Shingroba Temple in Khandala Ghat

माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २

सुट्टी संपली – चला मुंबईला परत – भाग २

त्यांनतर यायचे तळेगाव दाभाडे. तेथील बस स्थानकावर बसगाडी थांबल्यावर आम्ही जेवत असू. तोवर दुपारचे दोन वाजले असत. आता गाडी चालू झाली कि व्हायचा मुंबईच्या प्रवासाचा तिसरा टप्पा. आता पुढे ….

तळेगाव दाभाडेहून बस निघाली कि गावाच्या बाहेर मुंबई पुणे हमरस्ता लागायचा. तेथून पुढे मग गाडीचा वेग वाढायचा. गावाकडच्या रस्त्याच्या तुलनेत गुळगुळीत आणि खड्डे विरहीत डांबरी रस्त्यावरून गाडी धावू लागली कि मजा यायची. बाजूच्या गाड्या सुळकन यायच्या आणि जोरात आवाज करू येजा करायच्या, ते पाहताना मजा यायची. गावाकडच्या रस्त्यासारखे आचके गचके बसायचे नाही, पण अख्खी बसगाडी वेगामुळे थरथरायची. खिडक्या आणि दरवाजा आता तुटून पडतील कि काय अशी भीती वाटायची. गाडीच्या थरथरण्यामुळे कानाचे दडे बसायचे. यातच आता बसमध्ये उलटी, ओकारीचे सत्र सुरु व्हायचे. कोणी उलटी केली तर त्याला बस लागली असे लोकं म्हणायची. आता हि बस त्यांना लागते कशी, मी सुद्धा बसमध्ये असून मला कशी बस नाही लागली याचा विचार आणि आश्चर्य मी करत असे. पुढे कामशेत गावी रेल्वेचे रूळ दिसायचे आणि त्याला लागून इंद्रायणी नदीच्या पात्राचे सुंदर दृश्य दिसायचे.

मग थोड्याच वेळात लोणावळा (Lonavala) स्थानकावर बस पोहोचे. लगेच गाडीच्या भोवती फेरीवाल्यांचा गराडा पाडायचा. मगनलाल लोणावळा चिक्कीच्या नावाने अनेकजण विविधरंगी पाकिटे घेवून गाडीत घुसायचे. त्याच्या मागोमाग थंडगार फेसाळलेल्या उसाच्या रसाचे ग्लास भरलेला छोटा क्रेट घेवून दुसरा चढायचा. काही गरीब दिसणारे, मोजकेच किरकोळ वस्तू म्हणजे शेंगदाणे, चणे, लिंबाच्या गोळ्या विकणारे खिडकीच्या खालून माल खपवण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांच्यापेक्षाही गरीब दिसणाऱ्या, मळक्या रंगाचे लुगडं गुढघ्यापर्यंत वर खेचलेले, नाकात नथ घातलेली म्हातारी किंवा तरुण स्त्री डोक्यावरील किंवा हातातील टोपलीमध्ये रानमेवा घेऊन विकायला आलेली असे. पळसाच्या पानांचे लहान लांबट त्रिकोणी द्रोण भरून त्यात करवंदं, जांभळे, बोरं, क्वचितच चिकूसारखी दिसणारी आळूची फळं, रुपायाला एक वाटा गाडी भोवती फिरायची.

लोणावळ्याहून गाडी निघाली कि गावाच्या बाहेर डाव्या बाजूने रेल्वेमार्ग गाडी रस्त्याबरोबर बराच वेळ धावे अन पुढे रस्त्याशी फारकत घेवून दिसेनासा व्हायचा. खंडाळा गावात गाडी शिरली कि उजवीकडे दरीचे पहिले दर्शन व्हायचे. त्याच्या पुढे राजमाची पॉइंटला बस मिनिटभर थांबून हजेरी लावत असे. पुढे वाघजाई मंदिराकडे जाणाऱ्या वाटेपासून पहिला उतार सुरु व्हायचा. गाडीचा गिअर बदलून गाडी उताराला लागली कि गाडीचा आवाज पण बदलायचा. उतारावरच्या वळणावर कचकच आवाज करीत ड्राइवर गाडीचे ब्रेक लावायचा, कि पोटात भीतीचा गोळा यायचा. आता जर ड्राइवर चुकला तर गाडी कशी आणि कुठल्या बाजूला खाली कोसळेल ह्या वाईट विचाराने आजूबाजूला निरीक्षण सुद्धा करायचो. उताराहून खाली आलो कि डाव्या बाजूला दिसे तो नागफणीचा उंच कडा, त्याची भव्यता पहात असतानाच डोंगराच्या पोटातून एखादी आगगाडी येताना दिसे, त्याच्याच वरच्या बाजूला टाटा वीज कंपनीचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपाच्या रांगा दिसत हे, लँडस्केप पहाता असतानाच बसगाडी सुप्रसिद्ध ‘अमृतांजन’ बोगद्याखालून वळण घ्यायची तेव्हा त्या पुलाची उंची पाहून धडकी भरायची, हा पूल आताच जर आपल्या गाडीवर कोसळला तर? असे भीतीदायक विचार मनात येत. एव्हाना घाटातील आल्हादायक थंडगार हवा जाणवायला लागायची. हि थंड हवा न मानवणारी अन खिडकीच्या बाजूची जागा पकडण्यासाठी भांडणारी काही मंडळीची मात्र झोपमोड व्ह्यायची, मग ती मंडळी लगेचच खिडकी बंद करून घेऊन पुन्हा डोळे मिटून स्वप्न पाहण्यात दंग होत. अशा लोकांना गाडीतून खाली उतरवले पाहिजे असा सरकारने नियम करावा, आणि त्यासाठी एखादा पोलीस प्रत्येक गाडीमध्ये असावा असे स्वप्नरंजन मी करायचो.

घाटातील मोठमोठी वळणे, उतार संपवून गाडी शेवटच्या उताराला आली कि गाडीत जरा खळबळ उडे. उजव्या बाजूला बसलेली काही माणसे उठून उभी राहत, जो तो आपापल्या खिशात हात घालून पाच, दहा, वीस, पंचवीस असे पैसे बाहेर काढून हातात तयार ठेवी. माझी आजी कमरेच्या पिशवीत हात घालून दोन तीन नाणी काढून माझ्या हातात ठेवी. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत असे. तोपर्यंत बसचा वेग चांगलाच कमी व्हायचा. डाव्या बाजूला छोटेसे रंगीत देऊळ दिसायचे. सर्वजण हातातले पैसे देवळाच्या दिशेने फेकून देवळातील देवाला नमस्कार करीत. आजी मला पण पैसे फेकून नमस्कार करायला सांगायची. तो देवा कसला आहे हे पाहीपर्यंत गाडी देवळाच्या पुढे आलेली असायची, मग मी घाईघाईने पैसे फेकून नमस्कार करायचो. पण माझे पैसे आणि माझा नमस्कार दोन्ही हवेत जायचे. मग आजी सांगायची ‘हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो’. जुन्या घाट रस्त्यातील हा शिंग्रोबा सर्वांच्या श्रद्धेचा विषय होता आणि आजही आहे.

घाट संपल्यावर गाडी खोपोली बस स्थानकावर जाई. ते स्थानक फारच छोटे होते. एवढ्याश्या छोटया जागेत्त गाड्या कशा येजा करतात हे पाहणे मजेदार असायचे. घाट उतरून गाडी आता कोकणात आलेली असायची. त्यामुळे आजूबाजूचे लोक, त्याचे बोलणे, त्याचे कपडे हे सगळेच वेगळे दिसायचे. खोपोली सोडल्यावर गाडी अजून सुसाट निघे. आता आजूबाजूचा निसर्ग सुद्धा थोडा तेथील माणसांप्रमाणे वेगळा दिसायला लागला. रस्त्याच्या आजूबाजूला गावे कमी दिसायला लागली. गाड्यांची रहदारी कमी असल्यामुळे गाडी वेगात जात जायची. परंतु रस्ते अरुंद असल्याकारणाने शेजारची गाडी एकदम जवळून गेलेल्यासारखी वाटायची. पुढे पनवेल सोडल्यावर गाडी निघाली मुंब्र्याला. घाट उतरल्यापाससून वातावरणातील फरक दिसू लागला होता. कोकणातली दमट हवा आता जाणवू लागली होती. थोडाफार घामही आल्यासारखे वाटायचे. पनवेल ते मुंब्रा दरम्यान त्याकाळी फारशी वस्ती नव्हतीच. गावे रस्त्यापासून आत होती. लाल मातीचे रस्ते आजूबाजूला दिसत असायचे. निर्मनुष्य अशा ठिकाणाचे हे रस्ते कुठे जातात याचे कुतूहल वाटायचे. दोन तीन ठिकाणी शेतकरी म्हशींना जुंपून नांगरट करताना दिसले तेव्हा खूपच आश्चर्य वाटले. बैलं घरात नसली म्हणून काय झाले? म्हशींना औताला कशी काय जोडतात हे कोकणी लोकं? असे विचार मनात येई. तो कोकणी शेतकरी आणि त्या कोकणातल्या म्हशी या दोघांविषयी वाईट वाटायचे. पुढे जरा मोठा झाल्यावर कळाले कि, त्या म्हशी नव्हत्या तर ते रेडे होते. आता मी या अगोदर रेडा कधी पाहिला नव्हता, किंबहुना रेडा नावाचा प्राणी असतो हे हि मला ठाऊक नव्हते त्यामुळेच माझ्या समजुतीचा घोळ झाला होता. असो, पण म्हशींना न्याय मिळाला होता आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर. तेवढ्यात उजवीकडच्या डोंगर रांगेत हाजीमलंगचे शिखर दिसू लागे. मोठ्या शिखराशेजारी दोन तीन छोटी शिखरे होती. ती दिसल्यावर वडील त्यामागील दंतकथा सांगायचे, ‘अलीकडच्या शिखरावरून पलीकडच्या शिखरावर तीन (किंवा पाच) दगड अचूक दगड फेकले तर आपल्या सगळ्या ईच्छा पूर्ण होतात, पण ते खूपच कठीण काम असल्याकारणाने ते शक्य होत नाही’.

तिथून पुढे बसगाडी ठाणे शहरातून मुंबईत (Mumbai – Bombay) प्रवेश करी, तेव्हा एकदम वेगळे वाटायचे. मी जरी जन्माने मुंबईचा असलो तरी, दीडेक महिन्यांनी पुन्हा गर्दीत आल्याकारणाने बावचळ्यासारखे व्ह्यायचे. आता एकेक उपनगरामध्ये गावाहून मुंबईला आलेले प्रवासी गाडीतून उतरून जात. आम्ही सर्वात शेवटचा थांबा म्हणजेच मुबई सेंट्रल येथे उतरायचो. भायखळाच्या पुलाहून उजवीकडे वळण घेतले कि माझी उतरण्याची लगबग सुरु होई. पिशव्या, ट्रंक, बोचकी सगळॆ नजरेखाली घालून, काही शिल्लक नाहीना राहिले, याची खात्री घेवून आम्ही बसमधून खाली उतरायचो. टपावर जर एखादे तांदळाचे पोते असेल तर ते उतरविण्यासाठी हमालची व्यवस्था करावी लागे. मग आमचे सर्व लटांबर सर्व ओझी घेवून बसस्थानकाच्या बाहेरच्या रस्त्यावर आलो कि, घरी कसे जायचे यावर गहन चर्चा होई. ओझी कमी असतील तर खांद्यावर ओझी घेऊन चालत घरी जावू असे वडिलांचे म्हणणे असे. मुंबई सेन्ट्रल बस स्थानकापासून मधल्या रस्त्याने जे. जे. हॉस्पिटल मार्गे आमचे घर चालत सुमारे ३० ते ३५ मिनिटांच्या अंतरावर होते. परंतू ओझी घेवून चालायला मी नकार द्यायचो. गावी ठीक होते, पण मुंबईत ते ठीक नाही वाटत, त्यापेक्षा टॅक्सीने जावूया असे माझे आणि आईचे मत असे. मग आई वडिलांमध्ये जोरदार चर्चा व्हायची. शेवटी कंजूषपणावर चर्चा आली कि, मग मात्र वडील माघार घेत आणि टॅक्सीला हात करत. मग आम्ही टॅक्सीने प्रवास करण्याचा आनंद घेत असू. ७० ते ७५ सालाच्या आसपास टॅक्सीने प्रवास करणे म्हणजे मोठी ऐट असायची. टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूला बसून मी मनातल्या मनात टॅक्सी चालवत असे. टॅक्सीत बसण्याचा योग आम्हाला दोनदाच यायचा. गावी येताना किंवा जाताना आणि आईचे बाळंतपण झाले कि, नवीन बाळाला हॉस्पिटल मधून घरी आणताना. एरवी मुंबईची ट्रेन, बेस्टची बस किंवा अर्धा एक तासाच्या अंतरावर फेरी असेल तर पायगाडीच असायची.

टॅक्सीतून उतरून चाळीमध्ये प्रवेश करताना एखाद्या मोहिमेवरून परत आल्यासारखे वाटायचे. चाळीच्या जिन्यात कोणी ना कोणी उभे असायचेच. त्यांच्याकडे पहात पहात ऐटीने खांद्यावर ओझी घेवून घरात प्रवेश करत असू. तोपर्यंत संध्याकाळ व्ह्यायची वेळ झालेली असे. घरात गेलयावर एकदम अंधारून आल्यासारखे वाटायचे. समोरच्या चाळीकडे बघितले कि ती चाळ एकदम काळपटलेली, अंधारात असल्यासारखी दिसायची. गेले दीडेक महिन्यात मोकळ्या आकाशाखाली वावरलेली नजर ह्या वातावणात परत आल्यावर बावचळून जायची. आणि आमची पण गत तीच असायची. इतके दिवस गावी भर उन्हात वावरल्यामुळे आमचे चेहरे आणि शरीर पण काळे झालेले असायचे. तेव्हा शेजारचे आम्हाला चिडवायचे. मग साधारण आठ ते दहा दिवसात आमचे चेहरे पूर्वीसारखे गोरे होत.

एवढे दिवस घर बंद असल्याकारणाने घरी गेल्यावर आई प्रथम सर्व डबे उघडून बघत असे. घरात चहा, साखर, दूध ह्या अतिशय महत्वाच्या वस्तू नेमक्या गायब असायच्या. अन चहा पिल्याशिवाय तरतरी येणार कशी? मग माझ्यावर जबाबदारी यायची ती खालच्या वाण्याकडे जाऊन सर्व वस्तू आणण्याची. मी पिशव्या घेऊन वाण्याकडे जाण्यासाठी खाली उतरायचो.

अन इथून पूढे पुन्हा सुरु व्हायचे, आमचे मुंबईच्या जीवनाचे रहाटगाडगे.

[मनोगत]

माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग. तरी अजूनही असे वाटते कि योग्य अनुक्रम न मिळाल्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेलेल्या आहेत. माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न असून देखील वाचकांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढविणाऱ्या होत्या. विशेषतः आमच्या गावातील नवीन पिढीला यातील बऱ्याच गोष्टी नव्याने माहीत झाल्यामुळे त्यांना आनंदच झाला असेल यात शंका नाही. हे सर्व भाग पुन्हा एकत्र करून त्यात थोडी भर टाकून अथवा सुधारणा करून ह्या सर्व आठवणी ई-बुक स्वरूपात आपल्यासमोर पुन्हा आणण्याचा मानस आहे. तेव्हा लवकरच पुन्हा भेटूयात. आता पुढचे लेखन हे विविध विषयांवरचे असेल.

छायाचित्र सौजन्य: गुगल.कॉम (google.com)

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply