Haseen Dillruba हसीन दिलरुबा – दिल को मेरे भा गया!
हसीन दिलरुबा Haseen Dillruba – लेखिका: सायली साठे-वर्तक
(Cover Image source: https://www.aajtak.in/entertainment/film-review/story/haseen-dillruba-netflix-movie-review-story-cast-taapsee-pannu-vikrant-massey-harshvardhan-rane-tmov-1284403-2021-07-04)
बऱ्याच प्रतीक्षेनंतर फायनली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा – Haseen Dillruba’ ओटीटी पडद्यावर परवा झळकला. सध्या सगळ्यांचा पॉपकॉर्न वीकेंड घरीच साजरा होत असल्याने ‘ओटीटी’वाले त्याची योग्य तसदी घेऊन थोडा का होईना थिएटरचा फील देण्यासाठी सिनेमा शुक्रवारीच प्रदर्शित करतात. त्यात कलाकार प्रेक्षकांचे आवडते असले की मग त्याची जाहिरात फार आधीपासूनच केली जाते.
एका सुप्रसिद्ध जुन्या गाण्याचे बोल शीर्षक असलेल्या या चित्रपटात तापसीबरोबर ‘उतरण’ या कलर्स वरच्या मालिकेपासून ज्याची चढण सुरु झाली तो विक्रांत मेस्सी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत नाव कमावलेला हर्षवर्धन राणे हे मराठी नाव वाचून उत्सुकता जास्त वाढली होती. अर्थात नंतर कळाले, की हर्षवर्धनचे वडील महाराष्ट्रीय असले तरी त्याची आई दक्षिणेकडील असल्यामुळे मराठीचे आणि त्याचे थोडे वावडेच आहे… असो! मराठी माणसाबद्दल अभिमान बाळगायला राणे आडनाव तेवढे पुरेसे आहे!
तर अशी सळसळत्या तरुणाईची जबरदस्त स्टारकास्ट घेऊन केलेला आणि नेटफ्लिक्स सारख्या दर्जेदार ओटीटीवर झळकणारा चित्रपट म्हणजे निराशा नक्कीच करणार नाही याची खात्री होती. प्रचंड स्पर्धा असलेल्या बॉलिवूडमध्ये तग धरून राहणे आणि नाव कमावणे म्हणजे सबके बस की बात नहींI त्यामुळेच म्हणतात ना, “नाम में क्या है? सबकुछ” तसेच ‘नाम शबाना‘ या चित्रपटापासून तापसीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे नाव किंवा एक प्रतिमा तयार केली आहे. वेगळ्या धाटणीचे आणि स्त्री पात्राला विशेषतः महत्व देणारे, ‘सांड की आंख‘, ‘थप्पड‘ असे दर्जेदार चित्रपट दिलेल्या तापसीचा हा नवीन सिनेमा चुकवण्याचा प्रश्नच नव्हता. सिनेसृष्टीत कष्टाला पर्याय नाहीच पण योग्य कष्ट घेतले तर तुम्ही ती भूमिका चोख बजावू शकता याचे उत्तम उदाहरण निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी जीवतोड मेहनत घेणे आणि व्यक्तिरेखा प्रत्यक्षात उभी करणे ही तिची कसोटी.
नेटफ्लिक्सवर ‘हसीन दिलरुबा Haseen Dillruba’ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कारकिर्दीची सुरुवात एका डेली सोप पासून केलेल्या विक्रांतने ओटीटी वरच्या मिर्झापूर, क्रिमिनल जस्टीस अश्या गाजलेल्या सिरीजमध्ये दर्जेदार भूमिका करून नव्याने आपले नाव प्रस्थापित केले. दक्षिणेत प्रसिद्ध असला तरी २०१६ मध्ये केलेल्या ‘सनम तेरी कसम‘ चित्रपटानंतर हर्षवर्धनचा तसा बॉलिवूडमध्ये वावर कमीच राहिला जो दिलरुबाच्या निमित्ताने पुन्हा नव्याने झाला.
आता वळूया चित्रपटाच्या मुख्य कथेकडे. बरेच दिवसानंतर शिव्या, तोकडे कपडे, अश्लील दृश्य आणि सर्रास धूम्रपान आणि मद्यपान विरहित एकदमच वेगळ्या धाटणीची कथा पहायची असेल ‘हसीन दिलरुबा’चा नक्की विचार करावा.
कथेचा गाभा जुनाच असला तरी ती साकारलीये अतिशय उत्तमरीत्या. कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमॅन्स सगळे एकाच कथेत येऊ शकते हे कदाचित पटणार नाही पण तसेच काहीसे आहे या सिनेमात.
दुसरे वेगळेपण म्हणजे मुंबई, दिल्ली, कॉर्पोरेट आणि अंडरवर्ल्ड याला थेट धांडा दिलाय यात दिग्दर्शक विनील मॅथ्यू यांनी. रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना दाखवताना चित्रपट हळू हळू वेगळीच कलाटणी घेऊ लागतो आणि मग सुरु होते प्रतीक्षा पुढे काय होणार याची…
एखाद्या विशेष लेखकाने लिहिलेली कथा/कादंबरी आपल्या मनाचा ठाव घेणारी असू शकते किंवा आमरण न विसरता येण्यासारखी असते पण त्या लेखकाने लिहिलेल्या कथेभोवतीच आयुष्य गुंफायला लागते तर काय होईल असे बदलत जाणारे कथानक मॅथ्यू यांनी उत्तम पद्धतीने दाखवले आहे. २०१४ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘हंसी तो फंसी’ बॉक्स ऑफिसवर जरी फारसा चालला नसला तरी त्याचीही मांडणी सुंदर पद्धतीने केली गेली होती.
हसीन असलेल्या तापसी बरोबरच उत्तम शरीरयष्टी कमावलेला हर्षवर्धन मनाला भावतो. आणि खरे तर विशेष उत्तम व्यक्तिमत्व नसलेला पण अभिनयात कसलेला असल्यामुळे विक्रांत मेस्सी मनावर जबरदस्त छाप पाडल्याशिवाय रहात नाही…
प्रेम, मोह, मत्सर, तिरस्कार आणि विकृती या सर्वसामान्यपणे कुठल्याही कथेत बऱ्याचदा दाखवल्या जाणाऱ्या भावना आहेत, पण ह्याच भावना वेगळ्या प्रकारे दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणे तसे अवघड आहे. आणि तेच नेमके लेखिका कनिका ढिल्लन यांनी कथेचा शेवट वेगळा दाखवून केला आहे…
बरेच दिवसांनी एक चांगली प्रेमकथा वेगळ्या प्रकारे पाहून छान वाटले. आता तुम्हीच बघून सांगा तुम्हाला कसा वाटला हा सिनेमा…
Haseen Dillruba हसीन दिलरुबा – दिल को मेरे भा गया! – लेखाचे सर्वाधिकार ©: सायली साठे-वर्तक
लेखिकेचा परिचय:
व्यवसायाने शिक्षिका (सध्या गृहीणी)
महाराष्ट्रातील वास्तव: तळेगाव दाभाडे
त्यांचे यजमान भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहेत (सध्या वास्तव्य – काश्मीर येथे)
हे देखील वाचा: ‘आयफोन’वर चित्रित केलेला पहिला मराठी चित्रपट
