Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन
भाग २ : एक दिवसाची सुट्टी !
पुण्याच्या ससून हॉस्पिटलला सर्जरी रेसिडेंट म्हणून जॉईन होऊन मला आता ७-८ महिने झाले होते. डॉ. करमरकर सरांसारखे निष्णात सर्जन माझे गाईड होते. येणारा प्रत्येक दिवस नवीन अनुभव देऊन जात होता. सकाळी ६ वाजता वॉर्ड राऊंड चालू व्हायचा ते रात्री २-३ वाजेपर्यंत काम चालायचे. रात्री देखील मी वॉर्डमध्येच पेशंटच्या शेजारच्या १ नंबर बेडवर झोपायचो. त्यामुळे रात्री एखादा पेशंट सिरिअस झाला तर पटकन बघता यायचे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हॉस्टेलला जाऊन आंंघोळ करण्याइतकाच वेळ मिळायचा. पोटात भूक आणि डोळ्यांत झोप २४ तास सोबत रहायची.
पण काम जरी शारिरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलिकडचे असले तरी पेशंटचे प्रेम खूप मिळायचे. काही पेशंट बरे होऊन घरी जाताना सिस्टरना माझ्यासाठी शाल किंवा बेडशीट आणून द्यायचे व सांगायचे, “रात्री झोपल्यावर सरांच्या अंगावर शाल घालत जावा आणि बेडशीट रोज बदलत जावा.” काही वेळा पेशंटचे नातेवाईक बाहेर चहापाण्याला गेले की माझ्यासाठी हमखास एखादा बिस्किट पुडा किंवा वडापाव आणून ठेवायचे.
अशाप्रकारे माझे सर्व छान चालले होते. मजा यायची काम करायला. आता दिवाळीचा सण अवघ्या ४-५ दिवसांवर आला होता. माझ्या युनिटमध्ये मी एकटाच ज्युनिअर रेसिडेंट असल्यामुळे मला पुढची ३ वर्षेतरी एकही दिवस सुट्टी घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मी दिवाळीला घरी येणे शक्य होणार नाही असे घरच्यांना सांगितले होते. तरीही त्यांची भोळीभाबडी आशा होती की, मला एखादा दिवस तरी सुट्टी मिळेल! अशातच करमरकर सरांचा माझ्या सिनिअरना फोन आला, ते म्हणाले, “प्रविण चांगले काम करतोय, त्याला दिवाळीला एक दिवस सुट्टी घेऊ दे.”
एक दिवस सुट्टी! नुसत्या कल्पनेनेच किती आनंदलो होतो मी! घरी सुट्टी विषयी सांगितल्यानंतर घरच्यांना तर काय करु आणि काय नको असे झाले. ३ नंबर युनिटच्या सिनिअरनी त्यांच्या एका रेसिडेंटला एक दिवस माझ्याऐवजी काम करण्यासाठी पाठवण्याचे कबूल केले (याला लोकम रेसिडेंट म्हणतात) आणि माझी सुट्टी फिक्स झाली.
मला सोमवारी, दिवाळीच्या पहिल्या आंघोळच्या दिवशीच सुट्टी मिळणार होती. मी आता आणखीन जोमाने कामाला लागलो. त्या एका दिवसात बाकीच्यांना काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून शक्य ती सर्व कामे आधीच करुन ठेवली.
शनिवारी माझा ऑनकॉल सुरू झाला आणि सकाळीच फोन खणाणला. “सर, कॕज्युअल्टीमध्ये एक सिरिअस पेशंट आलाय!”
मी पळतच कॕज्युअल्टीमध्ये गेलो. पेशंट साधारणपणे ३०-३२ वर्षाचा तरुण होता. त्याचे पूर्ण अंग सुजले होते व सर्व अंगाचा खूप घाण वास येत होता. तीन चार इंटर्न डॉक्टर धावपळ करत होते. कुणी पेशंटला सुई लावत होते तर कुणी ब्लडप्रेशर मोजत होते. शेजारीच त्याची बायको हवालदिल होऊन उभी होती. एक मूल काखेला आणि दुसरी मुलगी तिच्या पायापाशी घुटमळत होती. गावाकडचे पाच सहा लोक या पेशंटला गाडीत घालून घेऊन आले होते. त्यापैकी दोघेजण पुढे आले अन् म्हणाले, “साहेब, ५-६ दिवसापूर्वी शेतावर काम करत असताना याला फावडं लागलं. हळूहळू अंग सुजायला लागलं म्हणून तालुक्याच्या इस्पितळात भरती केलं. पण तिथं काहीच इलाज चालंना म्हणून शेवटी इकडं हालवलं. काहीपन करा पण पेशंटला वाचवा. नाहीतर बायका पोरं उघड्यावर येतील याची.”
पेशंटचा श्वास अनियमित चालत होता. म्हणून मी त्याच्या श्वासनलिकेमध्ये कृत्रिम नळी टाकली व बाहेरून ऑक्सिजन पुरवठा चालू केला. मी त्याच्या अंगाला हात लावला, तशी माझी पूर्ण बोटे त्याच्या अंगामध्ये रुतली. मला अंदाज आला की, त्याच्या मांसपेशी कुजल्या आहेत. प्राथमिक निदान गॅस गंँग्रीन हे होते. या आजारामध्ये गॅस गंँग्रीनचा जीवाणू जखमेमधून शरीरात प्रवेश करतो व एका पाठोपाठ एक, शरिरातील सर्व मांसपेशी कुजवत जातो. या कुजलेल्या मांसपेशी कापून काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्याला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले गेले. हे ऑपरेशन खूप काळजीपूर्वक करावे लागते कारण चुकून जरी सर्जरीच्या टीमपैकी एखाद्याला ऑपरेशन करताना ब्लेड वगैरे लागले तर त्यालाही गॅस गंँग्रीन होण्याचा धोका संभवतो.
ऑपरेशन खूप मोठे झाले. दोन्ही हात ,पाय, पोट, पाठ सगळीकडेच ऑपरेशन करून कुजलेल्या मांसपेशी कापून काढल्या गेल्या. त्यानंतर पेशंटला ICU मध्ये ठेवण्यात आले. तिथले डॉक्टर सतत पेशंटवरती लक्ष ठेवून होते पण पेशंट उपचाराला साथ देत नव्हता. अशातच रविवार उजाडला. पेशंटचे ड्रेसिंग वारंवार भिजून जायचे. पूर्ण अंगाला ड्रेसिंग असल्यामुळे एकदा पूर्ण ड्रेसिंग करायला दीड दोन तास लागायचे. रविवार अतिशय धावपळीत गेला.
सोमवारी सकाळी ३ नंबर युनिटच्या लोकम रेसिडेंटला सर्व पेशंटची माहिती दिली. या पेशंटवरती विशेष लक्ष ठेवायला आणि त्याचे ड्रेसिंग वारंवार बदलायला सांगितले. सर्व कामे उरकून रूमवर आलो पण त्या पेशंटला सोडून घरी जायची इच्छा होत नव्हती. तरीही घरी फोन लावला आणि म्हणालो, “मी ९ वाजता घरी यायला निघतो”. घरचे सगळे ८ महिन्यानंतर मला भेटायला मिळणार म्हणून अतिशय खूश होते. इतक्यात माझ्या सिनिअरचा फोन आला आणि ते म्हणाले “प्रविण, आपल्याकडे तो गॅस गंँग्रीनचा पेशंट आहे, त्याचे ३-४ वेळा ड्रेसिंग करावे लागेल. ते करुन दोन्ही युनिटचे काम करणे लोकम रेसिडेंटला शक्य होणार नाही. त्यामुळे युनिट ३च्या सिनिअरनी त्यांच्या रेसिडेंटला पाठवण्यास ऐनवेळी नकार दिलाय. तुझी सुट्टी रद्द करावी लागेल!”.
मला पायाखालची जमीन सरकल्यागत झाले.दोन मिनिटे बेडवर तसाच बसून होतो. डोके सुन्न झाले होते. प्रश्न मला काय वाटले याचा नव्हता तर घरच्यांना काय सांगू हा होता. त्यांचा हिरमोड कसा करू? धाडस करुन घरी फोन लावला. एका दमात सांगून टाकले, “मला नाही येता येणार, वॉर्डमध्ये कामे खूप आहेत.” माँसाहेब फोनवरच रडायला लागल्या. त्यांची समजूत काढणे शक्य नव्हते, मी तो प्रयत्नही केला नाही.पण वडिल म्हणाले, “राजे, घरी नाही आलात तरी चालेल पण पेशंटना चांगले सांभाळा. हीच आपली दिवाळी समजा.”
इतक्यात मला ICU मधून फोन आला. माँसाहेबाना रडतच फोनवरती होल्डवर ठेवले आणि दुसरा फोन उचलला. ICU मधील डॉक्टर होते फोनवर! ते म्हणाले “तो गॅस गंँग्रीनचा पेशंट कार्डियाक अरेस्ट मध्ये गेला आहे. (ह्दय थांबले आहे).”
मी तसाच पळत ICU मध्ये गेलो. तिथल्या डॉक्टरांनी तोपर्यंत CPR (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) सुरू केले होते. यामध्ये छातीवर दाब देऊन व शॉक देऊन ह्दय पूर्ववत चालू करण्याचा प्रयत्न केला जातो. मी देखील त्यांच्यामध्ये सामील झालो व जोरजोरात CPR देऊ लागलो. काहीही झाले तरी पेशंटला मरू द्यायचे नाही हा निश्चयच केला होता आम्ही सर्वांनी. साधारणपणे १ तासभर आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो परंतु शेवटी देवाची इच्छा! पेशंटला आम्ही वाचवू शकलो नाही.
पेशंटच्या बायकोला आत बोलवले गेले. “तुझ्या धन्याचा मृत्यू झाला आहे”, हे तिला सांगण्याचे काम माझे होते. काय सांगणार होतो तिला मी? दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिचा नवरा तिला सोडून गेला होता. मृत्यूचे समजताच ती मटकन् खालीच बसली. दोन्ही लेकरांना छातीशी धरून तिने एकच हंबरडा फोडला. कोणत्याही शब्दांनी तिचे सांत्वन करणे शक्यच नव्हते. मी तसाच येऊन टेबलवर बसलो व पेशंटचे डेथ सर्टिफिकेट भरून दिले.
आता मात्र माझे शरीर मला साथ देत नव्हते. सुट्टीला गेल्यावर आपल्या माघारी इतरांची अडचण व्हायला नको म्हणून गेले तीन चार दिवस मी न झोपता काम करत होतो. बसल्या जागीच झोप येत होती आणि भूकही खूप लागली होती. पण उठून कँटीनपर्यंत जाण्याइतपतही ताकद शिल्लक राहिली नव्हती. इतक्यात वॉर्डच्या सिस्टर आल्या व म्हणाल्या “प्रविण डॉक्टर, प्लीज उठा आणि डॉक्टर रुममध्ये चला. खूपच थकलाय तुम्ही. तोंडावर पाणी मारुन घ्या. आज दिवाळी आहे. मी घरुन फराळाचं आणलंय. थोडं खाऊन घ्या.”
मी त्यांच्या मागोमाग डॉक्टर रुममध्ये गेलो तर युनिट ३ चे सिनिअर तिथे नाष्टा करत बसले होते. मला बघताच त्यांनी विचारले, “प्रविण, तुझा गॅस गंँग्रीनचा पेशंट कसा आहे?” मी जड अंतःकरणाने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ते उठले आणि माझ्या जवळ आले, त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, “प्रविण, आपण भरपूर प्रयत्न केले पण पेशंटला वाचऊ शकलो नाही. बाकीचे पेशंट माझा ज्युनिअर रेसिडेंट बघू शकतो. तुला सुट्टीला जायचं असल्यास जाऊन ये.”
पण आता मला सुट्टीला जाण्याची इच्छा राहिली नव्हती. इतक्यात माझ्या युनिटचे सिनिअर आले. त्यांनीदेखील मला सुट्टी घे म्हणून सांगितलं. पण मला आता काहीच उत्साह वाटत नव्हता. पण त्यावेळी त्यांनी जे सांगितले ते मात्र मी कायम लक्षात ठेवलं. ते म्हणाले, “प्रविण, आपण डॉक्टर आहोत. आपण एखाद्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं, एवढंच आपल्या हाती असतं. प्रत्येक वेळी प्रयत्नांना यश येईलच असे नाही. पण एखाद्यावेळी अपयश आले म्हणून आपण जर निराश होऊन बसलो तर पुढची कामे कोण करणार? आपल्यावर एवढ्या सगळ्या पेशंटची जबाबदारी आहे, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार तसेच आपल्या आयुष्यावर जेवढा पेशंटचा अधिकार आहे तेवढाच आपल्या घरच्या लोकांचा देखील आहे. त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे. वॉर्डमध्ये जे झालं त्यामध्ये तुझ्या घरच्यांची काय चूक? तू गेल्याने त्यांना जर बरं वाटणार असेल तर तू गेलंच पाहिजेस.”
एव्हाना दुपारचे २ वाजत आले होते. मी घरी फोन केला व मी येतोय म्हणून सांगितले. आई वडिल बिचारे परत खूश झाले. मी तसाच वॉर्डमधून निघालो आणि धडपडत एस्.टी.स्टँडवर पोहचलो. जयसिंगपूरला जाणारी जी बस मिळेल त्यामध्ये बसलो. संध्याकाळी ७च्या आसपास बस जयसिंगपूरला पोहचली. प्रवासात मी चांगली झोप काढली, कारण पुढचे ७-८ तास मला न झोपता घरच्यांबरोबर आनंदात घालवायचे होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परतायचे होते.
वडील मला न्यायला आधीपासूनच स्टँडवर येऊन थांबले होते. आमची गाडी घरासमोर थांबली तशी माझ्या लहान भावाने हजार फटाक्यांची माळ लावली. फटाक्यांच्या कडकडाटात माझे स्वागत झाले, माँसाहेबांनी पायावर पाणी घालून दृष्ट काढली. घरच्यांचा आनंद अवर्णनीय होता पण त्यांना काय माहित होते की, हॉस्पिटलमध्ये काय घडले ते!
मला बघून माँसाहेबांना चांगलाच धक्का बसला होता कारण गेल्या ७-८ महिन्यांमध्ये माझे वजन १०-१५ किलोने कमी झाले होते. हाडाचा सांगाडाच राहिला होता फक्त. त्यामुळे एका दिवसात मला पूर्ण वर्षभराचे खायला घालावे असा त्यांचा प्रयत्न चालला होता. फराळाचं ताट भरुन माझ्यासमोर ठेवण्यात आलं. सर्व पदार्थ माझ्या आवडीचे दिसत होते.पण मला थोडं डोके गरगरल्यासाखं वाटत होतं. लहान भाऊ, मला त्याने घेतलेला नवीन ड्रेस घालून दाखवत होता. वडील लाईटच्या माळांच डेकोरेशन आवडलं का? म्हणून विचारत होते. माँसाहेब ‘लाडू खाऊन बघा’ म्हणत होत्या.
मी लाडूचा घास घेणार इतक्यात त्या पेशंटची बायको व दोन्ही मुले माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. दोन्ही मुले केविलवाण्या नजरेने माझ्या हातातल्या लाडूकडे बघत होती. इतक्यात त्याची बायको पुढे आली आणि म्हणाली, “सायेब, ……………”
लेख सर्वाधिकार: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे. 7738120060
डॉ. प्रविण सुरवशे यांनी लिहिलेले अन्य लेख:
भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती !
भाग ३ : ससून मधील अननोन!
भाग ४: ती २७ मिनिटे…
डॉ. प्रविण सुरवशे यांच्या ब्लॉगला भेट द्या

खुप छान सर.संवेदनशील डॉक्टरच असं लीहू शकतो.आजच्या व्यावहारीक जगात आपली संवेदनशीलता अशीच कायम ठेवा. समाजाला अशा डॉक्टरांची खुप गरज आहे.🙏
डॉक्टर आणि इतर लोकसेवा करणारी यंत्रणा स्वतःचा किंवा कुटीबीयांचा विचार न करता आपली कर्तवै पार पडत असतात त्यात त्यांना जास्ततीत जास्त यश सुद्धा मिळत असते पण एखाद्यावेळी सर्व प्रयत्न करूनही यश नाही आले तर आधीचे सर्व विसरून लोक वरील जणांना त्यांची आधीची कर्तबगारी विसरून त्यांना दोष देतात याचे फार वाईट वाटते . प्रस्तुत लेख फारच सुंदर पद्धतीने लिहिला आहे कुठेही संदर्भ न सोडता यथोचित बारीक बारीक तपशील सुध्दा लिहिले आहेत यामुळे लेख वाचनीय झाला आहे धन्यवाद