संरक्षणाच्या दृष्टीने टेहळणीसाठी काही नवीन किल्ले बांधले. तर जुन्यांची डागडुजी करून निगा राखली. अश्याच एका सह्य टेकडीवर त्या काळातला एक किल्ला अजूनही उभा आहे ‘इर्शाळगड‘. त्याचं जुनं नाव ‘विशालगड‘.
आता इर्शाळगडावर ना तटबंदी राहिली आहे ना बुरूज, पण तेथील भग्नावशेष या गडाच्या भूतकालीन वैभवाची साक्ष देतात. पनवेलच्या ‘निसर्गमित्र’ या संस्थेने श्रमदान करताना अलिकडेच इर्शाळगडावर एक अज्ञात गुहा शोधून काढली. गिर्यारोहण क्षेत्रातील गुहा संशोधनाच्या इतिहासामध्ये इतका मोठा शोध बऱ्याच वर्षानी लागला आहे. त्याचे सर्व श्रेय ‘निसर्गमित्र’ आणि त्याचे अग्रेसर व धडाडीचे कार्यकर्त धनंजय मदन यांनाच द्यायला हवे.
पनवेलहून चौक गावच्या उत्तरेला नजर टाकताच, एका डोंगर सोंडेच्या मागे लपलेला इर्शाळगड तीन मैलावर असलेल्या नढाळ नावाच्या खेड्यात तो मोडतो. मुंबई-पुणे महामार्गावर व चौक गावच्या विरुद्ध दिशेला धरणामुळे नवीन वसवलेली गावे लागतात. तिथे आता कर्जत-पनवेल लोहमार्गाचे कामही जलद गतीने सुरू आहे. वस्ती ओलांडून डोंगरसोंडेच्या पायथ्याशी यायला आपल्याला अर्धा तास पुरे होतो. मग लागते सोंडेवरची खडी चढण. नागमोडी वळणाने वर जाणारी पाऊलवाट आपली थोडीशी दमछाक करते. परंतु आल्हाददायक वाहणारे वारे आणि वरून खाली दिसणारे मनमोहक दृश्य आपल्याला थकवा विसरायला लावते. आसमंतातील माथेरान, धावरी नदीचे खोरे, त्यावरील धरण, महामार्ग, चौक फाटा व तेथे वसलेली वस्ती, माणिकगड, कर्नाळा सहज ओळखता येतात. येथून वर जाणारी पाऊलवाट आपल्याला न चुकवता अन न चकवता इर्शाळवाडीत आणून सोडते.
इर्शाळ माचीवर पंधरा-वीस पारधी आडनावाची आदिवासी जमात मागासलेपणाचा शाप घेऊन आपल्या कुडाच्या चंद्रखणी झोपडीत जीवन कंठित आहेत. पावसाळ्यात भातशेती करणे आणि उन्हाळ्यात अर्ध्यामूर्ध्या भरलेल्या विहीरीच्या कातळातून पाणी खरवडून आपली तहान भागविणे हा जरी त्यांचा नित्यक्रम असला तरी इथं मनाची श्रीमंती इरावती कर्वे यांच्या ‘पाडावरच्या कोऱ्या चहा’ सारखी चटकन जाणवते. भोवताली जमलेल्या मुलांपैकी एकाला मी विचारलं,”शाळेत जातोस का रं?’ त्यानं मान डोलावली. बाय काय शिकवत्यात?’ तो म्हणला- ‘गाणं’. सर्व साक्षरता अभियानामध्ये सामील असलेल्या आणि निरक्षर गावाला साक्षर करण्यासाठी नेमणूक केलेल्या पण एक-दोन दिवस आड करुन शाळेत येणाऱ्या त्या बाईंबद्दल मला त्यावेळी कौतुक वाटलं.
इर्शाळ माचीवर येताना उजवीकडील आदिवासींची घरं सोडल्यास, डावीकडील पाऊलवाट एका भल्यामोठ्या आम्रवृक्षाच्या छायेखालून गडाचा कुठलाही मागमूस न दाखविता, गडावरील सुळक्याला अर्धवळसा मारून पश्चिमेस आणून सोडते. गडाच्या मध्यभागाकडून सुळक्याच्या दिशेला गड चढाईची वाट सुरू होते. शेवटच्या टप्प्यात प्रस्तरारोहणाच कसब लावून वर आलं की उजव्या हाताला सहा बाय दोन फूट व पुरुषभर खोल असलेलं पाण्याचं टाकं लागतं. ते ओलांडून वर गेलं की दोन वाटा फुटलेल्या दिसतात. डावीकडील वाट आपल्याला ‘विशाळा’ देवीपाशी घेऊन जाते. हाती आयुधे घेऊन रेड्यावर आरूढ असलेल्या दैत्यांचा नाश करणारी ही देवी आपलं मूळचं घरटं सोडून इथं उघड्यावर विराजमान झाली आहे. विशाळादेवी वरूनच गडाचं नाव विशाळगड पडलं असलं तरी माचीवरील आदिवासींच्या उच्चाराप्रमाणे अपभ्रंश करीत विशाळ – विशाल – इशाल असं झाले आणि पुढे आपण शहरी पदभ्रमणकारांनी त्याचं नामाविधान केलं “इर्शाळगड”. ही नामोत्पत्ती कधी झाली हे मात्र निश्चित सांगता यायचं नाही.
विशाळादेवीचं दर्शन घेऊन माघारी येऊन पुन्हा थोडंसं वरच्या दिशेस सरकलं की आपण इर्शाळगडाच्या नेढ्यात प्रवेशतो. इथून उत्तरेला साधारण दीड दोनशे फूट उंचावलेला सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालीत असतो. सुरवातीला चाळीस फूट उंचीची प्रस्तर भिंत सर करून पहिला टप्पा गाठल्यावर पुढील शंभर फुटांची निसरडी वाट चालत पार केली की मुख्य सुळका चढाईस प्रारंभ होतो. माथ्यावर आरोहण करण्याचे दोन मार्ग आहेत पैकी एक सर्वसाधारण व दुसरा किंचितसा कठीण. मध्यम श्रेणीचं हे प्रस्तरारोहण करताना मात्र पाठिशी अनुभव हवा. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहक मंडळींनी आपल्या अनुभवानुसार प्रस्तरारोहण साहित्यासह सुळक्याचा माथा गाठावा.
प्रस्तरारोहण करण्यापूर्वी सुळक्याच्या पायथ्याशी डावीकडे पोटात एक लहानसं टाकं लागतं, तर उजवीकडे उंबराच्या झाडाशी असलेलं एकखांबी टाकं थेट शालीवाहन काळाशी नातं सांगतं. या गडावर एकूण सहा पाण्याच्या टाक्या व चार कातळात खोदलेल्या कोठड्या असल्याची नोंद आहे. आता मात्र या कोठड्या ढासळलेल्या असून त्या फक्त खुणेनेच दाखवता येतात. १२१३ फूट उंची लाभलेल्या या गडमाथ्यावरून आसमंतातील माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, सांगशी, माणिकगड, राजमाची, ढाक, भीमाशंकर, नागफणी, तैलबैला, कोरीगड, धनगड अगदी सहजच ओळखता येतात.
इर्शाळगडाचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. परंतु मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी ते रायरी पावेतो सारा मुलुख मराठ्यांनी जिंकून स्वराज्याला जोडला तेंव्हा त्यात हा गड देखील ताब्यात आला असावा. सरसेनापती नेताजी पालकर यांचा जन्म इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावचाच.
इंग्रजांच्या काळात मुंबईच्या उष्म्याने कासावीस झालेले गोरेसाहेब मंडळी आपल्या मडमाना घेवून हवापालटासाठी माथेरानला जात. तेथून दिसणाऱ्या इर्शाळगडाच्या सुळक्याच्या चढउतारामुळे ते या गडाला ‘सॅण्डल हिल’ म्हणू लागले. स्थानिक लोक या गडाला ‘जिनखोंड’ म्हणतात. जिन म्हणजे बौद्ध किंवा जैन श्रावके (भिक्षुक) किंवा ईश्वर व खोंड- खोंडा म्हणजे डोंगरातील मोठी पोकळी किंवा मधला संधी प्रदेश. तसेच वि म्हणजे मोठं व शाल म्हणजे सभागृह.
इर्शाळगडावरील गुहेत प्रवेश (Inside Irshalgad Cave)
गडदर्शन पूर्ण करून आपण पुन्हा गडचढणी वरील मधल्या टाकीजवळ येताच उजव्या हाती तिरपी उतरणारी आणखी एक वाट दिसते. वाटेत एक पाण्याचं टाकं लागत ते ओलांडून सावधपणे खाली उतरत गेलं की आपण गडमाचीपासून दहापंधरा फुटाच्या उंचीवर येतो. इथं थांबून उजव्या बाजूला पाहिलं की वळसा घेत वर चढत जाणाऱ्या तुटक पायऱ्या असलेली वाट दिसते. हीच वाट या नव्याने सापडलेल्या गुहेच्या तोंडापाशी जाते.
बारा फूट रुंद आणि आठ फूट उंच अंडाकृती असलेल्या या अज्ञात गुहेत आम्ही प्रवेशताच मघापासून आम्हाला भारवल्यागत गडदर्शन करवणारा धनंजय मदन एकदम स्तब्ध झाला. थोड्या वेळानं धनंजयने गड व त्यावरील टाकीसफाई करताना आलेले अनुभव, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पायऱ्या व सापडलेली गुहा याबद्दल आपुलकीने सविस्तर माहिती सांगितली. हे सांगताना त्याच्या शब्दात व चेहऱ्यावर ‘मी’ पणाचा किंचितही लवलेश नव्हता. आनंद, समीर, हमिदा व मी मिळून धनंजयचं कौतुक करून त्याचं अभिनंदन केलं.
विधाता सह्याद्रिला जन्म देत होता तेव्हा त्याच्या उदरात असलेले हवेचे बुडबुडे लाव्हारस थंड होताना आतच अडकून राहिले. पुढे धूप व पर्जन्यवृष्टीमुळे हे बुडबुडे मोकळे होऊन गुहेच्या रूपाने प्रकट झाले. पाच कंगोऱ्यांच्या टप्प्यात असलेली ही पंच्याहत्तर फूट लांब गुहा रायगडा जवळील नाचणटेपाच्या डोंगरामधील गुहे प्रमाणे पूर्णत: नैसर्गिक आहे. हिचा पहिला टप्पा आठ फूट व्यासाचा व वीस फूट लांब असून डाव्या बाजूस मनुष्यनिर्मित बैठक कोरलेली आहे. दुसरा व तिसरा टप्पा जवळजवळ सारखाच असून सहा फूट व्यास व पंधरा फूट लांब आहे. चौथा टप्पा चार फूट व्यासाचा व वीस फूट लांब असून यात वर चढून प्रवेश करावा लागतो. शेवटच्या टप्प्याचे तोंड एक फूट आखूड व्यासाचे असल्यामुळे आत सरपटत प्रवेश करावा लागतो. आतील जागा पाच फूट लांब, तीन फूट रुंद व तीन फूट उंच असून त्यात सहजतेने सहाजण बसू शकतात. पश्चिमाभिमुख असलेली ही गुहा आतपर्यंत बघून आम्ही सर्वजण गुहेच्या तोंडापाशी जमलो. तो दिवस होता ८ जुलै, २००१.
दुर्गभ्रमणगाथाकार गोनीदा यांना मी एकदा राजगडावर विचारलं होतं की “अप्पा आनंद कसा शोधायचा?” माझ्या डोक्याचे केस हलकेच कुरवाळत ते मला म्हणाले, “हे बघ जेव्हा आपण कुठेही फिरत असतो तेथे कोणतीही गोष्ट नव्याने सापडली तर तो आनंद समजायचा”. आज धनंजय उर्फ आप्पाने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (ते ही अप्पा आणि इथंही आप्पाच कारण निसर्गमित्रसह सर्वजण धनंजय मदनला आदराने आप्पाच म्हणतात) आम्ही सर्वांनी गो. नीं. च्या पुण्यस्मृति जागवत डोंगरउताराच्या हिरवळीवर उगवलेल्या रानफुलांचा लहानसा गुच्छ बनवून गुहेतील बैठकीवर ठेवला व अप्पांना आदरांजली वाहिली.
सकाळपासून आमच्यासोबत पायाला भिंगरी लावल्यागत भिर-भिर फिरणाऱ्या धनंजयला एव्हाना ऑफिसची ओढ जाणवू लागली. आम्ही गडदर्शनाच्या नादात त्याला दुसऱ्या पाळीसाठी कामावर जायचे आहे हेही विसरुन गेलो होतो. कसा तरी आम्हाला प्रेमाचा निरोप देत जड अंतःकरणाने धनंजय वळला व हळूहळू दाटलेल्या धुक्यात दिसेनासाही झाला.
आम्ही हात उंचावून निरोप देत त्याच्या धूसर होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो… वेड्यागत…!
म्हणतात ना, सैन्य पोटावर चालते, आणि हेच खरं आहे!
लेखक: संजय तळेकर
पूर्वप्रसिद्धी: दैनिक सामना, मुंबई, ऑगस्ट २००१.
लेख आणि छायाचित्रे सर्वाधिकार: श्री. संजय तळेकर, मुंबई । ९८२०२३८१७७
इतर सर्वाधिकार: चारूदत्त सावंत, २०२१ । ८९९९७७५४३९
इर्शाळगडावरील गुहेची छायाचित्रे
Dhanajay Madan inside Cave. Cave on Irshalgad fort, Sanjay Talekar inside of Cave. Cave on Irshalgad fort, near Panvel, Maharashtra. Photo by: Sanjay Talekar, Mumbai Cave on Irshalgad fort Cave on Irshalgad fort Cave on Irshalgad fort, near Panvel, Maharashtra. Photo by: Sanjay Talekar, Mumbai Anand Shinde inside Cave. Cave on Irshalgad fort, near Panvel, Maharashtra. Photo by: Sanjay Talekar, Mumbai Sanjay Talekar, Hamida Khan, Smaeer Paranjape and Dhananjay Madan inside of Irshalgad Cave

Good one 👌🏽
अप्रतिम…👌👌👌