Neurosurgeon in Sassoon Hospital Pune

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३

(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन

भाग ३ : ससून मधील अननोन!

अननोन पेशंट

अननोन म्हणजे अनोळखी! ज्या पेशंटची काहीही ओळख पटत नाही त्याला अननोन म्हणतात. कधीकधी वॉर्डमध्ये असे बरेच अननोन पेशंट ऍडमिट असतात. अशावेळी त्याना अननोन १, २, ३ असे संबोधले जाते.

मला ससूनला सर्जरी रेसिडेंट म्हणून जॉईन होवून एखादा महिना झाला असेल. माझा शनिवारचा कॉल सुरु होता आणि मी ओपीडी संपवून वॉर्डमध्ये ॲडमिट झालेले पेशंट तपासत होतो. इतक्यात कॅज्युअल्टीमधून फोन आला. “सर,लवकर कॅज्युअल्टीमध्ये या. पोलिस एका अननोन पेशंटला घेवून आले आहेत.”

मी कॅज्युअल्टीमध्ये जाऊन बघितलं तर पोलिस एका माणसाला घेऊन आले होते. मी पोलिसांना विचारलं की नेमकं याला काय झालंय? ते म्हणाले, “सर हा भिकारी असून आम्हाला रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. म्हणून आम्ही त्याला उचलून इकडे घेऊन आलो.”

मी जवळ जावून बघितलं तर त्याच्या केसांच्या जटा झालेल्या, दाढी छातीपर्यंत वाढलेली, हाता पायांच्या काड्या झालेल्या आणि पोट खपाटीला टेकलेलं. अंगाचा एवढा घाण वास सुटला होता की त्या खोलीत श्वास घेणं अशक्य झालं होतं. पोलिसांनी आपल्या तोंडावरती रुमाल बांधले होते तर सिस्टर व डॉक्टरनी तोंडावरती चक्क दोन दोन मास्क चढवले होते.

मला त्याला तपासायला कुठून सुरुवात करावी हे समजेना! तो अर्धवट शुद्धीवर होता व असंबद्ध बडबड करत होता. वॉर्डबॉयने त्याची पँट काढल्यावर आमच्या लक्षात आले की त्याच्या उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली कसलेतरी कापड गुंडाळले होते आणि त्या कापडामधून पस टपकत होता. सगळा घाण वास तिथूनच येत होता. मी हळूहळू ते कापड सोडायला सुरुवात केली. जसा त्या कापडाचा शेवटचा भाग ओढून काढला तसा त्याच्या पायाच्या जखमेतून मूठभर आळ्या बाहेर पडल्या.

सहसा जखम जर उघडी राहिली तर माशा या जखमेमध्ये अंडी घालतात. या अंड्यामधून आळ्या बाहेर पडतात आणि जखमेमध्येच वाढतात.

मी त्या सर्व आळ्या काढल्या व एका सलाइनच्या बाटलीत भरल्या. आता जखमेच्या आतमध्ये दडून बसलेल्या आळ्या काढणे गरजेचे होते. मग मी त्या जखमेवर थोडे टरपेंटाइन टाकले, तसे पायामधून एकएक अळी बाहेर येवू लागली. जसजशी मी एक एक आळी ओढून बाहेर काढायचो तसतसा तो पेशंट “अच्छा लग रहा है. और निकालो.” असे म्हणायचा. साधारणपणे २०० ते २५० आळ्या वेचून बाहेर काढल्या असतील. एवढ्या आळ्या २४ तास त्याच्या जखमेमध्ये वळवळ करायच्या. किती यातना होत असतील त्याला, याची कल्पना सुद्धा करवत नाही. त्याच्या जखमेभोवतीच्या बहुतांश मांसपेशी कुजल्या होत्या. नाही म्हणायला वरची कातडी आणि आतली हाडे तेवढी शिल्लक राहिली होती. तेवढयात माझे सिनिअर लेक्चरर आले आणि त्या पेशंटची जखम बघून मला म्हणाले, “हाडापर्यंत जंतुसंसर्ग पसरला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाय कापून काढावा लागेल असे वाटते!

पण मी म्हणालो, “सर आधीच तो भिकारी अन् त्यात त्याचा पाय काढला तर किती अवघड होईल! मी प्रयत्न करतो त्याचा पाय वाचवण्याचा.” त्यावर सरांनी अनुमती दर्शवली.

ड्रेसिंग झाल्यावर मी त्याला वॉर्डमध्ये घेऊन आलो. वॉर्डमध्ये त्याला सगळ्यात शेवटचा बेड दिला. सिस्टर मला म्हणाल्या की, “प्रविण सर, या पेशंटच्या रक्ताच्या चाचण्या करुन घ्या. २० वर्षाचा अनुभव आहे माझा. बहुधा असे सगळे अननोन पेशंटस् एड्सग्रस्त आणि ड्रग ॲडिक्ट असतात.”

आता मात्र मी पण चिंतेत पडलो. लगेचच रक्त तपासणीसाठी पाठवलं आणि सिस्टरांचा अंदाज खरा ठरला! तो HIV बाधित होता. मी त्याला बाकी पेशंट पासून वेगळे ठेवले (आयसोलेशन). त्याला सर्वात चांगली औषधे सलाइन मधून द्यायला सुरुवात केली. त्या पेशंटमुळे इतरांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ड्रेसिंगची वेगळी ट्रॉली तयार केली. पण त्याचे ड्रेसिंग करणे हेही एक दिव्य काम होते. मी हातामध्ये दोन दोन हातमोजे व तोंडावर दोन दोन मास्क घालायचो, आणि पूर्ण अंगावर दोन प्लास्टिकचे गाऊन घालून ड्रेसिंगला सुरुवात व्हायची. असे दिवसातून दोन वेळा ड्रेसिंग करायचो आणि दरवेळी जखमेत राहिलेल्या आळ्या काढायचो.

४-६ दिवसानंतर जखमेमधून आळ्या निघणे बंद झाले आणि पेशंटच्या स्थितीमध्ये सुधारणा होवू लागली. पण आता नवीनच प्रॉब्लेम सुरु झाला होता. तो खरोखरच ड्रग ऍडिक्ट होता. जसजसा तो शुद्धीवर येवू लागला तसतसा तो मला ड्रेसिंग करु देइना आणि ड्रग्स मिळत नसल्याने चिडचिड करु लागला. ड्रेसिंग करायला लागलो की तो मला शिव्या द्यायचा. माझ्या पूर्ण खानदानाचा उद्धार करायचा. सुरूवातीला मला राग यायचा पण नंतर मी हळूहळू त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. तो रोज माझ्यासाठी वेगवेगळ्या शिव्या शोधून काढायचा. काहीकाही शिव्यांचे अर्थ तर मलाही समजायचे नाहीत. आता आमच्यामध्ये एक स्पर्धाच सुरु झाली होती जणू! मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला लाथा मारायला सुरुवात केली. पण मी देखील हार मानली नाही. मी आता ड्रेसिंगला सुरुवात करायच्या आधी त्याचे हातपाय बांधून ठेवायचो. आता मात्र त्याने शेवटचं अस्त्र काढलं. तो आता ड्रेसिंग करत असताना मध्येच उठायचा आणि माझ्या अंगावर थुंकायचा. पण मी त्यावर देखील उपाय शोधला. एव्हाना वॉर्डमधल्या सर्वांना कळून चुकले होते की, मी एखाद्या पेशंटला बरं करायची जबाबदारी घेतली तर, मी त्या पेशंटसाठी काहीही करु शकतो.

आता महिन्याभरात जखम छान भरुन आली होती. आमच्यात सुरु असलेली स्पर्धा मीच जिंकणार असे दिसू लागले होते. त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे होते म्हणून मी दोन चार स्वयंसेवी संस्थांना फोन करुन बोलावून घेतले. पण त्याला आपल्या बरोबर घेवून जायला कोणीही तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की, हा पेशंट ड्रग अॕडिक्ट आहे आणि दोन दिवस देखील तो सुधारगृहात थांबणार नाही. लगेच पळून जाईल!

त्याचदरम्यान माँसाहेबांनी फोन करुन मला आठवण करुन दिली की, माझ्या चुलत बहिणीचं लग्न ४ दिवसांवर आलं आहे आणि लग्नासाठी मला नवीन ड्रेस घ्यायचा होता. मग मी दुसऱ्याच दिवशी दोन मित्रांना बरोबर घेतले आणि ससूनच्या समोरच एका कपड्याच्या दुकानात गेलो. अवघ्या ५ मिनिटांत त्यांनी माझ्यासाठी सुंदर ड्रेस पसंत केला. आयुष्यात पहिल्यांदाच एवढे महागडे कपडे घेतले असतील. कपडे घेवून रुमवर आलो आणि नवीन ड्रेस घालून मित्रांसोबत फोटो काढले.

तेवढयात वॉर्डमधून फोन आला. सिस्टर म्हणाल्या, “सर, लवकर वॉर्डमध्ये या. तो अननोन पेशंट वॉर्डमधून पळून जायचा प्रयत्न करतोय.” वॉर्डमध्ये जावून बघितलं तर त्या पेशंटला दोन वॉर्डबॉयनी पकडून ठेवलं होतं. ते म्हणाले, “सर, हा बाहेर रस्त्यापर्यंत गेला होता. तिथून पकडून आणलं याला.’

सिस्टरनी मला सांगितलं की, “सर, आज दुपारी व्यसनमुक्ती केंद्रातून काही लोक आले होते. ते या पेशंटला घेऊन जायला तयार आहेत. पण याला जेव्हापासून हे समजले तेव्हापासून हा पळून जायचा प्रयत्न करतोय. तसेच त्या अननोनला आपण हॉस्पिटलच्या कपड्यामध्ये डिश्चार्ज करु शकत नाही. तुम्ही तुमचे जुने कपडे त्याच्यासाठी दिले तर बरे होईल!” मी देखील ठीक आहे म्हणून सांगितलं.

दुसऱ्या दिवशी मी आंघोळ करत असतानाच नेमका वॉर्डबॉय माझ्या रुमवर कपडे मागायला आला. मी बाथरूम मधूनच त्याला म्हणालो, “बेडवर पडलेला एखादा ड्रेस घेऊन जा.” नंतर सर्व आवरुन मी ऑपरेशनसाठी गेलो.

संध्याकाळी वॉर्डमध्ये आलो तोच सिस्टर म्हणाल्या, “सर, सकाळी व्यसनमुक्ती केंद्रातले लोक आले होते, पण त्यांना बघून तो अननोन पेशंट पळून गेला. आम्ही सर्वजण अगदी रेल्वे स्टेशनपर्यंत शोधून आलो, पोलिसांनी देखील शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही.”

वॉर्डबॉय म्हणाला, “सर, पण तुम्ही दिलेले कपडे घातल्यावर काय मस्त दिसत होता तो. तुम्ही बघायला पाहिजे होतं त्याला!” काही का असेना तो पेशंट बरा होवून गेल्यामुळे सर्वजण खूष होते.

माझा महागडा नविन ड्रेस

दुसऱ्या दिवशी माँसाहेबांनी परत फोन करुन संध्याकाळी लग्नाला येण्याची आठवण करुन दिली. मी सर्व कामे आवरली आणि रुमवर पोहचलो. चार दिवसापूर्वी नवीन ड्रेस बेडवर टाकून गेलो होतो. आता तो ड्रेस कुठेच दिसत नव्हता. म्हणून मित्रांना फोन करून विचारलं, तर कुणालाच काहीच माहित नव्हतं. मग मात्र मला जुनाच ड्रेस घालून जावं लागलं.

पुढचे दोन दिवस मी सगळीकडे शोध घेतला पण ड्रेस कुठेच सापडला नाही. एव्हाना सर्वांना माहित झालं होतं की माझा महागडा नविन ड्रेस रुमवरून चोरीला गेला आहे.

आठवडाभर निघून गेला असेल. मी आता सर्व विसरून कामाला लागलो होतो. एक दिवस असाच वॉर्डमध्ये काम करत बसलो असताना माझे ते दोन मित्र वॉर्डमध्ये आले. ते माझ्याकडे बघून मोठमोठयाने हसत होते.

मी त्यांना विचारले, “का हसताय? मला पण सांगा.”

दोन मिनिटे हसून झाल्यावर त्यातला एकजण म्हणाला, “प्रविण, तुझा तो चोरीला गेलेला नवीन ड्रेस कुठे आहे माहिती आहे का? तुला ड्रेस पाहिजे असेल तर आमच्याबरोबर यावं लागेल!” मी लगेचच त्यांच्याबरोबर जायला तयार झालो.

आम्ही गाडी घेऊन ससूनच्या बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या व्हिक्टरी थिएटर समोर आलो. ते म्हणाले, “तुझा ड्रेस इथच कुठेतरी आहे, शोधून बघ!” मी चौफेर नजर टाकली आणि अचानक माझा ड्रेस मला दिसला. तो चोर चक्क माझा नवीन ड्रेस घालून गटारीच्या शेजारी झोपला होता. मी हालवून त्याला उठवले तसा तो गर्रकन मागे वळला. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून माझा तो अननोन पेशंटच होता. मग माझ्या लक्षात आले की माझा नवीन ड्रेस चोरीला गेला नसून वॉर्डबॉयने चुकून तो अननोन पेशंटला दिला होता. मी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्याकडे अशा नजरेने बघत होता, की जणू काही आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहोत.

आता मला कळून चुकले होते की, तो परत ड्रग्सच्या आहारी गेला असून त्याच्या जगात आपल्याला काहीही स्थान नाही. मी त्याची पँट वर करून बघितली तर त्याने परत त्या जखमेवर कुठलेतरी घाणेरडे कापड बांधले होते आणि त्यातून पस टपकत होता. जखमेभोवती माशा घोंगावत होत्या आणि जखमेमध्ये अंडी घालण्याची तयारी करत होत्या.

आता मात्र उशिरा का होईना मला समजले होते की, तो जिंकला होता …आणि मी हारलो होतो!

लेख सर्वाधिकार: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे. 7738120060


Dr. Pravin Survashe
डॉ. प्रविण सुरवशे

कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे
pravinsurvashe97@gmail.com

डॉ. प्रविण सुरवशे यांनी लिहिलेले अन्य लेख:

भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

भाग २ : एक दिवसाची सुट्टी !

भाग ४: ती २७ मिनिटे…


डॉ. प्रविण सुरवशे यांच्या ब्लॉगला भेट द्या


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
लेख सर्वाधिकार::  more...

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply