माझे गाव: भाग १७ : सुट्टी संपली-भाग १
सुट्टी संपली – चला मुंबईला परत – भाग १
साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरु होत असत. त्यामुळे आम्हाला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबईला यावेच लागे. बहुतेक वेळा आमचे वडील आम्हाला घेवून जाण्यासाठी गावी येत. ते आल्यावर दोनचार दिवसात आम्ही मुंबईला परत निघत असू.
त्या अगोदर पुन्हा एकदा आमच्या आत्यांच्या घरी धावती भेट द्यायचो. त्यांच्याकडून काही ना काही वाणावळा मिळायचा. पुन्हा एकदा लाड व्हायचे. खालच्या घरातून म्हणजे वडिलांच्या मावशीकडून ही खूप काही वाणावळा मिळायचा. आता मावशी नाही, पण तिची सून भिमाकाकू आजही आम्हाला कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. पिशवी भरून तांदूळ, मसुरा, काळे तीळ तिच्याकडून आजही मिळतात. तारा आत्याकडून बटाट्याचा किस पिशवी भरून मिळायचा. आमच्या घरातून सुद्धा तांदूळ मिळायचे. सोबत सुकवलेले पदार्थ म्हणजे पापड, कुरडया, बिबडी, वडे (सांडगे) हे देखील मिळायचे. आता हे सर्व कसे न्यायचे हाच मोठा प्रश्न असायचा. ह्या सर्वांची एकच तक्रार असायची. गावाला येताना खूप पिशव्या घेवून येत नाही म्हणून. गावात सगळयांकडे पोती किंवा मोठ्या पिशव्या असायच्या. बारीकसारीक सामानासाठी छोट्या पिशव्या नसायच्या. मग थोडासा वाणावळा घरातच ठेवावा लागे.
आदल्या दिवशी गावातील सर्वांच्या घरीसुद्धा धावती भेट घेवून निरोप घ्यायचो. ‘असंच दर वर्साला गावी येत ऱ्हा बाबा, माणसांची ओळख राहते, जरा घराकडे लक्ष राहू दे’. असले प्रेमळ सल्ले मिळायचे.
त्याकाळी वाड्याहून मुबई एसटी बस सकाळी साधारण १० वाजता सुटत असे. वाडा आमच्या गावापासून साधारण दोन कोस (सहा मैल किंवा आठ किलोमीटर) अंतरावर. मुक्कामाची बस भलवडी गावाहून सकाळी परत फिरायची, ती ७ ते ७.३० वाजता गावाच्या खाली सुमारे दीड किलोमीटर अंतरावरच्या फाट्यावरून पकडावी लागे. त्याकरिता आदल्या दिवशी लवकर झोपून पहाटे अंधाराचे लवकर उठावे लागे. उन्हाळ्याचे दिवस असले तरी गारठा असल्याने पहाटे अंघोळ नको वाटायची, पण इलाज नसायचा. अंघोळी झाल्यावर आई कपडे भरण्याच्या गडबडीत असायची. बाकीच्या पिशव्या आणि ट्रंक आदल्या रात्रीच भरलेल्या असत. भराभरा चहा, बटर खाऊन निघायची तयारी व्हायची. काकू चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि सुकं बेसन एखाद्या कपड्यात अथवा मोठ्या रुमालात बांधून देत असे. भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगाची एक छोटी थैली आणि पाण्यासाठी फिरकीचा मोठा तांब्या दिला जाई.
मग सगळ्यांचा निरोप घेवून दोन चार मोठ्या पिशव्या, एखादी ट्रंक, कपड्यांची थैली, खाण्याच्या सामानाची थैली, असे अवजड सामान घेवून आम्ही घाईघाईने निघायचो. सोबत नाना यायचा फाट्यापर्यंत बसमध्ये बसवून देण्याकरिता. समोरच्या घरांच्या रांगेतून देवळाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या सडकेपर्यंत बरेच जण निरोप देण्यासाठी येत. तिथे सामान ठेवून सर्व देवतांचे धावते दर्शन घेऊन आम्ही निघायचो. ताराआत्या वाडीहून आम्हाला निरोप द्यायला आलेली असायची. भीमाकाकू, तिची मुले, शेजारच्या म्हाताऱ्या, माझे मित्र असा बराच लवाजमा तिथे जमलेला असायचा. आजी, काकू, ताराआत्या, भीमाकाकू सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असायचे. तोंडाला पदर लावून डबडबलेल्या डोळयांनी कोणीतरी आमच्या आईला म्हणत, “आता वर्सभर भेटणार नाही माझी पोरं, सांभाळ ग माझ्या लेकरांना”. आता लेकरं कोणाची आणि सांगतीय कोण आणि कोणाला? पण वागण्यात आणि शब्दात अजीबात कृत्रिमपणा नसायचा. आमची आई पण रडायची. मग आम्ही निघायचो.
ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराला वळसा घालून निघालो कि, तेथील किसन सावंत किंवा बाळशीराम मोरे यांच्या वाडग्याकडे ओझरती नजर टाकून उन्हात बांधलेला एखादा बैल दिसतो का ते पहायचो. कारण आता वर्षभर बैलं पाहायला मिळणार नाही. तिथून पुढे बऱ्यापैकी सपाटी होती. सडकेवरून चालताना चपलांनी लाल माती उडत असे. जरा पुढे आल्यावर डाव्या बाजूला एखादे मेलेलं जनावर टाकलेले असले तर दुर्गंधी यायची. मोठमोठी गिधाडे मोठे पंख फडफडवून उतरताना आणि ककर्श आवाजात ओरडताना दिसत. तसले दृश्य दिसले कि डोळे बंद करून पटापटा पाऊले उचलून तिथून पुढे निघायचो. पुढे मोठ्या उताराहून टेकडीला उजवीकडे वळसा घालायचा, सडक सोडून मधल्या पायवाटेने भराभरा निघायचे. अजून सुमारे अर्धा किलोमीटरवर फाटा होता. तोवर डावीकडच्या बाजूने दुरवरून वाहनाची घरघर ऐकू यायची. मग आम्हाला वेग वाढवावा लागे. उतार असल्याने आपोआपच वेग वाढलेला असायचा. आवाज करणारे वाहन नजरेस यायचे. पण ती दुधगाडी असायची. म्हणजे एसटीला अजून वेळ आहे हे कळाल्यावर जरा हायसे वाटायचे. चाल जरा मंदावयाची. तेव्हढ्यात चमत्कार झाल्यासारखी कुड्याहून निघालेली एसटी बस लाल मातीचा धुराळा उडवीत घरघर आवाज करीत अचानक मागच्या उतारावर दर्शन द्यायची. अगोदरच्या दुधगाडीच्या आवाजात एसटीचा आवाज ऐकूच आलेला नसायचा. मग पुन्हा आमची पळापळ व्ह्यायची. नाना आम्हाला ओरडून पळा, पळा गाडी आली असे खुणावायचा. आमची एखादी पिशवी तो घ्यायचा. आम्ही आमचे सामान सांभाळत जोरात पळत निघू.
हातात किंवा खांद्यावर दोन दोन पिशव्या किंवा एक मोठी ट्रंक, असल्या सामानाचा आता राग यायचा.
‘हे गावचे लोक, आजी, आत्या अशा आहेत ना, काहीही सामान वाणावळा बांधून देतात, आता हे सर्व नेणे किती त्रासदायक आहे, हे त्यांना कधी कळणार’, अशा प्रकारचे प्रक्षुब्ध आणि बंडखोर विचार तेव्हा मनात येत.
वडीलांना एकदा तसे बोलून दाखविले.
“हे सर्व सामान मुंबईला दुकानात मिळते तर एवढा त्रास का घ्यायचा?”.
वडील म्हणाले “हे आपल्या शेतातले आहे आणि घरच्यांनी कष्टाने बनवलेलं आहे, ते मुंबईला मिळत नाही, आता पळ, थांबू नको, एसटी निघून जाईल आणि गावाला परतजाऊन उद्या मुंबईला जावे लागेल.”. म्हणजे आजचा त्रास उद्या पुन्हा घ्यावा लागेल ह्या विचाराने अंगावर काटा यायचा, अन मग मी आपला निमूटपणे चडफडत समान घेवून पळायचो.
ह्या सगळ्या वाणावळ्याची गमंत मुंबईला पोहोचल्यावर असते हे नंतर कळते. मुंबईला गेल्यावर शेजाऱ्यांना गावाकडचा वाणावळा वाटला जायचा. आणि मुंबईला त्याची चव आणि मजा काही वेगळीच लागते तेव्हा आता घेतलेल्या त्रासाची किंमत लक्षात यायची, असो. पण दरवर्षी हे विचार मनात यायचेच.
पळतपळत उताराहून खाली आलो कि ओढ्यातून वर आलो कि सडक लागे आणि तेथेच फाट्यावर एसटी बस थांबे. बसचे दर्शन मघाशीच जरी लांबून झालेले असले तरी मातीचा, तीव्र उताराचा आणि वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे बस खाली यायला थोडा वेळच लागे, तोवर आम्ही फाट्यावर पोहोचलेलो असो. एसटी मध्ये सर्व सामान चढवून झाले कि आमच्या प्रवासाचा एक टप्पा संपलेला असे. जास्तच सामान किंवा मोठे पोते मुंबई गाडीत चढवून देण्यासाठी नाना वाड्यापर्यंत यायचा.
मुंबईची बस
हि मुक्कामाची एसटी पुढे तालुक्याला खेड (राजगुरूनगर) पर्यंत जायची. पण मुंबई गाडी वाड्याहून सुटे म्हणून आम्ही वाड्याला उतरायचो. वाड्याला उतरून स्टॅण्डवर सामान ठेवून आम्ही गावात एक चक्कर मारीत असू. मुंबईला आमच्या शेजारच्या खोलीत राहणारे रामू मोरे यांच्या बसस्टॅण्ड जवळील घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेत असू. मुंबई बस राजगुरूनगर निघून राजगुरूनगर ते वाडा अशी असे. वाड्याला आल्यावर पाटी बदलून ती बस ‘वाडा ते मुंबई’ अशी धावे. वाडा गावात प्रवेश करताना मुंबई गाडी दिसली कि सर्वांची धांदल उडे. त्याकाळी तशी फारशी गर्दी नसायची. पण खेडला उतरणारी प्रवाशी मंडळी मुंबईकरांच्या जागा अडवून बसत, त्यामुळे बसमध्ये चढण्यासाठी आणि चढल्यावर जागेसाठी गोंधळ व्हायचा. त्यातच मुंबईकरांकडे सामान खूप असायचे. पण ते सामान खालीच ठेवून लोकं प्रथम बसमध्ये घुसून जागा पटकावून ठेवत, आपल्या सर्व कुटुंबाला जागा मिळवून देत आणि मग खाली उतरून पुन्हा सर्व सामान बसमध्ये किंवा टपावर चढवून ठेवीत. असली झटापट करणे वडिलांना फारसे जमायचे नाही. पण बसमध्ये नशिबाने आमची चांगली सोय व्हायची. बसमध्ये सर्वांनी जागा पटकावली कि मग बसमध्ये घुसताना आणि वर चढल्यावर जागेसाठी भांडणारे सर्वजण आपापले भांडण विसरून एकमेकाला संभाळून काय हवे नको ते बघत, एकमेकांना मदत करत हे एक वेगळेच दृश्य नजरेस पडे, आणि मग ती मघाशी तावातावाने भांडणारी माणसे बसमधून उतरून गेली कि काय असे वाटायचे.
तोवर बस ड्राइवर आणि कंडक्टर यांचे चहापाणी वगैरे झालेले असे. एखादा तालेवार माणूस स्टॅन्डमध्ये निवांत बसलेला असे. त्याला ह्या सर्वांच्या धावपळीचे काहीही देणे घेणे नसे. बस आली तरी आपली हॅन्डबॅग, लाल-गुलाबी रंगाच्या रिबिनीची झालर असलेली पिशवी संभाळत, अंगावरच्या कपड्याची घडीही मोडू न देता, विडी, सिगारेट ओढणे अथवा तंबाखूचा बार टाकून गर्दीकडे बघत निवांत बसणे हा त्याचा एककलमी कार्यक्रम असायचा. ड्राइवर बरोबर तो पुढे येई आणि ड्राइवर केबीनमध्ये डाव्या बाजूला कोणाचेही धक्के न खाता आरामात बसून प्रवास करी. ह्या महाभागांचा मला तेव्हापासूनच हेवा वाटत आलेला आहे. ह्यांना कसलीच घाई नसते. जागा मिळेल कि नाही याची चिंता नसते. कोणाचेही धक्के त्यांना लागत नाहीत अशी मोठी पुण्यवान माणसे असायची ती. मग वेळ झाली कि आमची मुंबई एसटी वाड्यावरून निघत असे. हा आमच्या प्रवासाचा दुसरा टप्पा.
वाड्याहून निघालेली बस खेडला (राजगुरुनगर) पोहोचेपर्यंत १२ वाजलेले असत. अंतर तसे कमी असले तरीही वळणावळणाचा आणि कच्चा रस्ता असल्याने साधारण ३५ ते ४० किमी. चे अंतरासाठी दीड तास लागायचा. खेडला बसचे ड्राइवर आणि कंडक्टर बदलेले जात. त्याच ड्राइवर आणि कंडक्टरला तीच बस मुंबईहून रात्री ११ वाजता घेवून दुसऱ्या दिवशी पहाटे खेडला यावे लागे. खेडहून चाकण, चाकणच्या पुढे आल्यावर भंडारा डोंगराच्या जवळून गाडी जावू लागली कि सर्व प्रवाशी डोंगराकडे पाहून नमस्कार करीत. ह्याच डोंगरावर बसून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली असे मला आजी किंवा वडील सांगत. मग तो डोंगर दिसेनासा होईपर्यंत मी त्या डोंगराकडे मान वाळवून पहात असे. पुढे इंदोरी गाव लागायचे, गावात प्रवेश केला कि रस्ता अरुंद व्हायचा. गावातून गाडी जाताना दुतर्फा घरे लागत. त्या घरांच्या मधून बस वेगात जायची अन मग एक वळण घ्यायची. त्या वळणावर इंदोरीचा भुईकोट किल्ला दिसायाचा. किंबहुना तो भुईकोट किल्ला किंवा गढी कधी दिसेल याचीच मी वाट पाहात असायचो. कारण आमच्या गावाकडे उंच उंच डोंगर असले तरी गडकिल्ले आमच्या भागात नाहीत. नाही म्हणायला चाकणचा किल्ला तसा आमच्या भागात आहे, पण ह्या प्रवासात तो दिसायचा नाही. त्यामुळे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला भुईकोट किल्ला पाहण्याचा एकमेव अनुभव आणि आनंद मला ऐतिहासिक काळात घेवून यायचा.
त्यांनतर यायचे तळेगाव दाभाडे. तेथील बस स्थानकावर बसगाडी थांबल्यावर आम्ही जेवत असू. पिशवीतील भाकर, बेसन व चटणी काढून खात असू. त्याकाळी बटाटेवडे हा पदार्थच आम्हाला माहीत नव्हता. नाही म्हणायला स्टॅण्डवरील हाटेलात भजी मिळायची. पण त्याची गरज नसायची. कधीकधी जर काही कमी पडले तरच भजी घ्यायचो. घरचीच भाकर चटणी इतकी छान आणि चविष्ट लागायची कि बाकीची काही गरज नसायची. त्यातच सकाळपासून पोटात काही खास गेलेले नसल्यामुळे भुकेपोटी सर्व फस्त करून संपवले जायचे. चक्क रुमाल किंवा फडके झटकून टाकावे लागे. मग फिरकीच्या तांब्यातील पाणी पिऊन झाले, खाली उतरून नवीन पाणी भरून घ्यायचो. पण त्यांनतर तळेगाव किंवा लोणावळ्याला मोठा ग्लास भरून उसाचा रस सर्वांना मिळायचा. आता पोट भरल्यामुळे छान तरतरी यायची, तर काहींना गुंगी यायची. तोवर दुपारचे दोन वाजले असत. आता गाडी चालू झाली कि व्हायचा मुंबईच्या प्रवासाचा तिसरा टप्पा.
पुढच्या भागात उर्वरित प्रवास करूयात.
छायाचित्र सौजन्य: तुकाराम ममता मोरे, ग्रामस्थ, कुडे खुर्द.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९
छान .आगदी जुना काळ समोर दिसला.
Superb