प्रथम ‘धर्मवेड्या इस्लामी बादशहा औरंगजेबाला तितक्याच प्रखरतेने हिंदूंचे धर्मप्रेम दाखवून धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांस त्रिवार मुजरा!’.
आज फाल्गुन अमावास्या !
सध्या आपण इंग्रजी कॅलेंडरचा वापर करत असल्यामुळे, पंचांगाप्रमाणे तिथीचा वापर करणे दैनंदिन व्यवहारात कमी झाले आहे.
परंतु ‘फाल्गुन अमावास्या’ ही तिथी मात्र सर्वांच्याच लक्षात राहते, हा दिवस मराठी माणूस विसरूच शकत नाही. आजच्याच तिथीला १६८९ साली मराठयांचा पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने क्रूरपणे हत्या केली. स्वराज आणि स्वधर्म याकरिता छत्रपती संभाजीराजांनी स्वतःच बलिदान दिले. ह्या दिवसाचे विस्मरण होणे म्हणजे स्वराज्य आणि स्वधर्माचे विस्मरण! स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या पराक्रमाचे विस्मरण! मराठयांच्या क्षात्र तेजाचे विस्मरण! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे विस्मरण!
ह्या दिवसाची आठवण जरी झाली तरी मराठयांचे रक्त सळसळते, अंगावर काटा उभा राहतो. बाहू फुरफुरतात. संभाजीराजांच्या बलिदानाची आठवण आली कि मनाला अतोनात यातना होतात. अख्खा महाराष्ट्र अश्वत्थाम्याच्या कपाळावरील भळभळत्या जखमेप्रमाणे हे शल्य घेवून आज देखील हळहळत आहे.
“धर्मासाठी प्राण घ्यावयाचे नसतात तर स्वधर्मासाठी प्राण द्यावयाचे असतात”, हे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबास दाखविले. संभाजीराजांच्या बलिदानाने मराठयांचे क्षात्रतेज उफाळले, छातीच्या ढाली झाल्या, मनगटाच्या तलवारी झाल्या आणि गवतालाही भाले फुटले. घराघरातून त्वेषाची ज्वाला उसळली आणि त्या वणव्यात मोगलांचे इस्लामी साम्राज्य नष्ट पावले. महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास महाराष्ट्राच्या मातीतच गाडून घ्यावे लागले, केवळ थडग्यापुरती जमीन सम्राट औरंगजेबाच्या मालकीची झाली आणि हिंदूस्थानातील शेकडो वर्षांच्या गुलामीचा एक अध्याय मराठ्यांनी संपविला.”
छत्रपती संभाजीराजांविषयी बरेच लिखाण झालेले आहेत, ते मी पुन्हा न लिहिता त्यांचा कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडता आहे. ह्या सर्व घटना क्रमवार पाहताना छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आणि अवघ्या ८ वर्षांच्या राजवटीत किती विलक्षण घटना पाहिल्या, अनुभवल्या आणि घडवल्या देखील हे नजरेसमोर उभे राहते. मला खात्री आहे कि, हा जीवनपट वाचून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
त्यापूर्वी वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची जुनी छायाचित्रे आणि काही काल्पनिक छायाचित्रे आपल्या माहितीकरीता आपणापुढे सादर करीत आहे. Old and Fictional Photos related to Chhatrapati Sambhaji Maharaj.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची जुनी छायाचित्रे थोर इतिहासकार कै. वा. सी. बेंद्रे यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ या पुस्तकातून घेतली आहेत.
दिनांक | घटना |
गुरुवार, १४ मे १६५७ | शंभूराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म |
५ सप्टेंबर १६५९ | संभाजीराजांच्या आई सईबाईंचा राजगडावर मॄत्यू |
११ नोव्हेंबर १६५९ | अफजलखानाचा वध |
१६६४-१६६५ | पिलाजी शिर्के यांच्या कन्या जिऊबाई ह्यांच्याशी संभाजीराजांचा विवाह सासरचे नांव येसूबाई |
१३ जून १६६५ | पुरंदरचा तह |
१८ जून १६६५ | संभाजीराजे मिर्झाराजा जयसिंहाच्या छावणीत |
२२ सप्टेंबर १६६५ | मोगलातर्फे संभाजीराजांस पंचहजारी मनसबदारीचे फर्मान आले |
सोमवार ५ मार्च १६६६ | छत्रपति शिवाजी महाराजांबरोबर बाल संभाजी राजगडाहून बादशहा औरंगजेबाच्या भेटीस आग्य्रास रवाना |
११ मे १६६६ | छत्रपति शिवाजी व संभाजीराजे आग्य्राच्या सीमेवर पोहोचले |
१२ मे १६६६ | आग्य्रास औरंगजेबाच्या दरबारात हजर |
२५ मे–१७ ऑगस्ट १६६६ | छत्रपति शिवाजी व संभाजीराजे आग्य्रात औरंगजेबाच्या नजरकैदेत |
शुक्रवार १७ ऑगस्ट १६६६ | छत्रपति शिवाजी व संभाजीराजे आग्य्राच्या नजरकैदेतून युक्तीने निसटले, परतीचा गुप्त प्रवास सुरू |
ऑगस्ट – सप्टेंबर १६६६ | मथुरेत कॄष्णाजी विश्वासराव त्रिमल यांच्याकडे संभाजीराजांचा गुप्त वास, संस्कृत भाषेचे शिक्षण |
२० नोव्हेंबर १६६६ | संभाजीराजे उत्तरेतून राजगडावर सुखरूपपणे पोहचले |
९ ऑक्टोबर १६६७ | संभाजीराजे राजगडावरून औरंगबादेस मुअज्जमच्या छावणीत जाण्यास निघाले |
२७ ऑक्टोबर १६६७ | मुअज्जमच्या छावणीत मोगली मनसबीचा स्वीकार व १५ लक्ष होनांचा वऱ्हाडचा मुलुख जहागीर म्हणून प्राप्त |
५ नोव्हेंबर १६६७ | संभाजीराजे मोगल छावणीतून राजगडास परत |
२४ फेब्रुवारी १६७० | राजगडावर संभाजीराजांची सावत्र आई सोयराबाई यांना राजराम हा पुत्र झाला |
२६ जानेवारी १६७१ | संभाजीराजांच्या राज्यकारभाराच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणास प्रारंभ, कारभार सोपवला |
१६७२ | संभाजीराजे युध्द आघाडीवर जाऊ लागले, अण्णाजी पंता बरोबर रामनगर – जव्हार मोहिमेत सहभाग |
२३ मे १६७३ | इंग्रज वकिल टॉमस निकल्स याची भेट |
६ जून १६७४ | किल्ले रायगडावर छत्रपति शिवाजीराजांचा राज्याभिषेक, संभाजीराजे युवराज म्हणून घोषित |
१७ जून १६७४ | राजमाता जिजाऊसाहेबांना रायगडाखालील पाचाड येथे स्वर्गवास |
४ फेब्रुवारी १६७५ | संभाजीराजांचे मौजीबंधन (उपनयन) |
१६७५-१६७६ | गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर इ. प्रदेशात दोन मोठया मोहिमा |
ऑक्टोबर १६७६ | छत्रपति शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर, संभाजीराजे पन्हाळगडावर, पन्हाळा, प्रभावली व शृंगारपूर या सुभ्याचे सरसुभेदार म्हणून नेमणूक |
२१ ऑक्टोबर १६७६ | संभाजीराजे शृंगारपूरात |
२३ मार्च १६७८ | संभाजीराजांनी स्वत:स कलशाभिषेक करून घेतला |
११ मे १६७८ | दक्षिण दिग्विजय करून छत्रपति शिवाजी महाराज रायगडास परत आले |
४ सप्टेंबर १६७८ | संभाजीराजांची पत्नी येसूबाईस भवानीदेवी ही कन्या झाली |
१० सप्टेंबर १६७८ | छत्रपति शिवाजी महाराज पन्हाळ्यायावर येवून संभाजीराजांस भेटले |
२० ऑक्टोबर १६७८ | संभाजीराजे सज्जनगडावर |
१३ डिसेंबर १६७८ | संभाजीराजे सज्जनगडावरून मोगली गोटाकडे गेले, मोगलांकडून सप्तहजारी मनसब बहाल |
२ एप्रिल १६७९ | संभाजीराजे व दिलेरखान यांनी भूपाळगड घेतला |
२० नोव्हेंबर १६७९ | संभाजीराजे आणि इतर दिलेरखानच्या छावणीतून निसटले |
२२ डिसेंबर १६७९ | संभाजीराजे स्वराज्यात पन्हाळगडावर परतले |
१३ जानेवारी १६८० | छत्रपति शिवाजी महाराज व संभाजीराजे यांची भेट |
१५ मार्च १६८० | राजाराम महाराजांचे रायगडावर प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई (ताराबाई) बरोबर लग्न |
३ एप्रिल १६८० | छत्रपति शिवाजी महाराजांचे राजधानी रायगडावर महानिर्वाण, त्यावेळे संभाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर |
२१ एप्रिल १६८० | आण्णाजी दत्तो, मोरोपंत इ. प्रधानांनी राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण केले आणि संभाजीराजास कैद करण्यासाठी पन्हाळ्याकडे कूच |
एप्रिल १६८० | संभाजीराजांनी पन्हाळ्यावर राज्यावी सर्व सूत्रे आपल्याकडे घेवून स्वत:ला राजा म्हणून घोषित केले, सेनापती हंबीररावाने आण्णाजी दत्तो, मोरेपंत पिंगळे इ. प्रधानांना कैद करून संभाजीराजांसमोर हजर केले |
१८ जून १६८० | संभाजीराजे पन्हाळगडावरून रायगडावर आले |
२७ जून १६८० | पुतळाबाई सती गेल्या |
ऑक्टोबर १६८० | मोरोपंताचे निधन |
२० जुलै १६८० | संभाजीराजांचे मंचकारोहण |
३० डिसेंबर १६८० | संभाजीराजांची प्रायश्चितविधी, तुलादान विधी |
१६ जानेवारी १६८१ | संभाजीराजांचा रायगडावर राज्यभिषेक, त्या सुमारास आण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी इ. अधिकाऱ्यांची मुक्तता व पूर्वीच्या पदांवर नेमणूक |
फेब्रुवारी १६८१ | हंबीररावांनी धरणगांव लुटले, बरहाणपुरावर चाल केली |
मे १६८१ | मराठयांचे औरंगाबाद, जालना, मेहेकर यावर हल्ले |
१ जून १६८१ | औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर संभाजीराजांच्या आश्रयास, सोबत दुर्गादास राठोड |
जून-जुलै १६८१ | संभाजीराजांवर पन्हाळ्यावर विषप्रयोग, अकबराच्या मदतीने ठार करण्याचा प्रधानांचा प्रयत्न, अकबराने हा डाव उघडा पाडला |
जुलै १६८१ | नेताजी पालकर यांची बागलाणात स्वारी |
१८ जुलै १६८१ | मराठयांचा उंदेरीवर हल्ला |
ऑगस्ट १६८१ | आण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी आणि इतर कटवाल्यांना देहान्ताच्या शिक्षा |
२१ ऑगस्ट १६८१ | औरंगजेबाने शहाजादा आज्जम यास अकबराच्या पारिपत्यास पाठविले |
८ सप्टेंबर १६८१ | औरंगजेब स्वत: अजमीरहून दक्षिणेकडे निघाला |
२७ ऑक्टोबर १६८१ | सोयराबाईंचे निधन |
नोव्हेंबर १६८१ | मराठयांची २५ हजारांची फौज अहमदनगरवर |
११ नोव्हेंबर १६८१ | औरंगजेबाने हसनअलीखानास तळकोकणच्या मोहिमेवर पाठविले |
१३ नोव्हेंबर १६८१ रविवार | औरंगजेब बुऱ्हाणपुरास पोहोचला, त्याच दिवशी कोकणात संभाजीराजे अकबर यांची पहिली भेट |
नोव्हें-डिसें. १६८१ | औरंगजेब शहाजादा आज्जम, चिनकीलिचखान, बहारूरखान यांना स्वराज्यावर चढाईस धाडले |
डिसेंबर १६८१ | सिद्दीने पणवेळे ते चौल पर्यंतचा मराठ्यांचा प्रदेश उद्ध्वस्त केला, संभाजीराजांनी सिद्दींच्या दंडराजापुरीस (जंजिरा) वेढा घातला |
डिसेंबर १६८१ | स्वामी समर्थांचे संभाजीराजांस पत्र |
२२ जानेवारी १६८२ | सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींचे निर्वाण |
जानेवारी १६८२ | संभाजीराजांचा दंडराजापुरीवर जोरदार हल्ला |
एप्रिल १६८२ | मराठयांच्या फौजेची मेहेकर (बुलढाणा), जालना या प्रदेशात धामधूम |
एप्रिल १६८२ | मोगल सरदार शियाबुद्दीन याने रामसेजला वेढा घातला |
मे १६८२ | कल्याण-भिवंडीची लढाई, मोगली सरदार हसनअलीखान पराभूत |
१८ मे १६८२ | शाहूराजे यांचा जन्म – रायगड जवळील गंगावली (माणगाव) येथे |
जून १६८२ | संभाजीराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर, म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याच्याशी युध्द, म्हैसूरकरांची माघार| संभाजीराजांना खंडणी मिळवली |
जुलै १६८२ | शहाबुद्दिनखानाचा रामसेजच्या किल्ल्यास वेढा व पराभव |
ऑगस्ट १६८२ | सिद्दी मोगलांचे चाकर झाले |
सप्टेंबर १६८२ | शहजादा मुइजुद्दीन मराठयांचा मोड करण्यासाठी अहमदनगरकडे |
डिसेंबर १६८२ | मराठी फौजा जालन्याच्या परिसरात |
नोव्हें-डिसें १६८३ | संभाजीराजांनी मिर्झा राजा जयसिंह यांचा मुलगा रामसिंह याला संस्कॄत पत्र पाठविले व एकत्र येण्याचे आवाहन केले |
जानेवारी १६८३ | संभाजीराजे कर्नाटकातून परत, शहाजादा आज्जम कोल्हापूरच्या बाजूस हंबिररावाकडून पाठलाग, मराठा सरदार माणको बल्लाळ पाच हजार फौजेसह नळदुर्ग प्रदेशात मोहिमेवर, हसनअलीखानाची तLकोकणात स्वारी |
१६८३ | डोक्यावरील पगडी जमिनीवर फेकून बादशहा औरंगजेबाने प्रतिज्ञा केली की, “जोवर या संभाजीस पकडणार नाही वा ठार मारणार नाही तोवर पुन्हा ही पगडी डोक्यावर ठेवणार नाही” |
मार्च १६८३ | मराठे व मोगल यांची पेडगावजवळ लढाई |
मार्च १६८३ | टिटवाळ्याची लढाई |
१७ मार्च १६८३ | हंबीरराव – रणामसताखान लढाई, हंबीरराव जखमी |
१५ एप्रिल १६८३ | संभाजीराजांचा पोर्तुगीजांच्या तारापूरवर हल्ला |
एप्रिल १६८३ | रदुल्लाखान पराभूत होवून परतला |
एप्रिल-मे १६८३ | मराठे औरंगाबादेच्या परिसरात, प्रदेश उध्वस्त |
जून १६८३ | संभाजीराजे पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील राज्याच्या स्वारीवर |
१० जून १६८३ | संभाजीराजे राजापूरास गेले, रेवदंडास वेढा घातला |
जुलै १६८३ | संभाजीराजांचा चौलच्या ठाण्यास वेढा, तोफांची मारगिरी, पोर्तुगीज शिबंदीची दयनीय अवस्था |
१३ सप्टेंबर १६८३ | शहाजादा मुअज्जमची दक्षिण कोकणच्या स्वारीवर रवानगी, शहाबुद्दीन खानाची उत्तर कोकणावर रवानगी |
२० सप्टेंबर १६८३ | दिलेरखानाची आत्महत्या |
ऑक्टो-नोव्हे १६८३ | पोर्तुगीजांचा उत्तरेकडील दमण ते चौल हा प्रदेश मराठयाकडून काबीज |
१ नोव्हेंबर १६८३ | पोर्तुगीज व्हाईसरायचा फोंडयास वेढा |
१० नोव्हेंबर १६८३ | संभाजीराजे फोंडयात घुसले |
११ नोव्हेंबर १६८३ | पोर्तुगीज व्हाईसराय आल्व्हारो पळाला |
१२ नोव्हेंबर १६८३ | संभाजीजांकडून फोंडयाच्या पायथ्याशी पोर्तुगीज सैन्याची दाणदाण |
१३ नोव्हेंबर १६८३ | औरंगजेब अहमदनगर येथे आला |
२४ नोव्हेंबर १६८३ | गोव्याजवळचे जुवे बेट संभाजीराजांच्या ताब्यात, पोर्तुगीजांचा पराभव |
२६ नोव्हेंबर १६८३ | संभाजीराजांची गोव्यावर स्वारी |
११ डिसेंबर १६८३ | संभाजीराजांची पोर्तुगीजांच्या साष्ट-बारदेश प्रदेशात स्वारी |
२७ डिसेंबर १६८३ | संभाजीराजे–शहाबुद्दीन यांच्यात राजगडाच्या पायथ्याशी पाचाड, निजामपूर येथे लढाई |
२ जानेवारी १६८४ | संभाजीराजे रायगडाकडे |
४ जानेवारी १६८४ | शहाजादा मुअज्जम कोकणात उतरला, पुढे कुडाळ इ. गावे जाळली, मराठे-पोर्तुगीज तहाची बोलणी, सुपे, बारामती, इंदापूर येथे मोगली ठाणी |
फेब्रुवारी १६८४ | शहाजादा मुअज्जमची माघार, मोगली सेनेचे अतोनात हाल |
मार्च १६८४ | गाजिउद्दीनखान बहादुर पुणे प्रदेशावर रवाना |
१८ मे १६८४ | पराभूत शहजादा मुअज्जम औरंगजेबाकडे अहमदनगरला पोहोचला |
ऑक्टोबर १६८४ | मोगली फौजा पुण्याच्या प्रदेशात, शिवापूर, शिरवळ काबीज |
३० ऑक्टोबर १६८४ | रायगडावरील फितुर मानाजी मोरे, राहुजी सोमनाथ, वासुदेवपंत, गंगाधरपंत इ. लोक संभाजीराजांकडून कैद |
नोव्हेंबर १६८४ | उत्तर कोकणात औरंगजेब मराठयांचे किल्ले घेण्यासाठी मोहीम पाठवितो, मराठयांचा पतिकार, मोगलांकडे कोथळागड |
जानेवारी १६८५ | मराठयांची संगननेर भागात मोहिम, काही फौजा परिंडयाकडे, शहाजादा आज्जम बेळगाव-धारवाड भागात, गागिउद्दीनखान रायगड भागात, कवि कलशाने पळवून लावला |
१४ जानेवारी १६८५ | शहाबुद्दीनचा पराभव |
फेब्रुवारी १६८५ | मराठयांची खानदेशवर स्वारी, धरणगाव लुटले |
फेब्रुवारी–मे १६८५ | मोगल व मराठे यांच्यात सातारा भागात लढाया |
मार्च १६८५ | संभाजीराजांनी विजापूरच्या मदतीसाठी फौज पाठविली| मराठे व आदिलशाही फौज एकत्र येवून मोगलांशी लढाई |
मार्च १६८५ | मोगलांचा विजापूरला वेढा |
एप्रिल १६८५ | मराठे सोलापूर भागात |
२४ मे १६८५ | औरंगजेब अहमदनगरहून सोलापुरास पोहोचला |
जून – जुलै १६८५ | विजापूरच्या मदतीसाठी संभाजीराजांनी कवि कलशास पाठविले, कलशाने पन्हाळ्यावरून तिकडे फौजा रवाना केल्या |
ऑगस्ट-सप्टें १६८५ | मराठे व आदिलशाही फौज यांचा मोगली फौजेशी संघर्ष |
८ ऑक्टोबर १६८५ | शहाआलमने हैदराबाद जिंकले, कुतुबशाह मोगलांना शरण |
नोव्हेंबर १६८५ | मराठा सरदार नागोजी बल्लाळ सात हजाराची फौज घेवून विजापूरच्या मदतीसाठी, गाजीउद्दीनखानाशी लढाई |
डिसेंबर १६८५ | मराठयांची भडोचकडे मोहीम, मराठयांचा उंदेरी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न |
मार्च १६८६ | मिरज, कोल्हापूर इ. भागात मोगलांच्या आक्रमक हालचाली |
मार्च–एप्रिल १६८६ | मोगलांनी मिरजेचे ठाणे घेतले |
१६ मार्च १६८६ | कुतुबशाहीतील विश्र्वासू सरदार मादण्णा व आकण्णा यांचा फितूरांकरवी शहाजादा मुअज्जमकडून खून |
१४ जून १६८६ | औरंगजेब सोलापूरहून विजापूराकडे |
३ जुलै १६८६ | औरंगजेब विजापूराजवळ आला |
१ सप्टेंबर १६८६ | सिकंदर आदिलशहा पराभूत होवून राजवाडयातून बाहेर |
१२ सप्टेंबर १६८६ | औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही खालसा केली |
३० ऑक्टोबर १६८६ | औरंगजेब विजापूरहून गोवळकोंडयाकडे निघाला |
ऑक्टोबर १६८६ | संभाजीराजांनी मंगळवेढयाकडे फौज पाठविली, तिचा मोड करण्यासाठी इतिकादखान रवाना |
ऑक्टो–नोव्हें १६८६ | संभाजीराजांनी कर्नाटकात हरजीराजे महाडीक याच्या मदतीसाठी केसो त्रिमल व संताजी भोसले यास १२ हजार सैन्यासह पाठविले |
२८ जानेवारी १६८७ | औरंगजेब गोवळकोंडयाजवळ |
७ फेब्रुवारी १६८७ | गोवळ कोंडयास वेढा |
२१ फेब्रुवारी १६८७ | शहाजादा मुअज्जमला बादशहाने कैद केले |
फेब्रुवारी १६८७ | शहजादा अकबर इराणकडे रवाना, केसो त्रिमल व संताजी भोसले कर्नाटकात पोहोचले |
२१ सप्टेंबर १६८७ | औरंगजेब गोवळ कोंडयाची कुतुबशाही नष्ट करतो |
ऑक्टोबर १६८७ | वाईजवळ सर्जाखानाशी लढताना सेनापती हंबीरराव मोहिते यांना वीरगती प्राप्त |
नोव्हें-डिसें १६८७ | पुणे प्रांतातील पाटस, कऱ्हेपठार येथे मोगली अंमल, रामसेजचा किल्ला मोगलांनी फितुरीने घेतला |
१६८८ | ‘सप्तसतक’ नावाचा या हिंदी काव्यग्रंथ संभाजीराजांनी लिहिला |
जानेवारी १६८८ | नाशिक-बागलाण भागात मातबरखानाची मोहिम, पट्टा किल्ला घेतला |
जुलै १६८८ | बागलाणातील होलगड मोगलांकडून काबीज |
ऑगस्ट १६८८ | मातबरखानाचा त्रिंबक किल्ल्यास वेढा |
२१ ऑगस्ट १६८८ | माहुली गड फितुरीने मोगलांच्या हाती |
ऑक्टो-नोव्हें १६८८ | कवि कलश व गणोजी शिर्के यांच्यात झगडा, कलश पराभूत, संभाजी राजे मदतीस, शिर्क्यांचा पराभव व पलायन |
नोव्हें-डिसें १६८८ | संभाजीराजांनी प्रल्हाद निराजी इ. अधिकाऱ्यांना कैदेत टाकले |
८ जानेवारी १६८९ | त्रिबंक किल्ला मोगलांच्या हाती |
१ फेब्रुवारी १६८९ | संभाजी राजे खेळण्याहून (विशाळगड) रायगडाकडे रवाना |
३/४ फेब्रुवारी १६८९ | संभाजीराजे व कवि कलश मुकर्रबखानाकडून संगमेश्र्वरी कैद |
९ फेब्रुवारी १६८९ | राजराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण |
१५ फेब्रुवारी १६८९ | संभाजीराजे व कवि कलश यांना बहादुरगडीच्या छावणीत औरंगजेबासमोर हजर करण्यात आले |
१५ फेब्रुवारी १६८९ | संभाजीराजांची धिंड |
१७ फेब्रुवारी १६८९ | संभाजीराजे व कवि कलश यांचे डोळे व जिभा काढल्या |
३ मार्च १६८९ | बादशहाची छावणी भीमातीरी आली |
११ मार्च १६८९ फाल्गुन अमावस्या | संभाजीराजे व कवि कलश यांची बादशाही छावणीत वढू बुद्रुक येथे अत्यंत क्रूरपणे हत्या |
आपला अभिप्राय आणि सूचना नक्की कळवाव्यात. हा लेख आपल्याला आवडल्यास तो आपल्या मित्रांना शेअर करावा.
क्र. | ग्रंथ/पुस्तकाचे नाव | ग्रंथ/पुस्तकाचे लेखक |
१ | छत्रपती संभाजी महाराज | कै. वा. सी. बेंद्रे |
२ | छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ | संपादक – डॉ. जयसिंगराव पवार |
४ | शिवपुत्र संभाजी | कै. डॉ. कमल गोखले |
५ | मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – छत्रपती संभाजी | कै. प्रा. शरदचंद्र श्रीधर पुराणिक |
६ | राजा शंभूछत्रपती | डॉ. विजयराव देशमुख |
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२१ , संपर्क: ८९९९७७५४३९ – दिनांक: १०/०४/२०२१
आमचे अन्य ऐतिहासिक लेख वाचा: