ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे म्हणजे काय? | Flag Hoisting V/S Flag Unfurling

📚 लेख: ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे म्हणजे काय? | Flag Hoisting V/S Flag Unfurling
📖 लेखक: चारुदत्त सावंत
🎯 वाचक: सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, पालक
⏱️ वाचन वेळ: अंदाजे १० मिनिटे


१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचे महत्त्व

‘१५ ऑगस्ट’ चा स्वातंत्र्यदिन आणि ‘२६ जानेवारी’ चा प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस म्हणजे शालेय जीवनातील महत्वाचे राष्ट्रीय सण! लहान वयात असताना फार काही कळायचे नाही. पण जुलमी ब्रिटीश, स्वातंत्र्य लढा, देशभक्त, क्रांतिकारक, भगतसिंग, गांधी, नेहरू, नेताजी सुभाष, लोकमान्य टिळक अशे शब्द आणि अशी नावे अभ्यासात आलेली असायची. त्या लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचा हा उत्सव आपण साजरा करायचा एवढे मात्र कळायचे. ह्या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी सकाळी लवकर उठून इस्त्री केलेला शाळेचा गणवेश इनशर्ट करुन, कॅनव्हासच्या बुटाला सफेद खडूने रंग दिलेला, आईकडून तेल लावून केस विंचरून घ्यायचे, कमरेला काळा पट्टा, मुलींच्या डोक्यावर दोन वेण्या आणि त्यावर दोन रिबिनी अशा विविध प्रकारांनी सजून मुले मुली शाळेत जायची. शाळेत गेल्यावर झेंडावंदन, कवायत, भाषण, गावात अथवा आपल्या विभागात एक एखादी फेरी आदी भरगच्च कार्यक्रमाने आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जायचा. त्या दिवशीचे वातावरण खूपच उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक असायचे.

आपण झेंडावंदन करून आनंदात आणि मजेत घरी परत यायचो.

आजही आपली १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरे करण्यामागे हीच संकल्पना आहे.

पण मग आपण मोठे कधी होणार?

राष्ट्रध्वज म्हणजे प्रत्येक देशाची ओळख आणि सन्मान चिन्ह असते. भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी सैनिक प्राणाची बाजी लावतात, प्रसंगी बलिदान देतात. ह्या आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आपल्या किती माहीती आहे?एक सुशिक्षित नागरिक म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्यामध्ये फरक असतो ह्याची आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आणि जर माहीत नसेल तर आतापर्यंत आपण काय शिकलो?

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आणि २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवताना ‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ या दोन संज्ञा आपण अनेकदा ऐकतो. पण या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? Flag Hoisting आणि Flag Unfurling या संज्ञांचा अर्थ काय आहे? चला, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

टीप: सामान्य वापरात ‘ध्वजारोहण’, ‘ध्वज फडकावणे’, ‘Flag Hoisting’ आणि ‘Flag Unfurling’ या संज्ञा कधी कधी एकमेकांच्या अर्थाने वापरल्या जातात. या लेखात मात्र दोन्ही समारंभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेतील फरक सोप्या पद्धतीने स्पष्ट केला आहे.

चला तर मग पाहूया यात काय फरक आहे तो. ‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling

ध्वजारोहण म्हणजे काय? – Flag Hoisting

‘१५ ऑगस्ट’ या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो. १५ ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता. म्हणून याला ‘ध्वजारोहण’ (इंग्रजीत – Flag Hoisting, हिंदी मध्ये – ध्वजारोहण) असे म्हटले जाते

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ‘ध्वजारोहण’ करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात.

ध्वज फडकावणे म्हणजे काय? – Flag Unfurling

‘२६ जानेवारी’ या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज हा अगोदरच वर बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (इंग्रजीत – Flag Unfurling, हिंदी मध्ये – ध्वज फहराना) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती कर्तव्य पथ (पूर्वीचा राजपथ) येथे झेंडा फडकवतात.

ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे यातील मुख्य फरक

मुद्दा१५ ऑगस्ट२६ जानेवारी
प्रक्रियाध्वजारोहणध्वज फडकावणे
EnglishFlag HoistingFlag Unfurling
राष्ट्रध्वजाची स्थितीखालील स्थितीतून वर नेला जातोआधीच वर बांधलेला असतो
प्रमुख व्यक्तीपंतप्रधानराष्ट्रपती
प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रमस्वातंत्र्यदिन सोहळाप्रजासत्ताक दिन सोहळा
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशावासियांना संबोधन करून भाषण करतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टच्या सायंकाळी राष्ट्रपति देशावासियांना संबोधन करून भाषण करतात.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सैनिक, अर्धसैनिक बल आदींच्या मोठ्या परेडचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या सेनादल, वायुदल आणि नाविक दलाच्या ताकदीचे प्रदर्शन केले जाते. देशातील सांस्कृतिक विविधतेचे देखील प्रदर्शन केले जाते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कुठलीच परेड केली जात नाही.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जात नाही.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रप्रमुख यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जाते.

तर ह्या आहेत आपल्या राष्ट्रध्वजाविषयी काही प्राथमिक गोष्टी.

राष्ट्रध्वजासंबंधी अधिकृत नियम आणि माहिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारच्या Flag Code of India चा संदर्भ घ्या.

राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान का आवश्यक आहे?

हे सर्व लिहिण्याचं कारण कि, गेले काही वर्षे कित्येक शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था यांची २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची छायाचित्रे पाहताना, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी कित्येकांनी राष्ट्रध्वज ‘फडकावण्या’ ऐवजी ‘ध्वजारोहण’ केलेले दिसून आले आहे. खरेतर हा चक्क राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. केवळ सर्वांच्या नजरचुकीने हि गोष्ट कोणाच्याच नजरेत आली नाही, म्हणून हि बाब क्षम्य ठरत नाही.

आणि जर आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याची चूक झाली असेल, तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण नकळत अवमान केलेला आहेत, तो यापुढे होवू देणार नाही, असा निश्चय प्रजासत्ताक दिनी आपल्या राष्ट्रध्वजाला ‘ध्वजवंदन’ करीत असताना आपण करावा.

आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अजूनही सांगण्यासारखे खूप आहे, पण हा दुर्लक्षित असलेला विषय आपणासमोर प्रथम मांडणे गरजेचे वाटले.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

ध्वजारोहण म्हणजे काय? What is Flag Hoisting?

ध्वजारोहण म्हणजे राष्ट्रध्वजाला ध्वजस्तंभावर खालून वर नेऊन उंचावणे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य समारंभात लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज उंचावण्याची परंपरा आहे. यामागे भारताने १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवल्याचे ऐतिहासिक प्रतीक आहे.

ध्वज फडकावणे म्हणजे काय? What is Flag Unfurling?

ध्वज फडकावणे म्हणजे ध्वज आधीच ध्वजस्तंभावर वरच्या बाजूस बांधलेला असताना तो उलगडून (Unfurl) फडकवणे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. हा दिवस भारत प्रजासत्ताक झाल्याचे प्रतीक आहे.

१५ ऑगस्टला ध्वजारोहण का केले जाते?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वज खालून वर उंचावणे हे स्वतंत्र भारताच्या उदयाचे प्रतीक मानले जाते. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणारा हा राष्ट्रीय समारंभ त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो.

२६ जानेवारीला ध्वज फडकावणे का केले जाते?

२६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक बनला. त्या वेळी भारत आधीच स्वतंत्र राष्ट्र होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी ध्वज नव्याने खालून वर उंचावण्याऐवजी वर बांधलेला राष्ट्रध्वज उलगडून (Unfurl) फडकवला जातो. ही प्रक्रिया भारताच्या प्रजासत्ताक म्हणून झालेल्या स्थापनेचे प्रतीक मानली जाते.

Flag Hoisting आणि Flag Unfurling मध्ये काय फरक आहे?

दोन्ही शब्दांचा अर्थ राष्ट्रध्वज फडकवण्याशी संबंधित असला तरी प्रक्रियेत फरक आहे.
Flag Hoisting (ध्वजारोहण): ध्वज खालून वर उंचावला जातो.
Flag Unfurling (ध्वज उलगडणे/फडकावणे): ध्वज आधीच वर बांधलेला असतो आणि तो उलगडला जातो.
भारताच्या राष्ट्रीय समारंभांच्या संदर्भात ही संज्ञा अनुक्रमे १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाशी आणि २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाशी जोडली जाते.

१५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण का करतात?

१५ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस असल्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज उंचावण्याची परंपरा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उंचावला होता. त्यानंतर ही परंपरा कायम आहे.

२६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वज का फडकवतात?

२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला. त्यामुळे या राष्ट्रीय समारंभाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात.

सुचना: ‘Hoisting’ आणि ‘Unfurling’, ही संज्ञात्मक/प्रक्रियात्मक परंपरेतील साधी समजावणी आहे; प्रत्यक्ष सरकारी वर्णनात दोन्ही शब्द कधी कधी वापरले जातात”.

What is Flag Hoisting and Flag Unfurling – लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२१, संपर्क: ८९९९७७५४३९

‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या महाराष्ट्र ‘राज्यगीत’ बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.


Discover more from माझी लेखमाला

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!

Discover more from माझी लेखमाला

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading