Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग १
(Making of a Neurosurgeon) मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन
भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती !
गोष्ट त्या वेळची आहे ज्या वेळी मी पुण्याच्या ससून रूग्णालयात नुकताच NEUROSURGEON सर्जरी रेसिडेंट (शिकाऊ डॉक्टर) म्हणून जॉईन झालो होतो. पुण्याचे ससून रुग्णालय म्हणजे रुग्णांची पंढरीच जणूं! मला जॉईन होऊन १५-२० दिवसच झाले असतील. माझे डिपार्टमेंटला जॉईन होणे हेही दिव्यच होते. अजूनही आठवतो तो जॉईनिंगचा दिवस. संध्याकाळची वेळ असेल. मी हातात दोन बॅग व पाठीवर एक सॅक असा वॉर्ड नंबर ८ मधे शिरलो. इथून पुढे तीन वर्षे मला वॉर्ड नंबर ८ आणि १२ सांभाळायचे होते. सिनिअर डॉक्टरनी स्वागत केले व आपुलकीने विचारपूस केली. चहा घेऊन झाल्यावर सर म्हणाले, ‘बाहेर जाऊन समोरच्या दुकानातून आंंघोळीचे व इतर साहित्य घेऊन ये, कारण यानंतर बाहेर कधी पडायला मिळेल हे सांगता येत नाही.’ मनात विचार आला की, ‘खरंच एवढे काम असेल का?’ आणि खरंच, ते म्हणाले तसच झालं. इतकं काम होतं की यानंतर पुढची पहिली आंघोळ करायला मला दहा दिवस लागले.
असो, तर मी १५-२० दिवसांत चांगलाच रुळलो होतो. एक दिवस संध्याकाळचा वॉर्ड राऊंड आटोपून मी राहिलेली कामे करत होतो. तोच माझे ३-४ सहकारी मित्र मला भेटायला आले आणि बाहेर जेवायला जाऊया म्हणाले. ज्या हॉटेलमध्ये जाणार ते हॉटेल ससूनच्या समोरच रस्त्याच्या पलिकडे होते. हॉटेल जवळच असल्याने मी देखील त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार झालो.
सिस्टरना लक्ष ठेवायला सांगून आम्ही बाहेर पडलो तोच खाली आल्यावर माझ्या लक्षात आले की, माझा मोबाइल फोन वॉर्डमध्येच विसरला आहे. मी मित्रांना म्हणालो की मी पटकन जाऊन फोन घेऊन येतो. पण ते सर्व जण म्हणाले की आपण थोड्याच वेळात परत येऊ, कशाला आता तेवढयाकरता परत जातोस? तसेच फोन सिस्टरच्या टेबलवर चार्जिंगला लावलेला असल्याने तो चोरीस जाण्याची शक्यता नव्हती. पण मला काही तरी चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. म्हणून मी मित्राना सांगितले की तुम्ही पुढे जाऊन ऑर्डर करा तोपर्यंत मी पटकन फोन घेऊन येतो.
जसा मी वॉर्ड मध्ये शिरलो तसा समोरून वॉर्डबॉय धावत आला आणि म्हणाला, “काय साहेब, कुठे गेले होते? सिस्टर कधीपासून तुम्हाला फोन करताहेत.पेशंट सिरिअस झाला आहे”. मलाच समजेना की मला वॉर्डमधून जाऊन मोजून १० मिनिटे देखील झाली नसतील. निघण्याआधी तर सर्व पेशंट स्टेबल होते. मग आता असे काय घडले? मी आत जाऊन बघितले तर ११ नंबरचा पेशंट सिरिअस झाला होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. तो मला हाताने इशारा करून खुणवत होता, की माझा श्वास बंद पडतो आहे! त्याची बायको शेजारी भेदरलेल्या अवस्थेत मला सांगत होती की आत्ता 10 मिनिटापूर्वी ते आमच्याशी चांगले बोलत होते आणि अचानक असे काय झाले?
सिस्टरनी तोपर्यंत इमर्जन्सी ट्रॉली तयार केली होती. मी पटकन तरी लॅरिंगोस्कोप घेतला व इंट्युबेशनसाठी तयार झालो (इंट्युबेशन – यामध्ये कृत्रीम श्वासाची नळी श्वास नलिकेमधे टाकून कृत्रिम ऑक्सिजन पेशंटला दिला जातो). इतक्यात माझे लक्ष पेशंटच्या ICD (Intercostal Drain) कडे गेले. (ICD- एक कृत्रिम नळी जिचे एक टोक छातीमधे असते व दुसरे टोक बाहेर काढून पाण्याच्या पिशवीमध्ये सोडलेले असते). छातीला मार लागलेल्या पेशंटला ही नळी बसवली जाते. त्यामुळे छातीमध्ये साठणारे रक्त पिशवीत जमा होते व पेशंटचा श्वास सुरळीत चालतो. या पिशवीमधे अर्धे पाणी भरलेले असते. जेणेकरुन हवा उलटी छातीमधे जाऊ नये. मी लक्षपूर्वक बघितले तर ती पिशवी रिकामी दिसत होती. हे पाहून मी सिस्टरनां जोरात ओरडलो. “पिशवीतले पाणी गेले कुठे?” सिस्टरनां देखील समजेना. पण त्यांनी लगेचच दुसरी सलाइनची बाटली फोडली आणि माझ्या हातात ठेवली. मी ते पाणी पिशवीत भरले. हळूहळू ICD ट्युबमधे हवेची हालचाल दिसू लागली. पुढील दहाबारा मिनिटांत तो पेशंट सेटल झाला व शांतपणे श्वास घेऊ लागला.
या पूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. जणू काही तो मला सांगायचा प्रयत्न करीत होता की, “डॉक्टर, मला एवढया लवकर मरू देऊ नका. बायको आणि तीन मुले आहेत, त्यांना उघड्यावर टाकून नाही जाऊ शकत”. मुले बिचारी अजूनही कावरीबावरी होऊन माझ्याकडे बघत होती. पेशंटचा जीव वाचला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मी त्याच्या हातातून माझा हात सोडवला व बाजूला झालो. अशा अवस्थेत देखील तो उठून माझ्या पाया पडण्याची धडपड करत होता. मी त्याला शांतपणे पडून रहाण्यास सांगितले. त्याच्या एका लहान मुलीला उचलून घेत मी म्हणालो की, “ठीक आहेत तुझे बाबा, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही!”
त्यानंतर मी दोन्ही सिस्टरनां व वॉर्डबॉयनां थोडे बाजूला घेऊन विचारले की, “त्या पिशवीतले पाणी कुणी काढून टाकले?” पण कुणालाच माहिती नव्हते. तसेच ते सर्वजण खूप अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडून अशी चूक होणे शक्य नव्हते. किंबहुना वॉर्डमधील बरीचशी कामे या सर्वांकडूनच मी शिकत होतो. मग मी त्या पेशंटच्या बायकोला विचारले की नक्की काय झाले होते ? तिने मला भीत भीत सांगितले की पिशवीतले पाणी तिने स्वतः काढले होते.
“असे का केले?” विचारले असता ती म्हणाली, “साहेब, मला वाटले की ती लघवीची पिशवी आहे, म्हणून मी लघवी समजून ते पाणी ओतून दिले.”
मग मात्र मी तिच्यावर ओरडलो की, “आम्ही सर्व पेशंटच्या नातेवाईकाना एवढं ओरडून सांगत असतो की, पेशंटच्या कुठल्याही नळीला हात लावू नका, तरीही तू असे का केलेस?”
ती म्हणाली, “साहेब, ते वॉर्डचे मामा बिचारे एकटेच काम करत असतात. त्यांना मदत करावी म्हणून मी ते काम केले”.
मी जेव्हा तिला सांगितलं की तिच्या चुकीमुळे आज तिचा नवरा जीवाला मुकला असता तेव्हा मात्र ती खालीच बसली आणि म्हणाली, “साहेब आज मी माझ्याच धन्याचा जीव घेतला असता. सगळं होत्याच नव्हतं झालं असत. माझ्या मुलांना मी काय सांगितल असत, की तुमच्या बापाला मी मारलं म्हणून!” मग आम्ही सर्वानी तिची समजूत घातली.
इतक्यात माझ्या मित्राचा फोन आला, “कधी येतोयस?, आम्ही जेवण सुरू केलं आहे”. सर्व ठीक आहे हे बघून मी सिस्टरनां सांगून जेवायला निघालो. यावेळी मोबाइल बरोबर होता. मनातल्या मनात मी देवाचे आभार मानले. बरं झालं फोन विसरलो. नाहीतर मी कदाचित वेळेवर पोहोचलो नसतो. खरंच ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती‘.
मी हॉटेलमध्ये पोहोचलो तोच माझा मित्र मला म्हणाला “बघ मी म्हणालो होतो नां, १५ -२० मिनिटांत काही नाही होत. उगीचच गडबड केलीस. नसता गेलास तरी चाललं असतं”.
मी मनात विचार केला,आता याला कसं सांगू, की ‘या १५-२० मिनिटांत मी एका पेशंटला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलंय’ म्हणून.
लेख सर्वाधिकार: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे. 7738120060
डॉ प्रवीण सुरवसेंचे लेख म्हणजे ज्ञान आणि अनुभव यांची पर्वणी. पुढचे लेख वाचायला आतुर आहोत.