‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय?

‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वजवंदन’ म्हणजे काय?

‘१५ ऑगस्ट’ चा स्वातंत्र्यदिन आणि ‘२६ जानेवारी’ चा प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस म्हणजे शालेय जीवनातील महत्वाचे राष्ट्रीय सण! लहान वयात असताना फार काही कळायचे नाही. पण जुलमी ब्रिटीश, स्वातंत्र्य लढा, देशभक्त, क्रांतिकारक, भगतसिंग, गांधी, नेहरू, नेताजी सुभाष, लोकमान्य टिळक अशे शब्द आणि अशी नावे अभ्यासात आलेली असायची. त्या लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचा हा उत्सव आपण साजरा करायचा एवढे मात्र कळायचे. ह्या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी सकाळी लवकर उठून इस्त्री केलेला शाळेचा गणवेश इनशर्ट करुन, कॅनव्हासच्या बुटाला सफेद खडूने रंग दिलेला, आईकडून तेल लावून केस विंचरून घ्यायचे, कमरेला काळा पट्टा, मुलींच्या डोक्यावर दोन वेण्या आणि त्यावर दोन रिबिनी अशा विविध प्रकारांनी सजून मुले मुली शाळेत जायची. शाळेत गेल्यावर झेंडावंदन, कवायत, भाषण, गावात अथवा आपल्या विभागात एक एखादी फेरी आदी भरगच्च कार्यक्रमाने आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जायचा. त्या दिवशीचे वातावरण खूपच उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक असायचे.

आपण झेंडावंदन करून आनंदात आणि मजेत घरी परत यायचो.

आजही आपली १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरे करण्यामागे हीच संकल्पना आहे.

पण मग आपण मोठे कधी होणार?

राष्ट्रध्वज म्हणजे प्रत्येक देशाची ओळख आणि सन्मान चिन्ह असते. भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी सैनिक प्राणाची बाजी लावतात, प्रसंगी बलिदान देतात. ह्या आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आपल्या किती माहीती आहे?

एक सुशिक्षित नागरिक म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्यामध्ये फरक असतो ह्याची आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आणि जर माहीत नसेल तर आतापर्यंत आपण काय शिकलो?

चला तर मग पाहूया यात काय फरक आहे तो.

१५ ऑगस्ट’ या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो. १५ ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता. म्हणून याला ‘ध्वजारोहण’ (इंग्रजीत – Flag Hoisting, हिंदी मध्ये – ध्वजारोहण) असे म्हटले जाते

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ‘ध्वजारोहण’ करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात.

२६ जानेवारी’ या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज हा अगोदरच वर बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (इंग्रजीत – Flag Unfurling, हिंदी मध्ये – ध्वज फहराना) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशावासियांना संबोधन करून भाषण करतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टच्या सायंकाळी राष्ट्रपति देशावासियांना संबोधन करून भाषण करतात.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सैनिक, अर्धसैनिक बल आदींच्या मोठ्या परेडचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या सेनादल, वायुदल आणि नाविक दलाच्या ताकदीचे प्रदर्शन केले जाते. देशातील सांस्कृतिक विविधतेचे देखील प्रदर्शन केले जाते.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कुठलीच परेड केली जात नाही.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जात नाही.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रप्रमुख यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जाते.

तर ह्या आहेत आपल्या राष्ट्रध्वजाविषयी काही प्राथमिक गोष्टी.

आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अधिक माहिती करिता आपण भारत सरकारचे अधिकृत ‘Flag Code of India’ येथे वाचू शकता.
१) भारतीय ध्वज संहिता २००६ – मराठी
२) Flag Code of India 2002 – इंग्लिश
३) भारतीय झंडा संहिता २००२- हिंदी

आपल्या पूर्वजांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत. आम्ही त्यांच्या काळी असतो तर आम्हीही आमचे प्राण देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अर्पण केले असते असे आपण सहजच बोलून जातो.

पण लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट, हालअपेष्टा, त्याग करावा लागलेला आहे. आता आपल्या पिढीचे मोठे कर्तव्य आहे ते म्हणजे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याकरिता आपल्या पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रभावना तेवत ठेवणे आपल्याला गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व आणि माहिती नवीन पिढीला देणे, राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान कसा ठेवावा याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणजे २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचे ‘ध्वजारोहण’ करण्याची घोडचूक आपल्याकडून होणार नाही.

हे सर्व लिहिण्याचं कारण कि, गेले काही वर्षे कित्येक शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था यांची २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची छायाचित्रे पाहताना, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी कित्येकांनी राष्ट्रध्वज ‘फडकावण्या’ ऐवजी ‘ध्वजारोहण’ केलेले दिसून आले आहे. खरेतर हा चक्क राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. केवळ सर्वांच्या नजरचुकीने हि गोष्ट कोणाच्याच नजरेत आली नाही, म्हणून हि बाब क्षम्य ठरत नाही.

आणि जर आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याची चूक झाली असेल, तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण नकळत अवमान केलेला आहेत, तो यापुढे होवू देणार नाही, असा निश्चय परवाच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या राष्ट्रध्वजाला ‘ध्वजवंदन’ करीत असताना आपण करावा.

आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अजूनही सांगण्यासारखे खूप आहे, पण हा दुर्लक्षित असलेला विषय आपणासमोर प्रथम मांडणे गरजेचे वाटले.

असो. स्वतंत्र भारताच्या ‘७२व्या प्रजासत्ताक दिना‘च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

भारतीय ध्वज संहिता सौजन्य: https://knowindia.gov.in/national-identity-elements/national-flag.php

Cover Photos Courtesy: http___www.techicy.com_wp-content_uploads_2015_01_indian-flag-photos-hd-wallpapers-download-free

लेखन दिनांक: २४ जानेवारी २०२१

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२१, संपर्क: ८९९९७७५४३९

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.