My Village Scene - Kude Khurd

माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

साधारण १९७२ च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो.

१९७२ च्या दुष्काळाची झळ अवघ्या महाराष्ट्राला लागली होती. १९७० ते १९७२ या कालखंडात अपुऱ्या पावसामुळे सलग तीन वर्षे शेतकऱ्याच्या हातात काहीच पीक लागले नव्हते, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याकाळी शासनाने रोजगार हमी योजनेतून (रोहयो) सर्वसामान्य दुष्काळग्रस्तांच्या हाताला काम दिले. रोहयो तर्फे आमच्या गावात सुद्धा कामे सुरु होती. आमचे गाव कुडे खुर्द ते कुडे बुद्रुक दरम्यान रस्त्याच्या बांधकामाचे काम गावकऱ्यांना देण्यात आले. त्याकाळी दांडाच्या माळावरील अवघडपणामुळे या दोन्ही गावादरम्यान रस्ता नव्हता. गावातील झाडून सर्व गावकरी स्त्री, पुरुष कुठलाही भेदभाव न बाळगता या रोहयोच्या योजनेवर कामाला होते. माझे नाना, काकू तर होतेच पण माझी आजी सुद्धा या रोहयोच्या कामावर जात असे. दिवस उजाडल्यावर घरची कामे आटोपली कि गावातील पुरुष मंडळी हातात घमेलं, फावडे, पहारी इत्यादी साहित्य घेवून रोहयोच्या कामावर निघत, स्त्रिया पाण्याची कळशी अथवा हंडा कडेवर आणि भाकरीची टोपली डोक्यावर घेवून कामावर निघत. एखाद्या माउलीच्या कडेवर लहान मूल असे. आणि दिवस मावळायच्या आत सर्व जण घरी परत येऊन गुराढोरांचे बघत. त्याकाळी अगदीच म्हातारे स्त्री पुरुषच फक्त गावात सापडत, बाकी सर्व गाव रिकामे असायचे, लहान मुले पण गंमत म्हणून रोहयोवर गेलेली असायची (त्याचे कारण वेगळेच होते).

दांडाच्या माळावरील चढाच्या ठिकाणी खूपच मोठा आणि कडक दगड लागल्याकारणाने तेथील काम तसेच सोडून देवून पुढील काम सुरु होते. मी गावी गेलो तेव्हा कुडे बुद्रुकच्या हद्दी अगोदरच्या उतारावर रस्त्याचे बांधकाम चालू होते. मी माझ्या आजी बरोबर तिकडे जायचो. एका झाडाखाली बसून मी सर्व बघत बसायचो. सडकेच्या मधल्या मुख्य भागाचे सपाटीकरण झाले होते. सडकेच्या दोन्ही बाजूची गटारे तयार करण्याचे काम जोरात सुरु होते. तरुण आणि धडधाकट पुरुष मंडळी जमीन खोदणे, दगड-खडी फोडणे, दगड हलविणे अशी कामे करत. स्त्रिया माती, दगड वाहून दुसऱ्या बाजूला टाकणे अशी कामे मुख्यत्वाने करत असत. कामाच्या ठिकाणी थोडासा गोंगाट देखील असायचा, पण सर्वजण भर उन्हात मन लावून काम करीत असत. फावडी आणि पहारींची खणखण, घमेली जमिनीवर किंवा मातीत आपटल्याचे आवाज, मुकादम किंवा गटप्रमुख यांची ओरड असे अनेक आवाज तेथे ऐकू यायचे. मुलांचा आरडाओरडा, रडारड हि सुद्धा सोबतीला असायची. आमच्या गावाकडे सगळीकडे लाल माती आहे. कामे चालू असताना लाल माती उधळायची, सर्वांची कपडे लाल व्ह्यायची. बहुतेक ढोबळे गुरुजी देखरेखीवर होते. कित्येकदा अवघड ठिकाणी सुरुंग लावला जायचा. पहारीने साधारण चार ते सहा इंच खोल आणि दीड इंच रुंद असा उभा किंवा थोडसा तिरका खड्डा कातळात केला जायचा. त्यात दारू भरून वात काढली कि सर्वांना सावध करून दूर केले जायचे अन सुरुंगाची वात पेटवली जायची. स्फोट झाल्यावर धडामधूम्म असा मोठा आवाज यायचा. दगड, कपारी यांचा राखाडी रंगाचा धुरळा वर उडायचा. आणि त्याच्या मागोमाग त्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू यायचा. स्फोटामधून आपल्या अंगावर काहीच उडणार नाही याची काळजी घेवून सर्व दूरवर उभे असायचे. धुरळा खाली बसला कि सर्व पुढे सरसावून पुढच्या कामाला लागायचे.

(अशा तऱ्हेने रोजगार हमी योजनेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यातील भ्रष्टाचार हा वेगळा विषय आहे. पण दुष्काळाच्या काळात रोख रक्कम आणि अन्नधान्य देवून सरकारने ग्रामीण जनतेला कसे सांभाळले याचे हे उत्तम उदाहरण आहे.)

तर ह्या रोजगार हमी योजनेशी माझा खूपच जवळचा संबंध राहिला आहे. मी मुंबईकर, शिवाय वयाने लहान, असे असताना माझा याच्याशी संबंध कसा? त्याचा संबंध येतो, तो वर उल्लेख केल्याप्रमाणे गावातील इतर मुले देखील ह्या कामावर अशीच येत असत. आमच्या सर्व मुलांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा एकच विषय असे. दिवस संपल्यावर सरकारतर्फे मिळणारी ‘सुकडी’. रोहयोवर असलेल्या सर्व स्त्री पुरुषांना हि सुकडी भरपूर मिळायची. दुष्काळ काळात धान्याच्या तुटवड्यामुळे पोषक आहाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गव्हाचे पीठ, गूळ आणि अन्य पदार्थ यांपासून तयार केलेल्या ह्या पौष्टिक ‘सुकडी’ चे वाटप रोहयोवरील सर्वांना करण्यात यायचे. सुकडीची पोती शाळेत आलेली असायची. हि ‘सुकडी’ खूपच चवदार लागायची. भांडी भरभरून सुकडी दिली जायची. त्याकाळी महाराष्ट्रातील कित्येक गरीब घरांमध्ये ‘सुकडी’ हे रात्रीचे मुख्य अन्न असायचे. आमच्या घरात तसे सुकडीचे फार कौतुक नव्हते. पण मला सुकडी खूप आवडायची. आम्ही मुलें खूप सुकडी जमावायचो. मुलांनी सकाळीच येताना अल्युमिनीयमचा छोटा टोप (पातेले) सोबत आणलेला असायचा. मुले टोप भरभरून सुकडी घ्यायची. मग आम्ही रस्त्याने सुकडी खात खात घरी यायचो. ज्यांनी ही सुकडी खाल्ली असेल त्यालाच माहिती सुकडीची चव आणि महत्व काय असते. शहरातील लोकांना आणि नवीन पिढीला हा शब्द फक्त वाचून किंवा ऐकूनच माहित असेल. मी मात्र मजा केली सुकडी खाण्याची. गावातील मुले तर दिवसभर सुकडी खात असत. शिवाय या मुलांना शाळेत सुद्धा दुपारी सुकडीच मिळत असे.

आता वाहनाने त्या रस्त्याने येजा करताना ते झाड दिसते, अन त्या आठवणी जाग्या होतात. गाडीतील सर्वांना पुन्हा पुन्हा ती कथा ऐकवली जाते. अन नजर नकळत हळूच आजूबाजूला फिरते, ज्या झाडाखाली आजी बसायची ती जागा पुन्हा पाहून घेतो.

थोडे मोठे झाल्यावर एकदा हिवाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. मित्रांबरोबर माळावरच्या शेतावर सकाळी फिरायला गेलो. हिवाळयात पहिल्यांदाच गेलेलो होतो. तेव्हाचा निर्सग वेगळाच असायचा. भात कधीच काढून झालेले असायचे. आता शेतात गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, हरभरा अशी पिके उभी असायची. ज्वारी, बाजरीची कणसे वाऱ्याने डोलत असायची. गव्हाच्या ओंब्यावरचा ओलसरपणा दिसून यायचा. रानात आमच्या उंचीपेक्षा मोठ्या सुकलेल्या गवतातून वाट काढताना कुसळे अंगाला टोचायची. अशा छान वातावरणात वावरांतून जात आम्ही टेकडी उतरून खालच्या शेताच्या वाटेकडे निघालो.

अचानक एकाने मला विचारले, “चारू, दूध पिणार का?”.

दूध हा माझ्या आवडीचा विषय. मी म्हणालो “हो, पण इथे कुठं मिळणार?”.

“तुला काय करायचंय? पिणार का सांग”. तो म्हणाला.

मी होकार दिला. त्याबरोबर मला तिथेच थांबायला सांगून दोघे तिघे जरा बाजूला टणटणीच्या झाडांमागे गेले. जरा सळसळ, झटपट ऐकू आली. अन मला हाक मारली.

मी पुढे जावून पहातो तर काय, या बहाद्दरांनी कोणाची तरी मोठ्या आचळाची दूधवाली शेळी चरताना पकडलेली. एकाने तिचे पाय धरून ठेवलेले, दुसऱ्याने तिला घट्ट धरून ठेवलेले. तिसऱ्याने शेळीचा सड पकडला आणि मला म्हणाला “ये इकडं, मी दूध काढतो, तू पी दूध”. मग आम्ही सर्वजण दोन दोन घोट ताजे दूध पिऊन घेतले. अन दिले शेळीला सोडून, ती धूम पळाली.

तिथून खाली न जाता परत वावरांकडे निघालो. पायवाटेने एका भुईमुगाच्या वावरात घुसलो. आमच्यापैकीच एकाचे होते, त्याने आम्हाला नेलं वावरातील त्रिकोणी खोपामध्ये. एखादा माणूस झोपू शकेल अशा आकाराची ती खोप होती. आतमध्ये गोधडीसुद्धा होती. खोपीच्या बाहेरच्या बाजूला रात्री राखणदाराने पेटवलेल्या शेकोटीची राख दिसत होती. मला घेऊन वावरात गेला, खाली बसून त्याने मेथीच्या भाजीसारख्या दिसणारा पाला दोन्ही हाताने धरून जोर लावून उपटला. खालच्या बाजूला कोवळ्या भुईमुगाच्या लाल शेंगा दिसत होत्या. मग मी पण दोन तीन जुड्या उपटल्या. आम्ही खोप्या जवळ आलो. तेथे त्याने मातीत एक छोटा खड्डा केला. गवत आणि पालापाचोळा टाकला. आमच्याजवळ आमच्या गुप्त कार्यात उपयोगी पडणा री काडेपेटी गुप्तपणे कायम ठेवलेली असायची. आम्ही तिचा वापर करून जाळ केला अन त्या विस्तवावर वावरातून उपटलेल्या ताज्या कोवळ्या शेंगा मस्त भाजून घेतल्या अन खोप्यात बसून पोटभर खाल्या. अशा तऱ्हेनं ज्वारीचे आणि गव्हाच्या ओंब्यातील कोवळे दाणे, हरभऱ्याचे दाणे खाल्याचे आठवते.

उन्हाळ्याच्या सुट्टीत करवंदं खाण्याची चंगळ व्हायची. त्या काळी गावासमोरच्या दांडाच्या माळावर दोन्ही बाजूच्या उतारावर टणटणीची मोठी झाडी होती. झाडी पलीकडील माणसे आणि रस्ता दिसून येत नसे. लाल मातीची, दगडधोंडयांनी भरलेली नागमोडी वाट असलेला हा दांडाचा रस्ता मला खूप आवडत असे. त्याकाळी आमच्या घराशेजारचे घर छोटे होते, त्यामुळेच दांडाचा नागमोडी रस्ता, त्यावरील दाट झाडी आमच्या अंगणातील दगडावर उभा राहून मी निरखत असे. ह्या झाडींमध्ये सगळीकडे करवंदाच्या जाळ्या होत्या.

करवंदाची जाळी – मे २०१

माझ्या शेजारच्या एकनाथ धंद्रेची शेती त्या भागात होती. एकदा त्याच्या बरोबर करवंद गोळा करण्यासाठी आम्ही काही मित्र दांडाच्या माळावर गेलो. पलीकडच्या उतारावर करवंदं जास्त आहेत हे कळल्यावर तिकडे गेलो. काळीजर्द टपोरी करवंद जाळीवरून खात खात हातातील टोपामध्ये गोळा करण्याचे ही काम चालूच होते. करवंद गोळा करण्याच्या नादात आम्ही तिघे चौघे झाडीत जरा आतमध्ये घुसलो होतो. अचानक वेगळा आवाज ऐकू आला. प्रथम थोडे दुर्लक्ष केले. पायाखाली सुकलेला पालापाचोळा खूप होता, वाटले आमच्याच पायाचा आवाज असेल. परत तो आवाज आला. आता मात्र मी सावध झालो. मनात म्हटले, हा आवाज जरा वेगळाच आहे. मग गर्रकन वळून आवाजाच्या दिशेनं वर पाहिलं, तर काय. माझ्या डाव्या हाताला एकनाथ करवंद जाळीवरून काढीत होता, आणि त्याच्या डोक्याच्या फूटभर उंचीवर एक भला मोठा अजगर त्याच्या दिशेनं खाली सरकत होता. आणि मी सुद्धा त्या अजगरापासून काही फार लांब नव्हतो, फक्त दोन अडीच फूट अंतर अलीकडं. अजगराला पहिल्यावर मागे सरकत मी जोरात ओरडलो, ” नाथा पळ, डोक्यावर साप आहे.” तेव्हा सगळ्यांचं लक्ष वर गेलं, अन मग काय. तिथून आम्ही सर्वांनी जी धूम ठोकली, ती आठ दहा मिनिटे पळून आपापल्या घरात गेल्यावरच थांबलो. घरी काही सांगितले नाही, परत त्या ठिकाणी गेलो नाही.

पुढच्या भागात आणखी आठवणी.

छायाचित्र सौजन्य: एक ग्रामस्थ, कुडे खुर्द.

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply