प्रत्येकाच्या आयुष्यात एखादया स्थानाचे अप्रूप असते, तसे मला माझ्या मूळ गावाचे अप्रूप आहे. प्रत्येकाकडे अशी एक लहानपणीची जुनी आठवण बांधून ठेवलेली सापडेल. लहानपणी एखाद्या स्थानाचा ठसा बालमनावावर पडला तर तो आयुष्यात न पुसणारा ठसा बनतो. तसेच मला माझ्या गावाच्या आठवणीविषयी वाटते.
तसा माझा जन्म मुबंईचा. परंतु माझ्या गावाचे (My Village) वेड मला लहानपणापासूनच लागले. इतक्या लहान वयातील गोष्टी किंवा प्रसंग माझ्या लक्षात राहणे शक्यच नाहीय, परंतु त्यावेळेस काढलेल्या काही कृष्णधवल छायाचियात्रांतून आणि काही ऐकीव गोष्टींमधून तसे स्पष्ट होते. मी बहुतेक अडीच ते ३ वर्षांचा असेन तेव्हा मला गावी राहण्याचा योग आला. परंतु अंदाज लावता येतो की, मला गावाचे वेड लागण्यामागे माझी आजी सत्यभामा, माझे चुलते म्हणजे माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, आम्ही त्यांना नाना म्हणायचो, माझी चुलत आत्या ताराआत्या, जी माझ्यापेक्षा वयाने ५-१०च वर्षानेच मोठी असावी, तिचे आईवडील म्हणजेच माझे चुलत आजी-आजोबा म्हणजे तिचे आईवडील हे तिच्या लहानपणीच देवाघरी गेले असल्यामुळे ती आमच्याच घरी लहानाची मोठी झाली. तेव्हापासून ताराआत्या माझे आणि नंतर माझ्या भावंडांचे खूपच लाड करायची, ती नुकतीच देवाघरी गेली परंतु तिचे प्रेम मात्र शेवटपर्यत कायम होते. स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त लाड ताराआत्याने आम्हा भावंडांचे केले आहे. त्यावेळेस गावी गेल्यावर आजी, नाना आणि ताराआत्या हे सर्व जण जिथे जातील तिथे ते मला नेत असे, गोठ्यात जाऊन गुरांना वैरण घालणे व पाण्यावर नेणे, बैलगाडीतून फिरणे, शेतावर जाणे, संध्याकाळी देवळात किर्तनाला जाणे आणि सर्वांकडून लाड करून घेणे असे ते दिवस होते. बैलांचे वेड सुद्धा मला तेव्हाच लागले. निरनिराळ्या प्रकारची, रंगाची बैल पाहणे हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय.
