संबंध – एक संगीतमय करूण कथा – २
चल अकेला
ह्या चित्रपटाचा नायक आहे 22 वर्षीय मानव चॅटर्जी. त्याला आतापर्यंत आलेल्या सततच्या दुःखद अनुभवामुळे तो कोलमडलेला आहे. सख्या आई वडीलांपासून दुरावलेला मानव दत्तक आई वडीलांपासून सुध्दा दुरावतो, सत्शील चारित्र्य असलेला परंतु स्वतःचे दुःख विसरण्यासाठी दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याची सध्याची मनस्थिती व परीस्थिती आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल हे शीर्षक गीतामध्ये सुरेख दाखविले आहे.
तो आता आपले नाव बदलून मोहन सिंग या नावाने चहाच्या मळ्यावर मॅनेजर म्हणून कामाला आहे तेथे मनाविरुद्ध घटना घडते, अनैतिक कार्यात त्याला ओढून त्याचे चारित्र्य डागाळण्याची खेळी तेथील मुकादम करतो, तेव्हा मानव त्याच्या नोकरीचा राजीनामा त्यांची मालकीण श्रीमती सेन यांच्याकडे सुपूर्द करतो. आणि त्याच्या आयुष्यातील नवीन वाटचालीस लागतो.
मुकेश यांनी गायलेल्या ‘चल अकेला, चल अकेला’ ह्या शीर्षक गीताने चित्रपट पुढे सरकतो. गाणे युट्युबवर पहा
चल अकेला, चल अकेला , चल अकेला,
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला ।।
एकटे पडलेल्या मानवला पुढचे आयुष्य असेच एकट्याने जगायचे आहे, आई, वडील, दत्तक आईबाप, जीच्यावर प्रेम केले व लग्नाच्या आणाभाका घेतल्या प्रेयसी हे सर्व आपल्यापासुन दुरावलेले आहेत, ह्या सर्वांच्या गर्दीतून आपण हरवलो आहोत, ते सर्व आता पाठीमागे राहिले आहेत आणि आपला मार्ग एकला झालेला आहे हे त्याला कळून चुकले आहे.
हजारों मील लम्बे रास्ते तुझको बुलाते,
यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाते,
है कौनसा वो इंसान यहाँ पर जिसने दुःख ना झेला,
चल अकेला…
इथून पुढे आयुष्याची खूप मोठी वाट तुला चालण्यासाठी बोलवत आहे, जिथे अजूनही खूप दुःख तुला सहन करायची आहेत. पण हे केवळ तुझ्या वाट्याला आले आहे असे तू का समजतो, ह्या जगात सर्वांना दुःख भोगावी लागतात, ह्या जगात कोणी असा आहे ज्याला कधीच दुःखाचा सामना करावा लागला नाही? मानव स्वतःला असे समजावत चालला आहे.
तेरा कोई साथ ना दे तो खुद से प्रीत जोड़ ले,
बिछौना धरती को करके अरे आकाश ओढ़ ले,
यहाँ पूरा खेल अभी जीवन का तुने कहाँ है खेला,
चल अकेला….
ज्यांच्यावर प्रेम केले अशी सर्व मायेची माणसे दुरावलेली आहेत, मग असे एकटेच कसे चालणार, ह्या आयुष्याच्या अवघड वाटेवरून जात असताना कोण सोबत असणार?
अशा वेळेस तू स्वतःवरच प्रेम कर आणि बघ हे सगळे जग तुला तुझेच वाटेल, तू देवाचा अंश आहेस, तो देव तुला सांभाळेल, आणि आयुष्य तर फार मोठे आहे, अजून तुझा पूर्ण डाव तू कोठे खेळला आहेस? तेव्हा हे जग तुझेच आहे असे समज, आणि ह्या जगाच्या उघड्या अंगणात आकाश पांघरून शांत झोपी जा. आणि असाच एकटा चालत रहा. तुझा तुला मार्ग नक्कीच सापडेल.
अशा दुःखद विचारांनी मानव आपले आयुष्य जगत आहे. स्वत:लाच समजावीत आहे.
पण त्याला कुठे माहीत होत की, आयुष्याची पुढची खेळी काय असेल आणि त्याचा परिणाम काय असेल, अजून कुठली दुःख आपल्या वाट्याला येणार आहेत? कि ह्या सर्व दुःखाचा अंत जवळ आला आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं भविष्यात दडली आहेत.
या गाण्याचे वैशिष्ठय म्हणजे ह्या चित्रपटात एक गाणे मुकेश यांना देण्याचा हट्ट मुखर्जींनी केला, तसेच पहाता मुकेश हा ओपीचा एखादा अपवाद वगळता कधीच गायक राहिला नव्हता. मुकेश यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली होती, म्हणून ओपीने जास्तीत जास्त वेळ कोरसचा वापर करून मुकेशला विश्रांती मिळेल याकडे लक्ष दिले होते. ह्या गाण्यातील कोरसचा वापर अतिशय परिणामकारकरीत्या केलेला आहे. संपूर्ण गाणे एकाच टेकमध्ये रेकॉर्ड झाले आहे, म्हणून मुकेश अजून टेक घ्या असे सांगत होता, परंतु ओपीने त्यास नकार दिला. कवी प्रदीप यांनी हे गाणे लिहिले आहे, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कवी प्रदीप यांनी त्या गाण्यास चाल लावून ठेवली व स्वतः गाणार असे ठरविले, ओपीने त्यास आक्षेप घेतला व आता उरलेली गाणी पण कवीजींकडून करून घ्या असेल सांगून निघून गेले. शेवटी संध्याकाळी मुखर्जी आणि प्रदीपजी ओपीच्या घरी समजावयाला गेले व तेथे ओपीने लावलेली चाल ऐकली.
भाग २ रा समाप्त
क्रमश:
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९