blooming lotus flower with green leaves

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ५ – सेकंड चान्स!

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन

भाग ५ : सेकंड चान्स्!

पुण्याच्या कोलंबिया-एशिया हॉस्पिटलला ‘कन्सल्टिंग न्यूरोसर्जन’ म्हणून जॉईन होऊन मला आता ६ महिने झाले होते. गेले काही दिवस बरेच दगदगीचे गेले होते, म्हणून घरच्या सर्वांनी सिनेमा बघायला जायचा बेत आखला होता. संध्याकाळी ८ वाजताच शो होता. ७:४५ ला आम्ही तिकिटे घेऊन थिएटरमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात माझा फोन वाजला. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूम मधून फोन होता. रेसिडेंट डॉक्टर बोलत होते, “सर, पटकन या. दोन पेशंट आलेत. दोघांनाही डोक्याला मार लागलाय आणि दोघेही बेशुद्ध आहेत”.

मी शेजारी बसलेल्या माझ्या पत्नीला फोन आल्याचे सांगितले आणि बाकी कुणालाही न सांगण्याविषयी सूचना केली. मी जायला निघालो तोच त्यांनी माझा हात पकडला व म्हणाल्या, “अहो, आम्ही पण निघतो. तुम्ही तिथं पेशंटसाठी धावपळ करणार आणि आम्ही इथं एन्जॉय करणार हे बरे वाटत नाही”. तोच पलिकडे बसलेल्या माझ्या पप्पाजीना व माँसाहेबांना देखील ही बातमी समजली आणि शेवटी सगळेच बाहेर पडलो. थिएटरपासून हॉस्पिटल अवघ्या १० मिनिटांवरच होते. धाकट्या भावाने गाडी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुम समोर उभी केली.

बाहेर जवळपास १००-१५० लोकांची गर्दी जमली होती. मला बघताच लोकांनी मला वाट करून दिली आणि मी पळतच इमर्जन्सी रुम मध्ये शिरलो. आत बघतो तर ४-५ डॉक्टरांच्या दोन टीम दोन पेशंटना मॅनेज करीत होत्या. मला पाहताच डॉ. रवी प्रताप समोर आले आणि मला केसेस बद्दल माहिती दिली. डॉ. रवी प्रताप हे इमर्जन्सी डिपार्टमेंटचे प्रमुख होते. ते म्हणाले, “सर दोघे सख्खे बहिण-भाऊ आहेत. मुलाचे नाव समीर आणि मुलीचे नाव पूजा आहे (नावे बदलली आहेत). मुलगा २५ वर्षाचा आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला ४ महिन्याची मुलगीही आहे. बहीण २१ वर्षाची आहे. संध्याकाळी दोघेही दुचाकीवरून जात असताना त्यांचा अॅक्सिडेंट झाला. लोकांनी लगेचच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते आणि तेथून दोन ऍम्ब्युलन्स करून त्यांना इकडे घेऊन आलेत. दोघेही बेशुद्ध होते त्यामुळे आम्ही दोघांनाही कृत्रिम श्वासाची नळी बसवली आहे आता दोघेही व्हेंटिलेटरवर आहेत.”

मी पहिल्यांदा जाऊन मुलाला पाहिले, त्याचा एका बाजूचा चेहरा व डोके पूर्ण फुटले होते. डोक्यावरचे कातडे वेडेवाकडे फाटले होते व त्यातून कवटीची तुटलेली हाडे बाहेर आली होती. तेवढ्यात त्यांचे ड्रेसिंग करणाऱ्या डॉक्टरांनी मला जवळ बोलावून दाखविले की, “सर काहीतरी बाहेर येतय जखमेतून!” मी बघितले तर जखमेतून खराब झालेला मेंदू प्रेशरनी बाहेर येत होता. तसेच मेंदूचा काही भाग नाकातून देखील बाहेर आला होता. पण चांगली गोष्ट ही होती की, त्याच्या डोळ्यामधील बुबुळांमध्ये अजूनही हालचाल दिसत होती. त्याचा सी.टी.स्कॅन बघितला तर कवटीची हाडे तुटून मेंदूमध्ये घुसली होती, तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत होता. कवटी, डोळ्यांची खोबण व नाक यांना एकमेकांपासून वेगळी करणारी सर्व हाडे तुटली होती. त्यामुळे मेंदूचा खराब भाग नाकामध्ये देखील उतरला होता. त्याला ऑपरेशनसाठी लागणारी पूर्वतयारी करायला सांगून मी त्याच्या बहिणीला बघायला आलो.

ती देखील बेशुद्ध होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाहेरून फार काही जखमा दिसत नव्हत्या, पण तिच्या एका डोळ्याच्या बाहुलीची हालचाल बंद झाली होती. तिचा सी.टी.स्कॅन बघितला तर तिच्या मेंदूला बऱ्याच ठिकाणी मार लागला होता व रक्तस्त्राव देखील झाला होता. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या ब्रेनस्टेम मध्ये रक्तस्त्राव झालेला दिसत होता.‘ब्रेनस्टेम’ हा मेंदूचा सर्वात मह्त्वाचा भाग असतो. तेथूनच पेशंटचा श्वास आणि हृदयाचे ठोके नियंत्रित केले जातात. मी दोघांनाही आय.सी.यू. मध्ये दाखल करण्यास सांगितले व नातेवाईकांशी बोलायला गेलो.

एकाच वेळी एवढ्या १००-१५० नातेवाईकांशी बोलणे शक्य नव्हते. त्यामुळे मी १०-१२ नातेवाईकांना काऊन्सिलिंग रूम मध्ये बोलावले. त्या मुलाचे काका म्हणाले, “सर, एकाच घराची दोन्ही मुले एकदम गेली बघा! काय पण करा पण दोघांनाही वाचवा. या दोघांना मार लागलेला बघून यांचे वडील तिथेच बेशुद्ध पडले, त्यामुळे त्याना पण जवळच्या हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलंय.” मी त्या दोन्ही मुलांना कशा प्रकारचा मार लागला आहे हे समजावून सांगितलं व म्हणालो, “मुलाला ऑपरेशन करून वाचवू शकतो पण मुलगी वाचेल असे वाटत नाही.” सगळेच माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले. “सर, मुलीला तर फार मार नाही लागला?” मी म्हणालो, “मुलीला बाहेरून मार दिसत नसला तरी आतमध्ये मेंदूच्या मुख्य भागाला मार लागल्यामुळे तिची परिस्थिती नाजूक आहे. तिचे ऑपरेशन करून मेंदूवरचे प्रेशर कमी करता येईल पण त्याचा कितपत फायदा होईल हे नाही सांगता येत!” कुणीच काहीच बोलेना! सर्वजणच फक्त माझ्याकडे हताश होऊन बघत राहिले.

मी तिथून उठलो आणि म्हणालो,”काही काळजी करू नका, मी दोघांनाही वाचवायचा प्रयत्न करतो.” या एका वाक्यावर मात्र सर्वजणच निश्चिंत झाले आणि माझी परीक्षा सुरु झाली.

मी मुलाला ऑपरेशनला घ्यायला सांगितलं. सर्व तयारी झाली आणि मी ऑपरेशन थियेटरमध्ये जाणार तोच सर्व नातेवाईक परत एकदा मला भेटायला आले. “सर, मुलीच्या वाचण्याची शक्यता कमी आहे तर तिचे ऑपरेशन आधी करा प्लीज! मुलाला काही झाले तर आम्ही त्याचा संसार सांभाळू पण आमची मुलगी तर अजून लहान आहे. काहीच जग बघितलं नाही तिनं! तिला आधी वाचवा सर!”

अशा बऱ्याच केसेस एकत्र ज्यावेळी येतात त्यावेळी जो पेशंट वाचण्यासारखा आहे, त्याला आधी वाचवलं जातं. पण नातेवाईक पूजाचं ऑपरेशन आधी करा म्हणून अडून बसले. मी परत त्यांना भरवसा दिला की, “काळजी करू नका! मी तिच्या मेंदूमधले प्रेशर बघतो आहे आणि प्रेशर कमी होण्याची औषधे दिली आहेत. जर औषधांना तिने रिस्पॉन्स दिला तर ऑपरेशन गरज देखील लागणार नाही कदाचित्. तसेच मी एकटा नाही, आमची पूर्ण टीम आहे. गरज पडल्यास दोघांनाही एकत्र ऑपरेशनसाठी घेऊ शकतो.

समीरला ऑपरेशनसाठी घेतले. ऑपरेशनची सर्व तयारी पूर्ण होईपर्यंत १० मिनिटे शांत बसून मी ऑपरेशनचा सर्व आराखडा मनातल्या मनात तयार केला. ऑपरेशन करताना काय अडचणी येवू शकतील त्या लिहून ठेवल्या. तसेच त्या कशा सोडवायच्या या सर्व गोष्टींची तयारी केली. ऑपरेशन सुरु झाले. कपाळाची हाडे फुटून डोळ्यात व मेंदूमध्ये घुसली होती. मी एक एक करत तुटलेली सर्व हाडे बाहेर काढली. मेंदूचा बराचसा भाग खराब झाला होता. रस्त्यावरची माती, खडे, धूळ या सर्व गोष्टी मेंदूमध्ये शिरल्या होत्या. यापैकी थोडी जरी घाण आत राहिली तर इन्फेक्शन होण्याची शक्यता होती म्हणून पूर्ण जखम स्वच्छ धुवून घेतली. मेंदूचा खराब झालेला भाग कापून काढला पण जेवढा शक्य तेवढा भाग वाचवण्याचा प्रयत्न केला.

एवढे ऑपरेशन झाल्यावर मायक्रोस्कोपमधून डोके बाहेर काढून माझा असिस्टंट सूर्याला म्हणालो, “काय वाटतंय तुला?” तो म्हणाला, “सर, ऑपरेशन तर चांगले झाले आहे, आता दुसऱ्या पेशंटला घ्यायचे का? “मी म्हणालो, “नाही अजून ऑपरेशन झाले नाही कारण आपण अजून पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनसाठी काहीच केले नाही. पहिलं म्हणजे नाक आणि मेंदू यांच्या मधले हाड तुटल्याने नाकातले जंतू मेंदूमध्ये जावू शकतात. जर मेंदूला इन्फेक्शन झाले तर पेशंट आपल्या हाताला लागणार नाही.” म्हणून मी नाक व कवटीच्या मधली जागा भरून घेतली व बॅरिअर तयार केला. “दुसरा प्रॉब्लेम असा होता की, मेंदूला एवढा मार लागल्याने हळूहळू मेंदूला सूज येणार आणि त्यामुळे डोक्यातील प्रेशर परत वाढत जाणार हे आपल्याला माहित आहे”, म्हणून मी मेंदूला सूज आल्यावर प्रसरण पावण्यासाठी जागा करून द्यायचे ठरवले व त्या साइडचे कवटीचे बहुतांशी हाड कापून काढले आणि ऑपरेशन बंद केले.

पण मी अजूनही समाधानी नव्हतो.” ते बघून सूर्या म्हणाला, “सर, आणखी काही करायचे आहे काय? तुम्ही काय विचार करताय? “मी म्हणालो, ”सगळं झालं, पण आपल्या मेंदूमध्ये दररोज ५00 मिलीलिटर CSF (पाणी) तयार होतं. ते पाणी जर आपण तयार केलेल्या बॅरिअरमधून खाली नाकात उतरलं तर प्रॉब्लेम होईल, ते ऐकून तो देखील विचारात पडला.

मग मी त्याला म्हणालो, “आपण एक युक्ती करू.” त्यानंतर मी पेशंटच्या पाठीमधून मणक्यामध्ये एक छोटीशी नळी बसवली. त्या नळीचा हेतू हा होता की, मेंदूमध्ये तयार होणारे पाणी या मणक्यातील नळीमधून बाहेर पडावे व डोक्याची जखम कोरडी रहावी. मी त्याला म्हणालो, “सूर्या, ही नळी म्हणजे पेशंटची लाईफलाईन आहे; ही चालू आहे तोपर्यंत पेशंटला काही होणार नाही. यामधून पाणी बाहेर येत राहील ही तुझी जबाबदारी आहे.” त्याने ती जबाबदारी उत्साहाने स्वीकारली. पुढे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करावा लागतो ते बघून सूर्या आता चांगलाच आश्चर्यचकित झाला होता. मी त्याला म्हणालो, “माझे सर डॉ. पालांडे मला नेहमी म्हणायचे, “Neurosurgery is a branch, where you have to think about last step of surgery, when you are doing the first step.” आपणाला पेशंटला वाचवण्याची एकच संधी मिळते. त्यामुळे आपल्या ब्रँचमध्ये कुठलीही कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधीच त्याचा उपाय करायचा असतो. एकदा कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर पुन्हा ते ठीक करणे अवघड असते.

ऑपरेशन संपवून मी पूजाला बघायला ICU मध्ये गेलो. तिथे डॉ. भूषण जोशी माझी वाट बघत होते. डॉ. भूषण जोशी हे खूप डेडिकेटेड न्युरॉलॉजिस्ट होते आणि माझा प्रत्येक पेशंट ते येऊन न चुकता बघायचे. पूजाला आम्ही परत एकदा तपासले. औषधे देवून तिच्या मेंदूमधील प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा फार फायदा झालेला नव्हता. डॉ. भूषण मला म्हणाले, “डॉ. प्रविण, मला वाटतंय आपण ऑपरेशन करून प्रयत्न तरी करून बघू. ब्रेनस्टेमला लागलेल्या मारासाठी आपण काही करू शकत नाही पण ऑपरेशन करून मेंदूवरचे प्रेशर तरी कमी करू शकतो!

मग आम्ही पूजाला ऑपरेशनसाठी घेतले. हे ऑपरेशन देखील अवघड होते कारण, तिच्या मेंदूच्या दोन्ही बाजूला मार लागला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंचे ऑपरेशन एकत्र करणे गरजेचे होते. म्हणून मी दोन्ही बाजूचे कवटीचे हाड एकत्रच काढले. मेंदू अगदी दगडासारखा टणक लागत होता. कारण आतमध्ये प्रेशर खूप होते. आता मेंदूचे वरचे आवरण कापून काढायला सुरुवात केली, त्याला ड्युरामॅटर म्हणतात. हे आवरणदेखील दोन्ही बाजूनी एकत्रच कापले आणि मेंदू बाहेर पडला. पूर्ण मेंदू लाल भडक झाला होता. ठिकठिकाणी रक्तस्त्राव झाला होता आणि खूप सूजही आली होती. पण आता ऑपरेशन नंतर मेंदूला प्रसरण पावण्यासाठी जागा मिळाली होती. प्रेशर कमी झाल्याने मेंदूमध्ये आता हालचाल दिसू लागली. हे बघून सर्वजण खूष झाले. मी सूर्याला म्हणालो, “आपल्या हातात जेवढं होत तेवढं आपण सर्व केलंय, आता बघू देव कशी साथ देतो ते.”

दोन्ही ऑपरेशन व्यवस्थित झाली. दोघांनाही आय.सी.यू. मध्ये व्हेन्टिलेटरवर बेशुद्ध ठेवण्यात आले. मी सर्व नातेवाइकांना बोलावून परत एकदा परिस्थिती समजावून सांगितली. ऑपरेशन्स चांगली झाली असली तरी धोका टळला नसल्याचे सांगितले. आमची धडपड पाहून सर्वजण समाधानी दिसत होते.

ऑपरेशन संपवून मी फ्रेश होण्यासाठी घरी जायला निघालो. बाहेर येवून बघितलं तर माझी कार बाहेरच उभी असलेली दिसली. मी तिथल्या गार्डला विचारले, माझी गाडी इथे कशी? मी तर काल गाडी घेऊन आलो नव्हतो! तो म्हणाला “सर, तुमचे वडील आणि भाऊ काल रात्री पासून हॉस्पिटलमध्येच आहेत.” आता मात्र माझ्या हृदयाचा ठोका चुकला, घरच्या कुणाला काही झाले असेल आणि ऍडमिट केले असेल काय? मी ऑपरेशनमध्ये असल्याने मला सांगितले नसावे काय? असे नाना प्रश्न मनात येऊ लागले. आणि मी पळतच हॉस्पिटलमध्ये गेलो, समोरच वडील आणि भाऊ दिसले. मी म्हणालो, “पप्पाजी काय झाले? तुम्ही इकडे कसे?” पप्पा म्हणाले, “काही नाही, आम्ही सहजच येथे येवून थांबलो होतो.” “म्हणजे?” मी विचारले. पण ते काही सांगायला तयार होइनात. खूप विचारल्यावर ते म्हणाले “काही नाही, काल तुम्हाला इथे सोडून निघलो, त्यावेळी पाहिले की १००-१५० लोक हॉस्पिटलमध्ये तर तेवढेच लोक रस्त्यावर उभे होते. त्यात बाहेर खबर आली की तुम्ही सांगितलंय, “मुलगी वाचणारच नाही अन् मुलगा पण सिरिअस आहे.” एवढ्या २५०-३०० लोकांसमोर तुम्ही एकटे उभे होता. मग आम्हाला घरी चैन पडेना म्हणून दोघेही रात्री इथंच येवून बसलो. मी म्हणालो, “पप्पा हे रोजचंच आहे माझ्यासाठी, कशाला एवढी काळजी करता?  खरंच, ‘बापाच काळीज समजण्यासाठी बापच व्हावं लागतं!’

दोन्ही ऑपरेशन्स व्यवस्थित झाली, पण आमची खरी लढाई इथून पुढे सुरु झाली. दोघांनाही इन्फेक्शन होवू नये म्हणून पूर्ण काळजी घेतली होती. दोघानाही वेगवेगळ्या नर्सेस होत्या. त्या दोघीच पेशंटला हात लावायच्या. इतर कोणालाही पेशंटना लावायला देत नसत. तसेच प्रत्येक वेळी पेशंटला हात लावताना त्या स्वतःचा हात स्वच्छ धुवायच्या. सतत त्यांच्यावर लक्ष होते.

पुढचे २४ तास दोघांनाही बेशुद्ध ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इन्टेन्सिव्हिस्टना त्या दोघांना शुद्धीवर आणण्यास सांगितलं आणि ऑपरेशनसाठी निघून गेलो. ऑपरेशन संपवून संध्याकाळी येऊन बघितं तर काय आश्चर्य! समीर चक्क बेडवर उठून बसला होता. त्याला दाखवण्यासाठी मी नातेवाईकांना आत बोलावले. आय.सी.यू. च्या दारातूनच त्याने नातेवाईकांना ओळखले व हाक मारली, “तात्या!” एवढे मोठे ऑपरेशन होवूनही त्याची बोलण्याची शक्ती व स्मरणशक्ती पूर्ण शाबूत होती. हे बघून सर्वच नातेवाईक खूष झाले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्याने पहिलाच प्रश्न विचारला, “तायडी (बहीण) कुठाय?” या अनपेक्षित प्रश्नाने सगळेच अवाक् झाले. परंतु त्याच्या काकानी त्याची बहिण परीक्षेसाठी बाहेरगावी गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. मी बाहेर आलो. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. सर्वांना मी म्हणालो, ” समीरला वाचवायचं वचन मी दिलं होतं, ते मी पूर्ण केलंय.” आता पूजाकडे बघूया.

चार दिवस उलटून गेले तरी पूजाचा म्हणावा तसा रिस्पॉन्स येत नव्हता. डोळे उघडत होती, पण श्वास पूर्णपणे व्हेन्टिलेटरनेच द्यावा लागायचा. स्वतःचा श्वासच नव्हता तिला. खूप अग्रेसिव्ह मॅनेजमेंट लागणार होती! नाहीतर ती आयुष्यभरासाठी व्हेंटिलेटरवरच राहण्याचा धोका होता. म्हणून मी आमचे इंटेन्सिव्हीस्ट डॉ. श्रीकांत देशपांडे आणि डॉ. अनिल सोनावणे यांच्याशी एकत्रित चर्चा केली आणि एक प्लॅन तयार केला. या प्लॅननुसार आम्ही तिचा व्हेंटिलेटरद्वारा दिला जाणारा श्वास हळूहळू कमी करत यायचो व दोन तासांनी एकदा व्हेंटिलेटर पूर्ण बंद करायचो. यामध्ये खूप मोठी रिस्क होती. पेशंटचा स्वतःचा श्वास चालूच नाही झाला तर! तिचा जीव जाण्याची शक्यता होती! पण आय.सी.यू.ची पूर्ण टीम इरेला पेटली होती. या पेशंटला स्वतःचा श्वास मिळवून द्यायचाच!

पुढचे काही दिवस हेच चालू होते. दरम्यान समीर पूर्ण बरा झाला होता म्हणून त्याला हॉस्पिटल मधून डिश्चार्ज केले गेले. आमचे प्रयत्न बघून नातेवाईकही स्वस्थ बसले नव्हते. ते वेगवेगळ्या देवांना नवस बोलायचे व मला प्रसाद आणून द्यायचे. एकदा देवाचा अंगारा (बुक्का) पेशंटच्या कपाळावर लावायचा आहे म्हणून माझ्याकडे हट्ट धरून बसले. पण आय.सी.यु.मध्ये असे करण्यास परवानगी नसते (इन्फेक्शन कंट्रोल). पण मग मी त्यांच्या समाधानासाठी तिच्या कपाळावर अंगारा लावण्यास परवानगी दिली.

पूजाच्या बाबतीत आमच्या सर्वांच्या प्रयात्नांना हळूहळू यश येवू लागले. ५-६ दिवसांपूर्वी तिला एकदाही श्वास घेता यायचा नाही, आता ती १/२-१ तास श्वास घ्यायला लागली होती पण नंतर लगेचच व्हेंटिलेटर लावावा लागायचा. तरीदेखील आमच्या टीमने हार मानली नाही! आणि १०/१२ दिवसानंतर एक दिवस सकाळी मी आय.सी.यु. मध्ये आलो. श्रीकांत सरांनी मला ती गोड बातमी दिली. ते म्हणाले, “सर काल रात्रीपासून आतापर्यंत ही स्वतः श्वास घेतेय. मी आणि अनिल सर रात्रभर तिच्या शेजारी बसून आहोत!”

आज माझ्या पेशंटला स्वतःचा श्वास परत मिळाला होता! आय.सी.यु.च्या सर्व टीमने खरच खूप कौतुकास्पद काम केले होते. इतके दिवस व्हेन्टिलेटरवर असून देखील तिला कसलेही इन्फेक्शन झाले नव्हते. मी पूर्ण टीमचे आभार मानले. अगदी आनंदाने नाचावेसे वाटत होते! त्याच धुंदीत मी जिना उतरून ओ.पी.डी. कडे चाललो होतो. इतक्यात एक जीन्स, टी-शर्ट घातलेला तरुण मुलगा समोर आला व म्हणाला, “नमस्कार डॉक्टरसाहेब!” मला वाटले पेशंटचा कोणीतरी नातेवाईक असेल म्हणून मी त्याला नमस्कार म्हणालो आणि पुढे आलो, तर पुजाचे नातेवाईक ओ.पी.डी. समोर उभे होते आणि माझ्याकडे बघून हासत होते. ते म्हणाले, “काय साहेब, ओळखले नाही काय त्याला?” मी मागे वळून पाहिले तर तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाऊ समीर होता! माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना.

सर्वजण ओपीडीत येऊन बसले. तो पूर्ण नॉर्मल होता, फक्त कधीकधी त्याला त्याच्या भावना कंट्रोल करता यायच्या नाहीत. मी त्याला विचारले तुझी बहिण कोठे आहे? तो म्हणाला, “ती परीक्षेसाठी मामाकडे गेली आहे. तिकडे मोबाईलला रेंज नसल्यामुळे मला तिच्याशी बोलताही येत नाही आणि हे सगळे मला घराबाहेर पण पडू देत नाहीत. नाहीतर मी माझ्या गाडीवरुन जाऊन तिला भेटलो आसतो आतापर्यंत!”, “डॉक्टर तिची लई आठवण येते”, म्हणून मोठ्याने रडू लागला. चूक त्याची नव्हती मेंदूच्या पुढच्या भागात मार लागल्यामुळे त्याला इमोशन कंट्रोल करायला जमत नव्हते. त्या बिचाऱ्याला काय माहित की, तो जिथ बसलाय त्या ओ.पी.डी.च्या वरतीच आय.सी.यु. मध्ये त्याची बहिण मृत्यूशी झुंज देत आहे!

पुढे २ दिवसांनी पूजाला वार्डमध्ये आणलं गेलं. तिला श्वास अडकू नये म्हणून गळ्यात नळी बसवली होती व अन्न देण्यासाठी पोटामध्ये नळी होती तसेच लघवी साठी सुद्धा नळी होती. आता ती डोळे उघडायची व हातपाय हालवायची पण बाकी फारसा काही रिस्पॉन्स नव्हता. तिचे काका म्हणाले, “सर, आमचा मुलगा पूर्ण बरा झाला आणि मुलगी कमीतकमी जिवंत तरी आहे. हेही आमच्यासाठी पुरेसे आहे. घरी आम्ही मुलीची आयुष्यभर काळजी घेऊ! आता आम्हाला डिस्चार्ज द्या!” मी त्यांच्याकडे बघून हसलो व म्हणालो, “ काका, पूजाला चालता बोलताना बघायचे नाही काय तुम्हाला?” सगळ्यांनाच आश्चर्य वाटले, “म्हणजे पूजा यापेक्षाही बरी होईल? चालायला बोलायला लागेल?” मी म्हणालो, “का नाही! आता ती मृत्यूला हरवून इथपर्यंत आली आहे. एका एका श्वासासाठी झगडली आहे! तर बोलणार का नाही? काळजी करू नका! मी अजून हार मानलेली नाही.

इथून पुढे आपल्याला तिला ऑक्सिजन थेरपी द्यायची आहे! बघूया काय फरक पडतो ते? ती थेरपी माझ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्याने मी त्यांना दुसऱ्या सेंटरचा पत्ता दिला व तिथे जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी पूजाला तिकडे शिफ्ट केले गेले आणि पुढचे १० दिवस ऑक्सिजन थेरपी सुरु झाली. तसं बघितलं तर या थेरपीचा तिला किती फायदा होईल, याविषयी माझ्या मनात थोडी शंका होती. पण तिसऱ्याच दिवशी मला काकांचा फोन आला. “सर, ऑक्सिजन थेरपीचा उपयोग होतोय. माझी मुलगी आज स्वतःहून पालथी झाली. लहानपणी ४ महिन्यांची असताना पहिल्यांदा ती स्वतःहून पालथी पडायला लागली होती, त्या वेळची आठवण झाली बघा!” पुढे १० सेशनमध्ये तिच्यात बराच फरक पडला. रोज मला तिचा व्हिडिओ काढून पाठवला जायचा आणि काही गरज असेल तर मी इथूनच सूचना द्यायचो.

मध्ये दोन आठवडे गेले असतील. आज सोमवार होता. सकाळी मी हॉस्पिटल मध्ये आलो. पूजाचे नातेवाईक मला भेटायला आले होते. त्यांना बघून मला फार आनंद झाला. आज ते पूजा आणि समीरच्या वडिलांनाही घेऊन आले होते. वडील म्हणाले, “सर, मला तुम्हाला फक्त एकदा बघायचे होते म्हणून आलो.” तोपर्यंत एकजण म्हणाले, “सर, तुमची पेशंट ओपीडी मध्ये तुमची वाट बघत आहे”. “काय, पूजा आली आहे!” असे बोलत मी पळतच आत गेलो. तिला बघण्याची खूप उत्सुकता होती. तिला बघून विश्वासच बसेना. पूजा माझ्यासमोर खुर्चीत बसली होती आणि मी काय म्हणत होतो ते तिला सर्व समजत होते. विशेष म्हणजे तिने मला ओळखलं! ती म्हणाली, “प..र..वी..न सररर…” इतक्यात समीरला आत आणलं गेलं. त्याने आज ॲक्सिडेंटनंतर पहिल्यांदाच तिला पाहिलं असावं. बहिणीला त्या अवस्थेत बघून तो तिथंच रडायला लागला. आता त्याला कळलं होतं की, त्याच्या बरोबर त्याच्या बहिणीचाही अँक्सिडेंट झाला होता आणि ती परगावी परीक्षेसाठी गेली नसून हॉस्पिटलमध्ये अॕडमिट होती.

पूजाच्याही डोळ्यातून पाणी येत होत. तिनं हळूच हात उचलला व त्याच्या तोंडावरून फिरवला आणि म्हणाली, “दादा…, लागले का तुला?” आता मात्र सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. अगदी मोठी माणसंही हुंदके देऊन रडू लागली. स्वतः मृत्यूशी झुंज देऊन बाहेर आलेली बहीण आज भावाला विचारत होती की, ‘तुला लागलं का?”

रुममधलं वातावरण बघून मला देखील डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही, म्हणून मला फोन आल्याचं नाटक करत मी तिथून बाहेर पडलो आणि पळतच बाथरूम मध्ये गेलो. “पेशंट समोर डॉक्टरनी कधीच कमजोर पडायचं नसतं.” म्हणून मी डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं. तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो. देवाच्या चरणी नतमस्तक झालो आणि दोन्ही पेशंटना सेकंड चान्स् दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

खरंच, आपण जर पूर्ण जिद्दीने पेशंटला वाचवण्यासाठी धडपड केली, तर देव आपल्याला मदत करतोच! तो कुठल्या रुपात येईल व कशी मदत करेल हे सांगता नाही येत! पण तो येतो! आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी त्याला बोलावतो!

आज एका महिन्याभराची लढाई आम्ही जिंकली होती. काय वाटलं असेल त्या बापाला, आपली दोन्ही मुलं सहीसलामत घरी घेऊन जाताना! खरच पेशंटला बरं होऊन हसत घरी जाताना बघण्यासारखे दुसरं सुख नाही!

लेख सर्वाधिकार: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे. 7738120060


Dr. Pravin Survashe
डॉ. प्रविण सुरवशे

कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे
pravinsurvashe97@gmail.com

डॉ. प्रविण सुरवशे यांनी लिहिलेले अन्य लेख:

भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

भाग २ : एक दिवसाची सुट्टी !

भाग ३ : ससून मधील अननोन!

भाग ४: ती २७ मिनिटे…


डॉ. प्रविण सुरवशे यांच्या ब्लॉगला भेट द्या


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
लेख सर्वाधिकार::  more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply