Unforgettable songs of Lata and Chitragupta

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्ण काळात काही गायिका आणि संगीतकार यांच्या जोड्या प्रसिद्धीस आल्या. उदाहरणार्थ लता आणि सी. रामचंद्र, लता आणि मदनमोहन, आशा आणि ओपी नय्यर इत्यादी. ह्या उल्लेखलेल्या द्वयींची अनेक सुमधुर, अवीट आणि अविस्मरणीय गाणी आजही नव्या-जुन्या पिढीकडून ऐकली जातात.

परंतु आणखी एका जोडीविषयी फारसे बोलले जात नाही, ऐकायला मिळत नाही. केवळ जाणकार आणि कानसेनांनाच ह्याविषयी माहिती आहे.

गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या जोडीविषयी फार कमी बोलले जाते अथवा या दोघांनी एकत्र केलेली गाणी आपल्याला माहिती नाहीत. भले गाणी माहीत असतील पण ह्या जोडीने हि गाणी दिली आहेत हे बहुतेकांना ठाऊक नाही.

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

चित्रगुप्त श्रीवास्तव १९४६ पासून संगीतकार म्हणून कार्यरत होते आणि गाजले देखील होते. तरी देखील १९४६ पासून सुमारे ३६ चित्रपटांना संगीत देवूनही चित्रगुप्त यांनी लतादीदींचा आवाज एकाही गाण्याला वापरला नव्हता. गायिका लतादीदी आणि संगीतकार चित्रगुप्त ह्यांनी प्रथम एकत्र काम केले ते १९५५ साली ‘शिवभक्त’ ह्या धार्मिक चित्रपटात. तरीही लतादिदींबरोबर संगीतकार चित्रगुप्त यांची खरी जोडी जमली ती १९५७च्या ‘भाभी’ ह्या चित्रपटापासून. आणि संगीतकार चित्रगुप्त यांनाही खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपट संगीतसृष्टीत नव्याने ओळख मिळाली ती सुद्धा ‘भाभी’ चित्रपटामुळेच.

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांचे पहिले गाणे (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

आजच्या लेखातील प्रथम गाणे ऐकूया, ‘शिवभक्त’ ह्या चित्रपटातील अतिशय दुर्मिळ किंवा फार ऐकण्यात नसलेले गाणे. १९५५ मधील ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती त्यावेळच्या मद्रासच्या (आजचे चैन्नई) AVM Productions च्या ए. व्ही. मैयप्पन (A. V. Meiyappan) यांनी. ह्या चित्रपटास संगीत देण्यास सचिनदेव बर्मन यांनी, ‘धार्मिक’ चित्रपट असल्याने पुढे आपणावर धार्मिक चित्रपटाचे संगीतकार असा शिक्का बसेल या कारणास्तव नकार दिला, शिवाय चित्रगुप्त यांचे नावही सचिनदादांनी सुचविले. कारण चित्रगुप्त यांनी तो पर्यंत अनेक धार्मिक, पौराणिक चित्रपट केले होते. अशा तऱ्हेने चित्रगुप्त यांना एक चांगला बॅनर मिळाला. ह्यावेळेपर्यंत चित्रगुप्त ह्यांना त्यामानाने कमी बजेटचे चित्रपट मिळाल्याकारणाने त्यांनी तोपर्यंत लतादीदी यांचा आवाज वापरला नव्हता. AVM यांचे मोठ्या बजेटचे चित्रपट तसे चांगलेच चालायचे त्यामुळे ह्या चित्रपटाला संगीत द्यायचे म्हणजे ‘लता मंगेशकर’ यांचा आवाज वापरण्याची ‘चैन’ करण्याची सुवर्णसंधी चित्रगुप्त यांना मिळाली. आणि त्यांनी खरोखरच त्या संधीचे सोने केले. त्यापुढे AVM Productions अजून चार चित्रपट चित्रगुप्त यांना मिळाले.

तब्बल १४-१५ गाणी असलेल्या ‘शिवभक्त’ ह्या पौराणिक चित्रपटात लतादीदींनी ४ गाणी गायली होती. त्यापैकी ह्या चित्रपटातील लतादीदींनी गायलेले ‘कैलासनाथ प्रभू अविनाशी’ हे गाणे आपण प्रथम ऐकूया.

सव्वातीन मिनिटाच्या या गाण्यात भगवान शिवाच्या स्तुतीपर पहिल्या चार ओळी ४० सेकंदात संपल्यावर पुढील अडीच मिनिटे ‘भरतनाट्यम’ नृत्य आणि केवळ तराणा आणि ताना आहेत, त्यामुळे लतादीदींच्या आवाजातील हे गाणे एक वेगळाच आणि सुखद धक्का देखील देते. ह्या गाण्यावर तेव्हा केवळ २३ वर्षे वय असलेल्या अभिनेत्री पद्मिनी ह्यांनी अतिशय सुंदर नृत्य केले आहे. मराठी अभिनेते शाहू मोडक हे नायकाच्या भूमिकेत होते. ह्या गाण्याचे अजून एक वैशिष्टय म्हणजे ह्या गाण्यात सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री उस्ताद अल्लारखा खान (कुरेशी) ह्यांनी तबला वादन केले आहे.

भगवान शिवाचे स्मरण करून ह्या चित्रपटातील लतादीदींनी गायलेले ‘कैलासनाथ प्रभू अविनाशी’ हे गाणे आपण प्रथम ऐकूया.

गाणे: ‘कैलासनाथ प्रभू अविनाशी’, चित्रपट: शिवभक्त (वर्ष १९५५), कवी: गोपालसिंग नेपाली (G. S. Nepali), गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त

गाणे: ‘कैलासनाथ प्रभू अविनाशी’, चित्रपट: शिवभक्त (वर्ष १९५५), कवी: गोपालसिंग नेपाली (G. S. Nepali), गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त

शिवभक्त’ चित्रपटाला चांगले संगीत दिल्याने AVM यांनी चित्रगुप्त यांना भाभी (१९५७), बरखा (१९५९) आणि मै चूप रहूंगी (१९६२) आणि १९६४चा ‘मैं भी लडकी हूँ’ ह्या आणखी चार चित्रपटांना संगीत देण्याची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या पार पाडली. AVM यांच्या पुढील चित्रपटात म्हणजेच १९५७ च्या ‘भाभीं चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजली. त्यामुळे चित्रगुप्त यांच्या कारकिर्दीला नवीन वळण मिळाले. चित्रगुप्त उच्चशिक्षित असल्याने त्यांना AVM यांच्याशी इंग्रजीत संवाद साधणे सोपे व्ह्यायचे, त्यामुळे AVM Productions च्या ए. व्ही. मैयप्पन (A. V. Meiyappan) यांचे सूर चित्रगुप्त यांच्याशी चांगले जुळायचे.

ह्या भागात आपण चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेली आणि लतादीदी यांनी गायलेली काही निवडक गाणी ऐकूयात. संगीतकार चित्रगुप्त आणि गायिका लता मंगेशकर या दोघांनी मिळून एकूण २४० गाणी केलेली आहेत. त्यापैकी सुमारे १५० गाणी लतादीदी यांनी एकटीने (एकल गाणे – Solo) गायली आहेत. त्यातील काही निवडक गाणी मी निवडली आहेत. गाण्यांची संख्या मोठी असल्याने ह्या विषयावर दोन ते तीन लेख बनवावे लागतील असे दिसते.

चला, आता ऐकूया ह्या यादीतील पहिले गाणे.

गाणे: ‘कारे कारे बादरा’, चित्रपट: भाभी (वर्ष १९५७), कवी: राजेंद्र कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त. अभिनेत्री ‘शामा’ हिच्यावर चित्रीत झालेले हे गाणे तिच्या अदाकारीने जास्तच प्रेक्षणीय देखील आहे. ‘वृदांवनी सारंग’ राग आणि ‘केहारवा’ तालात हे गाणे बांधले आहे.

गाणे: ‘कारे कारे बादरा; ‘, चित्रपट: भाभी (वर्ष १९५७), कवी: राजेंद्र कृष्ण, संगीतकार: चित्रगुप्त

१९५७च्या ‘भाभी’ ह्या चित्रपटाने चित्रगुप्त यांना खूपच प्रसिद्धी मिळवून दिली. ह्या चित्रपटात एकूण १० गाणी होती. त्यातील ‘चल उड़ जा रे पंछी’ हे मोहम्मद रफ़ी यांनी गायलेले गाणे तर अजरामर ठरले आहे. आताच ऐकलेल्या गाण्याव्यतिरिक्त लतादीदी यांनी ह्या चित्रपटात ‘जा रे जादुगर, देखी तेरी जादुगारी’ आणि विनोदी गाणे ‘टाई लगाके मैना बन गई जनाब हीरो’ हि दोन एकल (Solo) गाणी गायली होते, तसेच ‘चली चली रे, पतंग मेरी चली रे’ आणि ‘छुपाकर मेरी आंखें को’ हि दोन द्वंद्वगीते गाणी मोहम्मद रफी यांच्या बरोबर गायली आहेत.

संगीतकार चित्रगुप्त यांच्याविषयी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

आता थोडे चित्रगुप्त यांच्याविषयी जाणून घेऊया. चित्रगुप्त यांचे पूर्ण नांव होते, ‘चित्रगुप्त श्रीवास्तव’. बिहारमधील आताच्या गोपालगंज तालुक्यात चित्रगुप्त यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. चित्रगुप्त यांचे वडील बंधू म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळी ब्रिटिशांविरुध्द ‘असहकार चळवळी’त भाग घेऊन १९३० साली तुरुंगवास भोगलेले निर्भीड पत्रकार, संपादक ब्रज नंदन ‘आझाद’. चित्रगुप्त यांच्यापेक्षा ते ११ वर्षाने मोठे होते. त्यांच्या कडक शिस्तीमुळे चित्रगुप्त यांनी अर्थशास्त्र आणि पत्रकारिता (M. A. – Economics आणि M. A. – Journalism) ह्या दोन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. त्या काळातील चित्रपटसृष्टीत चित्रगुप्त हे सर्वात जास्त शिक्षित होते. चित्रगुप्त यांनी लखनऊच्या सुप्रसिद्ध ‘भातखंडे संगीत संस्था’ ह्या नावाजलेल्या संस्थेतून गायन आणि संगीतकलेचे रीतसर शिक्षण घेतले होते. त्यांनी पाटणा कॉलेजमध्ये काही वर्षे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. परंतु बहुदा संगीतक्षेत्राकडे जास्त ओढा असल्याने त्यांनी पाटणा सोडून मुंबईला प्रस्थान केले.

पुढचे गाणे आहे: ‘बलमा माने ना’, चित्रपट: ऑपेरा हाऊस (वर्ष १९६२), कवी: मजरुह सुल्तानपूरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

‘मालकंस’ रागावर आधारीत आणि ‘केहारवा’ तालात बांधलेले हे गाणे ऐकताना गाण्याच्या वेगाबरोबर आपणही वाहवत जातो. आपल्या नकळत आपण तबला अथवा ढोलकीचा ठेका धरायला लागतो. दाक्षिणात्य अभिनेत्री बी. सरोजादेवी यांनी ह्या गाण्यावर अप्रतिम नृत्य केले आहे. माझ्या आवडीचे हे गाणे ७०च्या दशकात विविध भारतीवर सकाळच्या ‘संगीत सरिता’ कार्यक्रमात नेहमीच ऐकायला मिळायचे. चला, आता तुम्ही पण ऐका.

गाणे: ‘बलमा माने ना’, चित्रपट: ऑपेरा हाऊस (वर्ष १९६२), कवी: मजरुह सुल्तानपूरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त

१९६२ मधील ऑपेरा हाऊस ह्या चित्रपटात एकूण ६ गाणी होती. त्यातील ‘सोना ना, सितारोंका है कहेना’ आणि ‘सैंया हाय हाय तेरे गाव में’ हि दोन एकल गाणी गायली होती, तसेच ‘ना मिलते हम तो कहो तुम किधर गये होते’ आणि अतिशय प्रसिद्ध असे ‘देखो मौसम, क्या बहार है’ ही लतादीदी यांनी मुकेश यांच्याबरोबर गायलेली दोन द्वंद्वगीते आणि मोहम्मद रफी यांच्याबरोबर ‘रास्ते में तेरे कबसे खडे’ हे द्वंद्वगीत गायले आहे.

१९४२ मध्ये मुंबईत आल्यावर ‘भातखंडे संगीत संस्था’ मधील चित्रगुप्त यांचे वरिष्ठ सहध्यायी ‘श्री नाथ त्रिपाठी’ (S. N. Tripathi) ह्या त्यावेळच्या यशस्वी संगीतकाराकडे गायक आणि संगीत सहाय्यक म्हणून चित्रगुप्त यांनी आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रगुप्त चांगले तबला वादक होते आणि त्यांना गायनाचीही आवड होती. पुढे संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी यांनीच चित्रगुप्त यांना १९४६ मध्ये ‘फायटिंग हिरो’, लेडी रॉबिनहूड’ आणि ‘तुफान क्विन’ असे चित्रपट स्वतंत्रपणे संगीतबद्ध करण्यास मिळवून दिले. तिथून पुढे बसंत पिक्चर्सचे ‘होमी वाडीया’ (फीअरलेस नादिया यांचे पती) आणि दीपक पिक्चर्सचे ‘नानाभाई भट्ट’ (निर्माता, दिग्दर्शक मुकेश भट्ट यांचे पिता) ह्यांच्या अनेक स्टंटपट, हाणामारीचे चित्रपट, पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांना चित्रगुप्त यांनी संगीत दिले. त्यामुळे १९४६ पासून १९५५ पर्यंत चित्रगुप्त ह्यांना त्याच प्रकारचे चित्रपट मिळत गेले. त्यातील गाणी चांगली असली तरी त्या गाण्यांना सुद्धा त्या चित्रपटासारखाच ‘बी’ दर्जा मिळाला होता. १९५२ मधील ‘सिंदबाद द सेलर’ ह्या चित्रपटातील रफी आणि शमशाद बेगम यांनी गायलेले ‘अदा से झुमते हुये, दिलोंको चुमते हुये’ ह्या गाण्यामुळे चित्रगुप्त यांना थोडीफार ओळख मिळाली.

पुढचे गाणे ऐकूया. गाणं आहे, ‘तडपाओगे, तडपा लो‘, चित्रपट: बरखा (वर्ष १९५९), कवी: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त. ह्या चित्रपटाची नायिका जरी ‘नंदा’ असली तरी हे गाणे शोभा खोटे यांच्यावर चित्रीत झाले आहे.

गाणं: ‘तडपाओगे, तडपा लो’, चित्रपट: बरखा (वर्ष १९५९), कवी: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

१९५९ मधील AVM Productionच्या ‘बरखा’ ह्या चित्रपटात एकूण १० गाणी होती. त्यापैकी ‘बरखा बहार आयी’, ‘पूछूंगी एक दिन’, आणि ‘उंचे परबत गहरा सागर ‘ हि तीन एकल गाणी लतादीदी यांनी गायली होती. तसेच लतादीदी यांनी मुकेश यांच्यासोबतचे अतिशय प्रसिद्ध असे ‘एक रात में दो दो चांद खिले’ आणि रफी यांच्यासोबत ‘वो दूर जो नदिया बहती है, वहा एक अलबेली रहती है’ हि दोन सुंदर द्वंद्वगीत गायली आहेत.

चित्रगुप्त हे अतिशय प्रतिभावान संगीतकार होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कमी बजेटचे, हाणामारीचे आणि ‘बी’ ग्रेड चित्रपटांना संगीत दिले. चित्रगुप्त हे एकमेव संगीतकार असावेत ज्यांनी ‘बी’ ग्रेड, ‘सी’ ग्रेड आणि ‘ए’ ग्रेड चित्रपट, अशा सर्व दर्जांच्या चित्रपटांना संगीत दिले आहे. AVM Production चा अपवाद सोडला तर त्यांच्यापाठीमागे अन्य दुसरा मोठा बॅनर क्वचितच दिसला. त्यांच्या सुरुवातीच्या म्हणजेच १९४६ ते १९५५ ह्या काळातील सुमारे ३६ चित्रपटांपैकी बरेच चित्रपट हे ह्या आधी सांगितल्याप्रमाणे स्टंटपट, हाणामारी, रहस्यपट असे चित्रपट होते. ह्या चित्रपटांत फीअरलेस नादिया आणि जॉन कावस ही त्या काळची लोकप्रिय जोडी लक्ष वेधून घ्यायची, गाण्याकडे कोणाचे लक्षच नसे, गाण्यांना कमी महत्व असायचे. म्हणून त्या चित्रपटांतील चित्रगुप्त यांची फार गाजली नाही.

परंतु त्यांच्या पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांतील गाणी मात्र गाजली. १९४९ च्या ‘भक्त पुंडलीक’ ह्या चित्रपटातील ‘माता पिता कि सेवा कर के’, ‘दर्शन दे दो चक्रधर सूदर्शनधारी’, ‘जय मुरलीधर मोहन गिरधर’ ह्या तिन्ही गाण्यांना चित्रगुप्त यांचा आवाज आहे तसेच चित्रगुप्त यांनी ‘आखोंसे काही दिल ने सुना’ हे उमादेवी (अर्थात टुणटुण) ह्यांच्या बरोबर द्वंद्वगीत गायले आहे.

१९५४च्या ‘तुलसीदास’ ह्या चित्रपटातील मो. रफी यांनी गायलेली ‘मुझे अपनी शरणमें ले लो राम’, ‘कहा छुपे हो राजा राम’ आणि ‘हे महादेव, मेरी लाज रहे’ हि तीन अजरामर भजने देवून चित्रगुप्त यांनी चित्रपटसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला होता.

पुढचे गाणे ऐकूया. गाणं आहे, ‘दिल को लाख संभाला जी’, चित्रपट: गेस्ट हाऊस (वर्ष १९५९), कवी: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणं : ‘दिल को लाख संभाला जी’, चित्रपट: गेस्ट हाऊस (वर्ष १९५९), कवी: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

१९५९ मधील ‘गेस्ट हाऊस’ ह्या चित्रपटात एकूण १० गाणी होती. त्यापैकी लतादीदी यांनी ‘थंडी थंडी चली रे हवा’ आणि ‘तेरा जादू ना चलेगा ओ सपेरे’ ही दोन सुमधुर एकल गाणी गायली आहेत. ही दोन्ही गाणी सुध्दा सुंदर आहेत. तसेच लतादीदी यांनी मुकेश यांच्या बरोबर ‘तुमसे कुछ केहना है’ हे द्वंद्वगीत गायले आहे.

चित्रगुप्त यांनी १९४६ ते १९८८ पर्यंत सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले. चित्रगुप्त यांना १९६८ मध्ये हृदयविकाराचा झटका आणि १९७४ मधील पक्षाघाताचा झटका येवूनही त्यांची कारकीर्द संपली नाही. पक्षाघातातून ९० टक्के बरे होऊन ते पूर्ववत कामाला लागले आणि पुढची आणखी १३-१४ वर्षे चित्रपटांना आणखी १८-१९ चित्रपट केले. हे एक दुर्मिळ उदाहरणच म्हटले पाहिजे. शिवाय त्यांच्यावर चित्रपट निर्मात्यांच्या असलेल्या विश्वासाचे ते एक प्रतीक आहे.

चित्रगुप्त आणि लतादीदी यांच्या सांगीतिक सहयोगाला १९५५ पासून सुरुवात झाली आणि पुढील १५ वर्षे उत्तमोत्तम एकापेक्षा एक अशी उत्कृष्ट आणि अवीट गोडीची गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळाली. हा अविस्मरणीय सहवास त्या मधुर गाण्यांच्या रूपाने लोकांच्या स्मरणात जपला जात आहे. लतादीदी यांनी चित्रगुप्त यांची गाणी गाण्यासाठी वेगळाच आवाज वापरल्याचे दिसून येते. लतादीदी यांची गाण्यातील मधुरता आणि मृदुपणा आणि चित्रगुप्त यांचे शास्त्रीय संगीतावर आधारित चाल आणि वाद्यमेळ यांचा अप्रतिम संगम ह्या द्वयींच्या गाण्यात झालेला आढळतो. लतादीदींनी गाण्याच्या मूड आणि कथेच्या पार्श्वभूमीप्रमाणे गाण्याला योग्य आणि प्रत्येक गाण्याला वेगळाच आवाज दिला आहे. चित्रगुप्त ह्यांच्याकडे लतादीदींनी यांनी भक्तिगीते, शृंगारिक गीते, अंगाई गीते, भजने अशी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. त्यापैकी लतादीदींनी यांनी चित्रगुप्त ह्यांच्याकडे गायलेली भक्तिगीते, भजने आणि अंगाई गीते एका वेगळाच आनंद देतात.

१९६२ मधील ‘शादी’ ह्या चित्रपटातील दोन गाणी आता ऐकूयात.

पहिले गाणे आहे, ‘आज की रात नया चांद लेके आई है’, गायिका आणि संगीतकार अर्थातच लतादीदी आणि चित्रगुप्त, दोन्ही गाणी लिहिली आहेत राजींदर कृष्ण यांनी.

गाणं : ‘आज की रात नया चांद लेके आई है’, चित्रपट: शादी (वर्ष १९६२), कवी: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

दुसरे गाणे आहे, ‘जा और कही रो शहनाई जा अब मैं हूँ और मेरी तन्हाई’.

गाणं : ‘जा और कही रो शहनाई ‘, चित्रपट: शादी (वर्ष १९६२), कवी: राजेंद्रकृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

आताच ऐकलेली दोन्ही गाणी पडद्यावर अभिनेत्री सायरा बानू यांच्यावर चित्रित झाली आहेत, आणि सायराजी त्यात खूपच सुंदर दिसतात. लतादीदींनी चित्रगुप्त यांच्या अनेक सामाजिक तसेच स्टंटपटामध्ये गाणी गायली असल्याकरणाने बऱ्याच नवनवीन अभिनेत्रीनांना लतादीदींचा आवाज मिळाला आहे.

संगीतकार चित्रगुप्त यांचे गीतकार (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

चित्रगुप्त यांची बहुतांश गाणी मजरुह सुलतनापूरी यांनी लिहिलेली आहेत, त्या खालोखाल राजींदर कृष्ण आणि चित्रगुप्त यांचे मित्र प्रेम धवन यांचे नाव घेता येईल. मजरुह सुलतनापूरी आणि राजींदर कृष्ण यांनी चित्रगुप्त यांच्यासाठी विविध प्रसंग आणि विविध भावार्थ असलेली अप्रतिम गाणी लिहिली आहेत. सुप्रसिद्ध गीतकार साहिर आणि कवी शैलेंद्र हे सुद्धा चित्रगुप्त यांचे घनिष्ठ मित्र होते.

चित्रगुप्त यांच्या घरी कवी शैलेंद्र आल्यावर दोघेही त्यांची मातृभाषा म्हणजेच भोजपूरीमध्ये बोलत बसत. म्हणून १९६२-६३ मध्ये निर्मित ‘गंगा मईया तोहे पियरी चढ़इबो’ ह्या पहिल्या भोजपूरी भाषेतील चित्रपटात चित्रगुप्त आणि कवी शैलेंद्र एकत्र आले आणि त्यांनी एक इतिहास रचला. ‘गंगा मईया….’ पाठोपाठ ‘लागी नाहीं छूटे राम’, ‘भौजी’,  ‘भैया दूज’ और ‘गंगा’ इत्यादी भोजपूरी चित्रपट चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केले. मजरुह यांनी देखील चित्रगुप्त यांच्यासाठी भोजपुरीत गाणी लिहिली आहेत.

आता आपण तीन गाणी लागोपाठ ऐकूया, ज्या गाण्यांमुळे मी चित्रगुप्त यांच्या गाण्यांचा चाहता झालो. त्यापूर्वी या अगोदर सांगितल्याप्रमाणे विविध भारतीवर ‘संगीत सरिता’ कार्यक्रमामध्ये ‘बलमा माने ना’ हे गाणे खूप वेळा ऐकले होते, त्यामुळे संगीतकार चित्रगुप्त हे नाव मला नवीन नव्हते, परंतु पुढील गाणी ऐकून मी मात्र फारच भारावलो होतो. लतादीदींनी ही तिन्ही गाणी अतिशय वेगळ्या आवाजात गायली आहेतच, शिवाय अतिशय मधुर चाल आणि परीणामकारक वाद्यमेळ ह्यामुळे हि गाणी मंत्रमुग्ध करतात, चला आपणही ह्या गाण्यांचा आनंद घ्या. (या तिन्ही गाण्यातील लतादीदींचा आवाज पुन्हा पुन्हा ऐका, मग लक्षात येईल की चित्रगुप्त आणि लता मंगेशकर ह्या जोडीने काय कमाल केली आहे ती. हा दुर्मीळ ठेवा आपणाकडे उलगडून दाखवावा आणि हा लेख लिहायचे प्रेरणा मला का निर्माण झाली हे देखील लक्षात येईल.)

पहिले गाणे आहे: रंग दिल की धडकन भी…, चित्रपट: पतंग (वर्ष १९६०), गीतकार आहेत राजींदर कृष्ण, गायिका आणि संगीतकार अर्थातच लतादीदी आणि चित्रगुप्त. राग: पिलू, ताल: केहरवा.

गाणे : रंग दिल की धडकन भी…, चित्रपट: पतंग (वर्ष १९६०), गीतकार आहेत राजींदर कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

दुसरे गाणे आहे: दिल का दिया जलाके गया …’, चित्रपट: आकाशदीप (वर्ष १९६५), गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी, गायिका आणि संगीतकार लतादीदी आणि चित्रगुप्त. राग: पहाडी.

लतादीदींनी अतिशय मृदू आणि तरल आवाजात हे गाणे म्हटले आहे की त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे, ते गाणे फक्त अनुभवायचे आहे. कान आणि मन दोन्ही तृप्त करून घ्यायचे.

गाणे: दिल का दिया जलाके गया …’, चित्रपट: आकाशदीप (वर्ष १९६५), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

तिसरे गाणे आहे: दगा, दगा, वई वई वई…’, चित्रपट: काली टोपी लाल रुमाल (वर्ष १९५९), गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी, गायिका आणि संगीतकार लतादीदी आणि चित्रगुप्त.

गाणे: दगा, दगा, वई वई वई…’, चित्रपट: काली टोपी लाल रुमाल (वर्ष १९५९), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

‘काली टोपी लाल रुमाल’ ह्या चित्रपटातील ‘लागी छुटे ना, अब तो सनम’ हे लता आणि रफी यांनी गायलेले द्वंद्वगीत खूपच लोकप्रिय झाले होते. तसेच मो. रफी यांचे ‘दिवाना आदमी को बनाती है रोटीया’ हे अतिशय आशयपूर्ण गाणे ही ह्याचा चित्रपटातील.

चित्रगुप्त यांनी शास्त्रीय संगीताचा आणि पाश्चिमात्य सुरावटीचा छान वापर करून गाणी बसविली आहेत. कोणीही सहजपणे ती गाणी गुणगुणावीत अशा त्यांच्या गाण्यांच्या चाली ह्या सहज सोप्या असत. ‘मैं चूप रहूंगी’ ह्या चित्रपटातील सर्वच गाणी अशीच होती. ‘मेरे दिल कभी तो कोई आयेगा’, ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो’, ‘कोई बता दे, दिल है कहा’, ‘चांद जाने कहा खूप गया’ अशी एकाहून एक सुंदर गाण्यांमुळे चित्रगुप्त यांचे नाव आणि गाणी घराघरात गेली.

अशीच मधुर आणि सोप्या चालीची दोन आपण आता ऐकूयात.

त्यातील पहिले गाणे आहे: मेरे दिल कभी तो कोई आयेगा, चित्रपट: मैं चूप रहूंगी (वर्ष १९६२), गीतकार: राजींदर कृष्ण, गायिका आणि संगीतकार लतादीदी आणि चित्रगुप्त.

गाणे: मेरे दिल कभी तो कोई आयेगा, चित्रपट: मैं चूप रहूंगी (वर्ष १९६२), गीतकार: राजींदर कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

दुसरे गाणे आहे: जाने कैसा छाने लगा नशा, ये प्यारका, चित्रपट: ज़बक (वर्ष १९६१), गीतकार: प्रेम धवन, गायिका आणि संगीतकार लतादीदी आणि चित्रगुप्त.

गाणे: जाने कैसा छाने लगा नशा, ये प्यारका, चित्रपट: ज़बक (वर्ष १९६१), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

आताच आपण निर्माता, निर्देशक होमी वाडिया यांच्या ‘ज़बक’ चित्रपटातील गाणे ऐकले, ह्याच चित्रपटातील ‘तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर हमें याद रखना’ हे महिपाल आणि शामा यांच्यावर चित्रित झालेले लता आणि रफी यांनी गायलेले द्वंद्वगीत खूपच गाजले होते.

चित्रगुप्त यांनी चित्रपटांना संगीत देताना कधी बॅनर किंवा पैशाचा विचार केला नाही, किंबहुना आपल्या कामाचे दाम खणखणीत मोजून घ्यावे असे ते कधीच वागले नाही. चित्रगुप्त चित्रपटामागे केवळ २०,००० रुपये मानधन घेत असत, जेव्हा इतर संगीतकारांनी लाखाचा आकडा कधीच पार केला होता. कमी मानधन असले, चित्रपट ‘बी’ ग्रेडचा आहे किंवा कुठल्या विषयावर आहे, निर्माता कोण आहे, कलाकार कोण आहेत ह्याचा त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही. मानधन कमी असले तरीही त्यांनी गाण्यांचा दर्जा कायम ‘ऐ’ ग्रेडचाच ठेवला. त्याशिवाय त्यांच्या उमेदवारीच्या काळात त्यांना सहकार्य करणारे ‘होमी वाडिया’ आणि ‘नानाभाई भट्ट’ यांचे उपकार चित्रगुप्त कधीही विसरले नाही, त्या दोघांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत चित्रगुप्त यांनी त्यांना संगीत दिले. तसेच त्या दोघांनीही १९४६ पासून १९७८-१९८० पर्यंत चित्रगुप्त यांचे साथ सोडली नाही.

चित्रगुप्त यांनी धार्मिक आणि पौराणिक चित्रपट खूपच केले असल्याने त्यांनी छान आरत्या आणि भक्तिगीते रचली आहेत.

असेच एक भजन आणि आरती आपण आता ऐकूयात.

त्यातील पहिले गाणे आहे: तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, चित्रपट: मैं चूप रहूंगी (वर्ष १९६२), गीतकार: राजींदर कृष्ण, गायिका आणि संगीतकार लतादीदी आणि चित्रगुप्त.

गाणे: तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, चित्रपट: मैं चूप रहूंगी (वर्ष १९६२), गीतकार: राजींदर कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

दुसरे गाणे आहे: जय जय हे जगदंबे माता, चित्रपट: गंगा की लहरे (वर्ष १९६४), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका लतादीदी व साथी आणि गीतकार चित्रगुप्त.

गाणे: जय जय हे जगदंबे माता, चित्रपट: गंगा की लहरे (वर्ष १९६४), गीतकार: मजरूह सुलतानपुरी,गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

चित्रगुप्त यांनी रचलेली दोन अंगाई गीते आता आपण ऐकूयात. ह्या अंगाईगीतांना चित्रगुप्त यांना अपेक्षित असलेला आवाज लतादीदींनी दिला आहे. लेखात अगोदरच म्हटल्याप्रमाणे लतादीदींनी चित्रगुप्त यांची गाणी गाण्यासाठी कायम वेगळाच आवाज वापरला, हे आपल्याही लक्षात येईल.

पहिले अंगाईगीत आहे: गाणे: चंदा लोरीया सुनाये, चित्रपट: नया संसार (वर्ष १९५९), गीतकार: राजिंदर कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे: चंदा लोरीया सुनाये, चित्रपट: नया संसार (वर्ष १९५९), गीतकार: राजिंदर कृष्ण, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

दुसरे अंगाईगीत आहे: गाणे: सो जा मेरी नन्ही परी, चित्रपट: माँ (वर्ष १९६८-अप्रदर्शीत), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे: सो जा मेरी नन्ही परी, चित्रपट: माँ (वर्ष १९६८-अप्रदर्शीत), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

चित्रगुप्त यांच्या गाण्यात विविधता होती. काळाच्या ओघात त्यांची स्टाईल ही बदलता गेल्याचे दिसून येते. त्यांची काही गाणी हि काळाच्या पुढची होती, कशी ते पुढील दोन गाणी ऐकून आपण ठरवावे.

गाणे: बैरी बिछुआ बडा दुःख दे हो राम, चित्रपट: गंगा कि लहरें (वर्ष १९६४), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे: बैरी बिछुआ बडा दुःख दे हो राम, चित्रपट: गंगा कि लहरें (वर्ष १९६४), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे: ना रुठो, हमें पास आने भी दो, चित्रपट: साज और सनम (वर्ष १९७१), गीतकार: कैफ़ी आझमी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे: ना रुठो, हमें पास आने भी दो, चित्रपट: साज और सनम (वर्ष १९७१), गीतकार: कैफ़ी आझमी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

आता जाता जाता नेहमीप्रमाणे Out Of Syllabus म्हणजेच विषयाबाहेरचे गाणे ऐकूया. पण ह्या वेळेस विषयाबाहरेची गाणी मात्र दोन आहेत.

पहिले गाणे आहे भोजपूरी भाषेतील अंगाईगीत, ‘ये चंदामामा’, चित्रपट: भौजी (वर्ष १९६५), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

गाणे – भोजपूरी भाषेतील अंगाईगीत: ‘ये चंदामामा’, चित्रपट: भौजी (वर्ष १९६५), गीतकार: मजरूह सुलतानपुरी, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

ह्या भागातील शेवटचे गाणे: बाट तकत थक थक गये नैना, चित्रपट: तेल मालिश बूट पॉलिश (वर्ष १९६१), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त. राग: केदार.

गायक मन्ना डे यांनी हिंदी चित्रपटात शास्त्रीय किंवा रागावर आधारीत अनेक गाणी गायली आहेत, तराणा, ताना घेत एखादे गाणे गाण्यात मन्ना डे ह्यांचा हातखंडाच होता. ललतादीदींनी सुद्धा असेच एक गाणे मन्ना डे यांच्या बरोबर गाणे गायले आहे, केदार रागातील ह्या गाण्यात लतादीदी आणि मान्ना डे यांची जुगलबंदी ऐकावयास मिळते. हे द्वंद्वगीत असले तरीही ते येथे देण्याचा मोह आवरत नाही असे ते वैशिष्ट्यपूर्ण गाणे आहे. आपणही त्याचा आनंद घ्यावा.

गाणे: बाट तकत थक थक गये नैना, चित्रपट: तेल मालिश बूट पॉलिश (वर्ष १९६१), गीतकार: प्रेम धवन, गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.

चित्रगुप्त यांच्या गाण्यांविषयी काही रंजक तथ्ये! (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

  • चित्रगुप्त यांनी किशोरकुमार यांच्या आवाजाचा छान वापर केलेला आढळतो. एकजात सर्वच संगीतकारांनी शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यासाठी वाळीत टाकलेल्या किशोरकुमार यांना १९६३च्या ‘एक राज’ ह्या चित्रपटात चक्क ‘पायलवाली देखना’, हे मारू बिहाग रागावर आधारित गाणे गायला देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
  • त्याच चित्रपटात अजून एक गाणे ‘अगर सुनलो, तो एक नगमा…’ हे गाणे पण किशोरकुमार यांना दिले. तसेच १९६४च्या ‘गंगा की लहरे’ ह्या चित्रपटात ‘मचलती हुयी हवा में छम छम’ आणि ‘छेडो ना मेरी जुल्फे’ ही दोन गाणी किशोरकुमार यांना लतादीदींबरोबर गायला दिली.
  • साठच्या दशकात अभिनेता चंद्रशेखर आणि अभिनेत्री कुमकुम यांच्या प्रमुख भूमिका असलेले तीन चित्रपटांना चित्रगुप्त यांचे संगीत होते. चित्रपट आहेत: तेल मालिश बूट पॉलीश, ‘नाचे नागीन बाजे बीन आणि काली टोपी लाल रुमाल.
  • चित्रगुप्त यांनी सुमारे ५० भजने गायली आहेत.
  • साठच्या दशकात संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा बोलबाला झाल्यावर अनेक निर्माते अन्य संगीतकारांवर ओ. पी. नय्यर यांच्या ढंगाचे संगीत द्यावे असे दडपण टाकू लागले. चित्रगुप्त यांच्यावर देखील असेच दडपण आले असावे, आणि म्हणूनच त्यांनी १९५९च्या ‘काली टोपी लाल रुमाल’ ह्या चित्रपटात ओ. पी. नय्यर स्टाईलची गाणी केली. ‘यारों का यार लिए नखरे हज़ार लिए’, ‘ओ काली टोपी वाले जरा नाम तो बता’ आणि ‘गोरी ओढ के मलमल निकली’ अशी तीन द्वंद्वगीते रफी आणि आशा भोसले यांना देवून चित्रगुप्त यांनी ओ. पी. नय्यर स्टाईलमध्ये गाणी देऊन निर्मात्याची मागणी पूर्ण केली, पण परत त्या वाटेला गेले नाही.
  • चित्रगुप्त यांची दोन मुले आनंद आणि मिलिंद यांनी १९८४ मध्ये ‘अब आयेगा मजा’ चित्रपटाद्वारे संगीतक्षेत्रात प्रवेश केला आणि ‘कयामत से कयामत तक’ ह्या चित्रपटाला उत्तम संगीत देवून १९८८चा उत्तम चित्रपट संगीताचा ‘फिल्मफेअर’ अवॉर्ड मिळविला. त्यांची ‘दिल’, ‘बेटा’, ‘अनाडी’, ‘बोल राधा बोल’ ह्या चित्रपटातील गाणीही खूपच गाजली.

हिंदी चित्रपट सृष्टीत झगमागाटापासून कायम उपेक्षित राहिलेले संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव आणि गान सरस्वती लता मंगेशकर यांच्या स्मृतीला अभिवादन!

चित्रगुप्त आणि लतादीदी ह्या अजरामर जोडीची अजरामर गाणी अजूनही खूप आहेत. त्या सर्वांचा उल्लेख येथे करण्याऐवजी वर ऐकलेल्या गाण्यासोबत आणखी निवडक गाणे खालील प्ले लिस्ट मध्ये दिलेली आहेत, ती आपण आपल्या फावल्या वेळेत सलग ऐकून त्यांचा आनंद घेऊ शकता. आमच्या ब्लॉगला आपले नाव नोंदवा, म्हणजे गाण्यांची यादी अपडेट झाल्यावर आपणास त्याचे सूचना लगेच मिळेल.

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी प्ले लिस्ट (Unforgettable songs of Lata and Chitragupta)


संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta): लेखक आणि संकलकचारुदत्त सावंत, मोबाईल क्र. ८९९९७७५४३९. लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलकचारुदत्त सावंत.

सूचना: लेखातील गाण्याचे सर्वाधिकार आणि स्वामित्व हे त्या गाण्याचे अधिकार असलेल्या कंपनीकडे आहेत.
या लेखात वापरलेली गाणी हि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीकरिता वापरली आहेत. लेखकाला त्यापासून कुठलाही व्यावसायिक लाभ मिळण्यासाठी सदर गाणी वापरली नाहीत. जर कोणास आक्षेप असेल तर आणि जर त्यांनी तसे कळविल्यास सदर गाणे या लेखातून काढून टाकण्यात येईल.


संदर्भ आणि ऋणनिर्देशन संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta):

External Links:

Disclaimer: Copyrights of this article is limited to the writeup and content used in this article. Copyrights of audio and video are reserved with respective owners. We have used/provided links to audio and video through youtube.com



हिंदी गाण्यांचे आमचे इतर लेख वाचा


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. पुढील भागात आपण जाणून घेवूयात संगीतकार रवी आणि लता मंगेशकर यांची गाणी!आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Charudatta Sawant more...

4 comments

  1. वाहवा, किती सुरेख गाणी आहेत. आपल्या गाण्यावरील लेखाचा तर मी फार चाहता आहे. गाण्यावरील लेखाची मी कायम वाट पहात असतो.

    1. धन्यवाद!
      खरे तर अजूनही खूपच गाण्यांचा उल्लेख करायचा राहून गेला आहे, लेख खूपच मोठा झाला आहे. पण ती सर्व गाणे Playlist मध्ये लवकरच समाविष्ट होतील.

  2. अप्रतिम लेख,नवीन पिढीने. आवर्जून वाचावं…..ओघवती लेखणी आणि गाण्यांची भरपेट मेजवानी

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply