Fight With Covid 19

Fight With Covid 19 कोव्हिडवर विजय – एक अनुभव

Fight With Covid 19 कोव्हिडवर विजय – एक अनुभव

काही कोविड योद्धे असेही!!

महाराष्ट्रातील पुणे जवळच्या तळेगाव दाभाडेची कन्या सायली साठे-वर्तक. ज्या आता एका आर्मी ऑफिसरची पत्नी म्हणून काश्मीरला रहात आहेत. त्यांना आलेला कोविडचा अनुभव, त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात, हे त्यांच्याच शब्दात वाचा.
मूळ लेखिका: सायली साठे-वर्तक | संकलक: चारुदत्त सावंत

सध्या आम्ही काश्मीरमधल्या एका खेडेगावात एक छोटासा सैन्याचा तळ आहे तिथे राहत आहोत. खरे तर इथे फक्त अधिकारी आणि जवानांनाच राहणे शक्य आहे पण कोरोनामुळे ऑनलाईन शाळा चालू आहे त्यामुळे आम्ही काही कुटुंबे देखील काही महिन्यांसाठी इथे राहतोय. छोटा तळ म्हणजे अर्थातच कमीतकमी सुविधा. तर अश्या या छोट्याश्या ठिकाणी जर कोविड मागे लागला तर काय काय होऊ शकते त्याची ही कथा!

काश्मीरमध्ये बाकीच्या वेळी काय परिस्थिती असते हे वेगळे सांगायला नकोच आणि त्यामुळे इथून बाहेर पडणे म्हणजे फक्त अगदीच अपरिहार्य कारण असेल किंवा तुम्ही वैयक्तिक कारणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडायला परवानगी आहे. अर्थातच एप्रिल महिना म्हणजे ट्युलिप्सचा बहर. खरे म्हणजे २०१३ मध्ये आम्ही ट्युलिप गार्डनला एकदा भेट दिली होती; पण ट्युलिप्स ही फुलंच इतकी सुंदर आणि दुर्मिळ आहेत की, इतक्या जवळ राहून त्यांना बघायचा मोह टाळता आला तरच नवल. त्यामुळे बाहेर कोविडच्या परिस्थितीत देखील ११ एप्रिलला आम्ही ट्युलिप गार्डन पहायला म्हणून पहिल्यांदाच या तळाच्या बाहेर पडलो. अर्थातच मास्क, सॅनिटायझर वगैरे कोरोनामधली सगळी काळजी घेऊनच. शिवाय फोटो काढायचा मोह टाळून अगदी मोजकेच फोटो आणि ते सुद्धा जिथे गर्दी नसेल तिथे थांबून काढले.

पण काही बाबतीत होणाऱ्या गोष्टी टळत नाहीत तसेच झाले. लगेचच १३ तारखेला पाडव्याला मला संध्याकाळी ताप आला आणि समोर कोविडचे एक संकट उभे राहतंय का? अशी शक्यता वाटायला लागली. इथे छोटासा तळ आणि सरकारी आदेशाप्रमाणे सगळ्या जवान आणि अधिकाऱ्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. शिवाय अजून तरी इथे फारसा कोणालाही कोविड न झाल्यामुळे १४ एप्रिलला मला अँटिबायोटिक्स दिले आणि घरी पाठवले. पण मला अजिबात बरे वाटत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा मला ‘Bed Ridden’ असणे कसे असेल याची कल्पना आली. कारण तीन दिवस मी उठूच शकले नाही. १७ एप्रिलला माझा अँटिबायोटिकसचा डोसही संपला तरी माझी अवस्था ठीक नव्हती, आणि त्याच सकाळी मला जाणवले की मला चव आणि वास जाणवत नाहीए. त्यामुळे परत आम्ही डॉक्टरकडे धाव घेतली. आणि जे नको तेच झाले, माझी RAT टेस्ट पॉसिटीव्ह आली. तसा कदाचित हा हादरा बसेल याची तयारी मी १४ तारखेलाच केली होती, कारण यावेळचे तापाचे प्रकरण मला काही साधे वाटत नव्हते. लगेचच मुलांना आणि नवऱ्याला Isolate व्हायला सांगितले. आम्ही राहतो त्या फक्त २च खोल्या असल्यामुळे नवरा आणि मुले असे दोघे खाली राहणाऱ्या एका सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्याच्या घरी शिफ्ट झाले आणि अश्या प्रकारे एकटेपणाचा माझा कोविड प्रवास सुरु झाला.

या आजारात माझी इतकी प्रचंड वाट लागली होती की असे एकही लक्षण नाही जे मी अनुभवले नाही किंबहुना सगळी लक्षणे अगदी  पुरेपूर अनुभवली.

मला सलग १३-१४ दिवस ताप येत होता, पण १००च्या पुढे नव्हता

– घसा प्रचंड दुखत होता, इतका की आवंढा देखील गिळता येत नव्हता

– वास आणि चव जवळपास आठवडाभर गेली होती

– प्रचंड थकवा आणि अशक्तपणा होता आणि अजूनही थोडा आहे

जुलाब आणि उलट्या ही झाल्या

डोके दुखून झाले

– सर्दी खोकला शेवटी शेवटी झाला आणि कफाचे प्रमाण जास्ती होते

या सगळ्यात एकाच गोष्टीचे जास्त वाईट वाटत होते, ते म्हणजे माझी अन्नावरची वासना पूर्ण उडाली होती. इतकी की, नंतर चव परत आली तरी जेवण समोर येणार या विचाराने मला प्रचंड रडू यायचे, जेवायला लागणार या गोष्टीचा भयंकर ताण यायचा. जेवले की उलटी ठरलेली. औषधे गोळ्या ऑक्सिमीटर आणि थर्मोमीटर आणि गरम पाण्याचा थर्मास यांनीच माझा दिवाण एका बाजूने भरलेला असायचा.

त्यात भरीत भर म्हणजे इथले हवामान. आधीच कोविडचे भय, त्यात सलग आठ दिवस पडणारा पाऊस. म्हणजे ताप परवडला, पण पाऊस नको अशी अवस्था झाली होती माझी. त्यात एकटेपणाने तर नैराश्यात मध्ये जाण्याचा पुरता अनुभव घेतला मी.

ऋषी आणि माझ्या दोघांच्या आईबाबांना आणि माझ्या बहिणीला सोडून कोणालाही मी काहीही कळवले नाही. मुद्दाम, कारण एकूणच महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता कोणाला अजून माझ्यामुळे टेन्शन नको असे वाटले मला. अर्थातच इथे राहणाऱ्या सगळ्यांना लगेचच कळले होते आणि सगळ्यांनी अगदी फॅमिली असल्यासारखी मला मदत केली. इथे आम्ही कोणीच खरे तर घरी स्वयंपाक बनवू शकत नाही, सगळ्यांना मेसमधूनच जेवण घ्यावे लागते, पण तरीही इंडक्शन कूकटॉपवर, उपलब्ध आहे त्या सामानात तोंडाला चव नाही म्हणून कधी पोहे तर कधी शिरा, कधी घसा दुखतोय म्हणून चाटणच बनवून पाठव, कुठे ओवा-कापराची पुरचुंडी पाठव, शिवाय रोज एक तरी फोन करून माझी चौकशी करणे, मला काय हवे नको ते विचारणे हे इथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नींनी इमाने इतबारे केलं. अधिकारीदेखील ह्रिषीकडे माझी आणि त्या तिघांची जातीने चौकशी करत असत. या सगळ्यांचे प्रेम, आधार, माझी स्थिर राहिलेली ऑक्सिजन लेव्हल आणि देवावरची श्रद्धा यांनी मला तारले आणि ऍडमिट करायची वेळ सुदैवाने माझ्यावर आली नाही. आता मी आधीपेक्षा खूपच बरी आहे आणि हळू हळू पूर्वीसारखे रुटीन सुद्धा सुरु झाले आहे.

या अश्या परिस्थितीमध्ये जो कोविडमधून सुखरूप बाहेर पडला त्यालाही कोविड योद्धा म्हणतात पण माझ्या दृष्टीने माझ्यापेक्षाही खरे ‘कोवीड योद्धे’ ठरले ते माझी मुले आणि नवरा, आर्मीमधले डॉक्टर प्रगतीश ज्यांनी मला यातून बाहेर काढले आणि माझ्या डॉक्टर मैत्रिणी सारिका आणि अल्पना ज्यांच्या मी सतत संपर्कात होते. सारिका तर न चुकता मला रोज कॉल करायची, माझी चौकशी करायला आणि माझ्यातली पॉसिटीव्हिटी कायम ठेवण्याचा प्रयत्न करायची. अल्पनाशी बोलले तेव्हा, तिने पहिली माझी कोविडची भीती घालवली. आणि तिचे उत्तम निदान, निरीक्षण आणि अनुभवाच्या आधारावर, मी या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकेन हा विश्वास दिला.

मी जसे सांगितले त्याप्रमाणे आमचे ठिकाण खूप दूर आणि एकाकी ठिकाणी आहे आणि या छोट्याश्या स्टेशनमध्ये एकच डॉक्टर आहे ज्याच्यावर इथल्या सगळ्या अधिकारी, जवान आणि कुटुंबाची जवाबदारी आहे. अश्या परिस्थितीमध्ये पॅनिक न होता पेशंटला धीर देणे, आहे त्या आणि योग्य औषंधामध्ये पेशंटला सेवा देणे म्हणजे फारच अवघड काम आहे. शिवाय हा एकच डॉक्टर इथे आहे म्हणजे समजा त्याला कोविड झाला तर आनंदच. अश्या परिस्थितीत दुसऱ्याची काळजी घेता घेता स्वतःलाही जपावे लागते. तरीदेखील पहिल्या दिवशी आणि साधारण १३ दिवसांनी जेव्हा माझा ताप कमी होत नाहीए म्हणल्यावर स्टेथोस्कोपने डॉक्टरने मला व्यवस्थित तपासले, मला धीर दिला आणि मला ऍडमिट होण्यापासून वाचवले. त्यांचे वय देखील फार नाही, पस्तिशीचा असेल फार तर.

आणि माझ्या या परिस्थितीत व्यावसायिक आयुष्यात असलेला माझा योद्धा म्हणजे माझा नवरा वैयक्तिक आयुष्यातही योद्धा बनला. माझी परिस्थिती फारशी ठीक नसताना देखील स्वतःचा संयम आणि धैर्य ढळू न देता, मुलांची, स्वतःची आणि माझी उत्तम काळजी घेतली. नाहीतर क्वचित एखादा खचून गेला असता, पण मुळात आहे त्या परिस्थितीमध्ये संकटावर मात करणे हे प्रशिक्षणातच शिकवलेले असल्यामुळे डॉक्टर काय किंवा सैनिक काय, कुठल्याही गोष्टीची तयारी बाळगूनच असतात हे खरे!

त्याच्यानंतरचे सगळ्यांत महत्वाचे कोविड योद्धे म्हणजे १० आणि ६ वर्षांची आमची मुले जी १०-१२ दिवस आईशिवाय राहिली. बाबांबरोबर घरात राहून त्यांना जमेल तशी मदत करणे, मेस मधून येईल ते जेवण नखरे न करत खाणे आणि दररोज वाफारा घेणे, गुळण्या करणे, माझ्या ह्या आजारात त्यांची ऍडमिशनही रखडली होती त्यामुळे अतिशय कंटाळा येऊनही आपले मन रमवत राहणे म्हणजे कमाल आहे त्यांची. अशी माझी गुणी मुले माझ्यापासून लांब होती आणि मी घरात भुतासारखी एकटी होते त्यामुळे मला घर खायला उठत होते क्षणोक्षणी.

या सगळ्यांबरोबरच ग्रेट म्हणजे आमचे हरीश भैय्या आणि मेसमध्ये सगळ्यांचे जेवण बनवणारे कूक भैय्या ज्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना जेवण घरपोच मिळत होते. शिवाय एवढ्या स्वयंपाकाच्या गोंधळात कधी मला साबुदाण्याची खीर तर कधी मुगाच्या डाळीची खिचडी बनवून दे अशी मदत करत होते. हरीश भैय्यांचे कोविडचे दोन्ही डोस झाले आहेत पण तरीही भीतीचे सावट होतेच. पण त्यातही स्वतःचा जीव सांभाळत, प्रचंड पाऊस असताना देखील आम्हाला हवे नको ते आणून देणे आणि न चुकता सख्ख्या भावासारखे मला रोज विचारणे, “मॅडम आज कैसी है तबियत?” म्हणजे ते देखील एक योद्ध्याचेच काम आहे.

मला थोडे बरे वाटू लागल्यावर माझ्या मैत्रिणींनी, नातेवाईकांनी, तसे सगळ्यांनी माझी जातीने चौकशी करून मला खूप धीर दिला. अश्या सगळ्यांचे आणि माझ्या सगळ्या कोविड योध्यांचे मनापासून आभार! आणि नेहमीप्रमाणे आमच्या पाठीशी असणाऱ्या सैन्यदलाला माझा सलाम!

तर अश्याप्रकारे ट्युलिप गार्डन भेट मला फारच महागात पडली असे वाटेपर्यंत या सगळ्यात एक गम्मत झाली, म्हणजे आम्ही ज्या ३ फॅमिलीज गेलो होतो ट्युलिप गार्डनला, त्यातल्या फक्त मला एकटीला कोविड झाला. म्हणजे परत प्रश्न उभा राहिला की नक्की प्रसाद मिळाला कुठून…? कदाचित नंतर जेवायला गेलो त्या ठिकाणी मिळाला असेल पण ते शोधणे इतके सोपे असते तर काय?

पण या सगळ्यांत एका गोष्टीची मला खात्री पटली की जी काही लक्षणे मी सहन केली त्यावरून तो वेडा कोरोना एखाद्या मजनूसारखा माझ्या मागे लागला होता जो मला सोडायलाच तयार नव्हता… इतकेही प्रेम बरे नव्हे, नाहीका?

तळटीप:

आता मला बरेच बरे वाटत आहे तरीही काळजी घेणे चालूच आहे.

जरी सगळ्यांना माहीत आहेच तरीही सांगते, हा नवीन कोरोना फार लवकर पसरतोय त्यामुळे, लोकहो, अजिबात बाहेर पडू नका. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची खूप खूप काळजी घ्या. वाफारा, गुळण्या, व्हिटॅमिन्स घेणे चालू ठेवा, भरपूर पाणी प्या आणि या खतरनाक शत्रूला न घाबरता त्याच्यापासून स्वतःचे रक्षण मात्र नक्की करा.

मला कोणालाही या पोस्टद्वारे घाबरवायचे नाहीए, उलट धीर सोडला नाही कोविड मधून तर आपण नक्कीच बाहेर पडू शकतो हे सांगायचे आहे. तरी कृपया कोणी हि पोस्ट नकारात्मकपणे घेऊ नये.

Copyright © सायली साठे-वर्तक


लेखिकेचा परिचय:

व्यवसायाने शिक्षिका (सध्या गृहीणी)

महाराष्ट्रातील वास्तव: तळेगाव दाभाडे

त्यांचे यजमान भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहेत (सध्या वास्तव्य – काश्मीर येथे)


Cover Image by Alexandra_Koch from Pixabay

Similar Posts

One Comment

  1. Bravo 👏👏👏👏👏Salute to your children, husband, doctor friends, the officer and his wife and the selfless brother. Become healthy soon and enjoy the gifts of nature with all again. Thanks for sharing your experience.
    Thanks Mr. Sawant for posting this experience.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply