‘आयफोन’वर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर‘ A First Marathi Film Shot on i-Phone
गेल्या आठवड्यात सलमान भाईचा ‘राधे’ मोठा गाजावाजा करून थिएटर आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ९० ते १०० कोटी बजेटच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची छानच पिळवणूक केल्याने चित्रपट पहिल्याच आठवड्यात दणकून आपटलेला दिसतोय.
आणि विरोधाभास पहा.
गेल्याच आठवड्यात MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला, अत्यंत कमी बजेटमध्ये निमिर्ती केलेला आणि ‘आयफोन’वर (iPhone) चित्रित झालेला मराठी ‘पिच्चर’ मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे.
दचकलात का?
तुम्ही म्हणाल, “कोणी करतं का कधी ‘आयफोन’वर चित्रपटाचे शूटिंग?” पण तुम्ही वाचले ते खरं आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई जवळच्या एका छोट्या गावातील दिगंबर राजेंद्र वीरकर या तरुणाने चक्क ‘आयफोन’ वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित्रपट MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यापर्यंत झेप घेतली, याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. चित्रपट पाहताना वाटत नाही की खरंच हा चित्रपट ‘आयफोन’वर चित्रित केलेला. याचे सर्व श्रेय जाते ते, कॅमेरामन आणि हि अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवून राबविणारे दिगंबर राजेंद्र वीरकर यांच्याकडे!

लेखक, निर्माता, दिग्दर्शक दिगंबर राजेंद्र वीरकर यांच्या ‘वीरकर मोशन पिक्चर्स’ द्वारे निर्मिती झालेला आणि ‘राही प्रॉडक्शन’ यांच्या सहयोगाने MX Player वर प्रदर्शित झालेला ‘पिच्चर’ हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. आयुष्य पणाला लावून स्वप्नपूर्तीकडे धावणाऱ्या ग्रामीण भागातील चित्रपटवेड्या ‘गण्या’ या सामान्य तरुणाची धडपड लेखक-दिग्दर्शकाने खूप छान मांडली आहे. चित्रपट बनवताना स्वप्नांच्या आड येणारी तरुणांची गरिबी, त्यांची दोस्ती, त्यांचा संघर्ष, त्यांनी स्वप्नाला घातलेली गवसणी, एकमेकांसाठी केलेला त्याग, त्यांनतर झालेली त्यांची फसवणूक आपल्या काळजाला हात घालते.
एक तास चोवीस मिनिटाचा हा ‘पिच्चर’ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
‘पिच्चर’च्या कथेचा ग्रामीण बाज अगदी वास्तववादी अनुभव देतो, आपलासा वाटतो. कथेमधील अधेमधे आलेले भावनिक प्रसंग अगदी काळजावर घाव घालतात.
सगळे कलाकार नवखे आहेत पण त्यांनी त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलेला आहे. सर्वच कलाकारांनी अभिनयात ओतलेला जीव पाहून भारावून जायला होते. सर्वांनी आपली आपली भूमिका पूर्ण ताकदीनं निभावली आहे.
ध्येय पूर्ण करताना येणारी संकटे माणसाला ध्येयापासून दूर जायला भाग पाडतात पण असंख्य संकटे येऊन सुद्धा ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही हे कथेच्या हिरो ‘गण्या’ने शिकवले. गण्या, संत्या, नाना यांची मैत्री छान दाखवली आहे. सायकलच्या टायरचे पंक्चर काढण्यासाठीही पैसे नसणारे हे मित्र! मित्राच्या अडचणीच्या काळात स्वतःच घर विकणारा नानासारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असावा असं वाटत राहतं. सुरवातीला हे नानाचे पात्र अनावश्यक वाटले, पण त्या पात्राची गरज शेवटी कळून येते, यात लेखकाचे पात्र गुंफण्याचे कौशल्य जाणवते.
दिगंबर राजेंद्र वीरकर यांचा हा पहिलाच चित्रपट आला तरी कुठेही नवखेपणा न जाणवता त्यांनी निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संकलक अशा सगळ्याच आघाड्या सहज पेलल्या आहेत.
लेखक, निर्माता, दिग्दर्शक दिगंबर राजेंद्र वीरकर यांची मोबाईलद्वारे घेतलेली मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केलेला त्यांचा अनुभव:
‘आयफोन’वर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर‘ First Marathi Film Shot on i-Phone
४ वर्षांपूर्वी ‘परागंदा’ ही शॉर्टफिल्म करण्यासाठी आम्ही सगळेच म्हणजे सीमा वर्तक, रविकिरण दीक्षित, महेश्वर पाटणकर आणि राधिका साठे एकत्र जमलो. बजेट कमी असल्यामुळे छायाचित्रण DSLR कॅमेऱ्यावर करायचे ठरवले होते. आयत्या वेळी शूटिंगच्या वेळेस DSLR उपलब्ध झाला नाही. म्हणून मी, माझ्याकडे असणाऱ्या आयफोनवर शूट करायच ठरवल. यापूर्वी ‘आयफोनवर सिनेमा चित्रित करता येऊ शकतो’, हे मी YouTube वर पाहिले होते आणि त्यावर माझा अभ्यास सुध्दा चालू होता. इंटरनेटच्या माध्यमातून उर्वरित तांत्रिक बाबी गोष्टी समजून घेतल्या. पण छायाचित्रीकरणासाठी आयफोनवर यापूर्वी वापरला नव्हता. आता योगायोगाने म्हणा किंवा महादेवाच्या आशीर्वादाने म्हणा, आयफोनवर चित्रीकरण करण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही. आणि खरं ‘आयफोन’वर शूटिंग करता येते’ ह्या आतपर्यंत वाचलेल्या गोष्टीचे प्रात्यक्षिक स्वतःला करायला मिळणार, या विचाराने मी अंर्तबाह्य भारावलो होतो. त्यावेळी माझ्या ह्या निर्णयावर कोणीही आक्षेप घेतला नाही उलट माझ्या सर्व टीमने पूर्ण सहकार्य केले.
माझ्याकडचा १२ मेगा पिक्सेल क्षमतेचा ‘आयफोन’ वापरून संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही केले आहे.
‘परागंदा’ ही ट्रायल बेसिसवर तयार केलेली शॉर्टफिल्म ‘फिल्म अर्काइव्ह्ज’च्या प्रेक्षागृहात मोठ्या पडद्यावर बघितली. त्याचे रिझल्ट पाहिले आणि मग मी जाणूनबुजून ठरवलं, आता कितीही अडचणी आल्या तरी पुढचा चित्रपट ‘पिच्चर’ हा आयफोनवरच शूट करायचा. माझे सगळे मित्र, सांगायचं झालं तर… महेश्वर पाटणकर यांनी फिल्म मेकिंगची बऱ्यापैकी माहिती दिली आणि निलेश साळुंखे यांच्याकडून आवश्यक ते मार्गदशन, सचिन गायकवाड यांची साथ तर निखिल कोरपड यांच्यासारखे दिलदार आणि असे बरेच मित्र मला लाभले. निखिल लांजेकर आणि केदार दिवेकर यांनी ऑडिओच काम केले. सगळ्यांनीच गरज पडलं तिथं मदत केली.
‘पिच्चर’ची पटकथा लिहून झाली. पाटणकर, दीक्षित, सीमा वर्तक, सीमा निकम, जगदीश चव्हाण, कुशल शिंदे, महेश अंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, राम गोविंदवाड आणि अविनाश धुळेकर या कलाकारांना घेऊन ‘पिच्चर’च शूटिंग सुरु केलं.
‘पिच्चर’ चे मुख्य छायाचित्रण माझ्या गावी म्हणजेच वाई जवळच्या ‘बावधन’ गावाच्या परिसरात झाले. चित्रपटातील भाषा हि साताऱ्याकडची स्थानिक ग्रामीण बोलीभाषा असल्याकारणाने, त्या भाषेचा सराव व्हावा, म्हणून सर्व कलाकार मंडळींना १२-१३ दिवस गावच्या माझ्या घरीच राहण्यास सांगितले होते. त्यामुळे सर्व पात्रांच्या तोंडी ग्रामीण भाषेचा ठसका नेमका उतरला आहे. स्थानिक असल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांनी खूप मदत केली. काही वेळा तर रात्री ११ वाजता कलाकारांना उठवलेले आहे. त्यांनीही न त्रासता काम केलेले आहे. केवळ एक ते दीड मिनिटाच्या प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी रात्रभर जागरण केले आहे.
चित्रपटातील नायक ‘गण्या’च्या आईची भूमिका करणाऱ्या सीमाताई वर्तक ह्या फिल्म अर्काईव्हजमध्ये कामाला आहेत. आमचे तेथे येणे जाणे वाढल्यावर त्यांच्याशी ओळख वाढली. आमच्या धडपडीला सहकार्य म्हणून त्यांनी आमच्या ‘पिच्चर’मध्ये काम करण्याचे ठरवले. माझ्या विनंतीवरून भूमिकेला जिवंत करण्याकरिता त्या दोन-तीन महिने केसांना रंगदेखील न लावता तशाच वावरल्या. ग्रामीण भाषा शिकून घेतली. इतर कलाकार देखील मालिका, नाटके, जाहिराती असा माध्यमातून ह्या क्षेत्रात वावरत आहेत. नवोदित असले तरी कॅमेऱ्याची जाण असल्याने सर्वांनी आपापली भूमीला छान वठवली आहे. चित्रीकरणाअगोदर ३ ते ४ दिवस सर्व कलाकारांना एकत्र बसवून प्रत्येक प्रसंग समाजावून दिला, संवादाची उजळणी केली, त्यामुळे चित्रपटातील शेवटचा हाणामारीचा प्रसंग वगळता, बाकीचे सर्व चित्रीकरण केवळ ३ ते ४ टेकमध्ये पूर्ण व्हायचे. त्यामळे निर्मितीचा वेळ आणि खर्च कमी झाला, सर्व चित्रीकरण केवळ १८ दिवसांतच पूर्ण झाले.
बाह्यचित्रीकरणासाठी भुईंजमधील ‘सुमित इंडस्ट्रीज’, वाई मधील ‘चित्रा’ थिएटर, डॉ. अभ्यंकर यांचा दवाखाना अशा अनेक ठिकाणांचा वापर केला. ह्या सर्व लोकांनी आम्हाला मदत केली.
चित्रीकरण पूर्ण झाल्यावर घरच्याच संगणकावर संकलन पूर्ण केले. केदार दिवेकर यांनी उत्कृष्ठ आणि प्रभावी पार्श्वसंगीत देऊन चित्रपटातील प्रसंग खुलविले आहेत. निखिल लांजेकर आणि हिमांशू यांनी ध्वनिमुद्रण केले. पार्थ गोंधळेकर यांनी डबींगचे काम उत्कृष्टपणे केले. सचिन गायकवाड यांनी लोकेशनवरील ध्वनिमुद्रण छानपैकी केले आणि लाईफहॅक डिझाईन्स यांनी छान प्रोमोज बनवून दिले. दरम्यानच्या काळात विजय पाटील, श्रेयस जोशी, श्रीकांत निकम, मंगेश हाबडे, सुनील जांगिर आणि गणेश जगताप यांचीही खूप मदत झाली. तसेच आईवडील, भाऊ गणेश आणि पत्नी शिवकन्या यांनी मला हवी ती मदत केली त्याबद्धल मी सगळ्यांचाच आभारी आहे.
चित्रीकरण, संकलन, डबिंग ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ‘पिच्चर’ तयार झाला. आता तयारी सुरु झाली प्रदर्शित करण्याची. पण माझ्यासारख्या नव्या निर्माता, दिग्दर्शकाला थिएटर, मल्टीप्लेक्स मिळणे किती आणि कसे अवघड आहे याचे ऑनलाईन प्रशिक्षणच मिळाले. त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु होते, तेवढ्यात कोरोनाच्या महामारीने सर्व जनजीवन अस्वस्थ आणि विस्कळीत करून टाकले, त्यामुळे आमचा ‘पिच्चर’ कधी आणि कसा प्रदर्शित होईल हेच कळेनासे झाले. मध्येच एकदा ‘राही प्रॉडक्शन’च्या प्रवीणकुमार पांडे यांच्याशी संपर्क झाला, त्यांनी ‘पिच्चर’ पाहिला, त्यांना तो खूप आवडला, आणि इतका छान चित्रपट लोकापर्यंत जायलाच हवा म्हणून आपण प्रयत्न करूयात असे त्यांनी सांगितले. आम्ही मार्ग बदलून पुन्हा प्रयत्न सुरु केले आणि सरतेशेवटी गेल्याच आठवड्यात MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर आमचा ‘पिच्चर’ प्रदर्शित झाला.
आपण सर्वांनी MX-Player वर ‘आयफोन’वर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर’ (First Marathi Film Shot on i-Phone ‘Pichhar’) नक्की पाहावा. आपला अभिप्राय आम्हाला कळवावा, म्हणजे आपणास आणखी उत्कृष्ठ चित्रपट देण्याची प्रेरणा आम्हाला त्यातून मिळेल.
स्टार प्रवाह चॅनेल कलाकार किरण माने यांचा अभिप्राय:
“लै लै लै जवळचं! खेड्यातल्या कलाकारांच्या जगन्यातलं! फार संवेदनशीलतेनं, प्रामानिकपणानं आणि तरलतेनं दिग्दर्शकाने मांडल आहे. आयफोनवर शूट केलेला असूनही एकेक फ्रेम, एकेक दृश्य, एकेक संवाद आणि एकेक प्रसंग गुंतवून ठेवणारा आहे. अर्थात पहिलाच प्रयत्न असल्यानं काही त्रुटी असणं स्वाभाविक आहे, पण त्या दुर्लक्षित कराव्यात आणि कथानकात रंगून जावं, एवढी ‘स्टोरी टेलींग’ वरची जबरदस्त कमांड दिग्दर्शकाकडे आहे…! दिग्दर्शन करण्याच्या ‘हौसे’ला ‘अभ्यासा’ची जोड दिलेली स्पष्ट जाणवली… अत्यंत समर्पक आणि सुयोग्य ‘चित्रभाषा’ सांगत होती की हा उद्याचा अग्रगण्य दिग्दर्शक म्हणून नांव कमावणार ! सर्व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि अतिशय प्रभावी पार्श्वसंगीत!”
आपल्या मोबाईलवर MX Player App नसेल, ते डाउनलोड करण्याकरिता येथे क्लीक करा
चित्रपटाचे मानकरी

गण्या

गण्याचे वडील

नाना

नानाची गर्लफ्रेंड

छायाचित्रकार

गण्याची मैत्रीण – अनिता

गण्याची बहीण सारिका

ऋशिकेष देसाई

कंपनी साहेब

गण्याची आई

गण्याची लहान बहीण

संत्या

रुपेश

लेखक, संकलक, दिग्दर्शक
लेखक, संकलक, दिग्दर्शक दिगंबर राजेंद्र वीरकर यांचा ईमेल-आयडी: digambarvirkar1112@gmail.com
लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.

Wow superr!!